CBSE कडून शाळांना तंबी, विद्यार्थ्यांच्या माहितीतील चुकांमुळे २०२७ परीक्षेत अडचणी येण्याची शक्यता
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने २०२७ च्या बोर्ड परीक्षेसाठी सर्व संलग्न शाळांना विद्यार्थ्यांची माहिती काळजीपूर्वक तपासण्याचे निर्देश दिले आहेत.
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने म्हणजेच सीबीएसईने २०२७ सालच्या बोर्ड परीक्षेच्या तयारीला सुरुवात केली आहे. यानिमित्ताने देशभरातील आपल्याशी संलग्न असलेल्या सगळ्या शाळांना मंडळाने एक महत्त्वाची सूचना आणि इशारा पाठवला आहे. विद्यार्थ्यांनी निवडलेले विषय आणि त्यांची वैयक्तिक माहिती मंडळाकडे पाठवण्याआधी शाळांनी ती माहिती नीट आणि बारकाईने तपासावी, असे सीबीएसईने स्पष्टपणे सांगितले आहे.
विद्यार्थ्याचे नाव, जन्मतारीख, पालकांचे नाव, विषयाचे नाव किंवा सब्जेक्ट कोड यापैकी कशातही एखादी छोटीशी चूक झाली, तरी ती पुढे परीक्षेच्या प्रक्रियेत मोठा अडथळा ठरू शकते, इतकेच नाही तर त्यामुळे विद्यार्थ्याचा प्रवेशही अडकू शकतो, असे सीबीएसईने म्हटले आहे.
सीबीएसईने शाळांच्या प्राचार्यांना आणि प्रमुखांना पत्र पाठवून कळवले आहे की, वारंवार सूचना दिल्यानंतरही विद्यार्थ्यांच्या माहितीत चुका होत असल्याचे दिसून येत आहे. काही शाळा वेळेत माहिती पाठवत नाहीत, तर काही शाळांकडून चुकीची माहिती भरली जाते. चुकीची माहिती भरल्यानंतर संबंधित शाळा ती सुधारण्यासाठी अर्ज करतात, त्यामुळे मंडळाचा वेळ जास्त जातो आणि परीक्षेच्या नियोजनात उगाच उशीर होतो. यामुळेच सीबीएसईने सगळ्या शाळांना 'लिस्ट ऑफ कँडिडेट्स' (LOC) आणि इतर आवश्यक तपशील ठरलेल्या मुदतीतच जमा करण्याचे निर्देश दिले आहेत.
सीबीएसईच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, २०२७ च्या परीक्षेशी संबंधित काही महत्त्वाच्या प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहेत. इयत्ता ९ वी आणि ११ वीच्या विद्यार्थ्यांची ऑनलाईन नोंदणी होणार आहे, तर इयत्ता १० वी आणि १२ वीच्या परीक्षार्थींची अंतिम यादी म्हणजेच LOC सादर करावी लागणार आहे. या पार्श्वभूमीवर शाळांनी आधीपासूनच प्रत्येक विद्यार्थ्याची अचूक माहिती तयार ठेवावी, असे आवाहन मंडळाने केले आहे.
शाळांनी विद्यार्थ्याचे पूर्ण नाव आणि त्याचे स्पेलिंग, जन्मतारीख, लिंग आणि प्रवर्ग, आई-वडील किंवा पालकांचे नाव, विद्यार्थ्याने निवडलेले विषय आणि त्यांचे बरोबर सब्जेक्ट कोड, तसेच नमुन्यानुसार फोटो आणि स्वाक्षरी या सगळ्या गोष्टी आधीच तपासून घ्याव्यात, असे सीबीएसईने सुचवले आहे.
२०२७ ची बोर्ड परीक्षा सुरळीत पार पडावी आणि निकाल वेळेत जाहीर व्हावा, हे सीबीएसईचे मुख्य उद्दिष्ट आहे. यासाठी शाळा आणि मंडळ यांच्यात योग्य समन्वय असणे गरजेचे आहे. माहिती भरताना घाईघाईत चुका करण्यापेक्षा, प्रत्येक तपशील काळजीपूर्वक आणि अचूक तपासूनच अपलोड करावा, असा स्पष्ट संदेश सीबीएसईने शाळांना दिला आहे.