अबब! नुसता जाळ अन् धूर! Shree Charani ने ICC रँकिंगमध्ये केला महारेकॉर्ड
भारतीय महिला क्रिकेट संघाने आशिया कप २०२६ च्या अंतिम सामन्यात श्रीलंका संघाला ७२ धावांनी हरवत विक्रमी आठव्यांदा या स्पर्धेचं जेतेपद पटकावलं. भारतीय संघाने श्रीलंकेचा असा धुव्वा उडवला की या विजयाची सगळीकडे चर्चा झाली. या ऐतिहासिक विजयानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) महिला टी-२० आंतरराष्ट्रीय गोलंदाजी क्रमवारी जाहीर केली आणि त्यात भारतीय खेळाडूंनी दमदार कामगिरी करत आपलं वर्चस्व दाखवून दिलं. आशिया कपमधल्या चमकदार खेळाचा भारतीय महिला खेळाडूंना आयसीसी क्रमवारीत मोठा फायदा झाला.
भारतीय संघाची फिरकी गोलंदाज श्री चरणीने या क्रमवारीत मोठी झेप घेतली आहे. ८०० रेटिंग पॉइंट्सचा टप्पा ओलांडणारी ती पहिली भारतीय गोलंदाज ठरली असून, तिने ८०४ रेटिंग पॉइंट्स मिळवले आहेत. या कामगिरीचं सगळीकडून कौतुक होत आहे. टॉप १० महिला टी-२० गोलंदाजांच्या यादीत श्री चरणीबरोबर दीप्ती शर्माचंही नाव आहे, म्हणजे या यादीत दोन भारतीय खेळाडूंचा समावेश आहे. दीप्ती शर्मानेही टी-२० आयसीसी क्रमवारीत मोठी झेप घेतली आहे. आयसीसीने स्वतः याबद्दल एक ट्विट करत श्री चरणीच्या कारकिर्दीतल्या या सर्वोत्तम रेटिंगचा उल्लेख केला आणि आशिया कपमधल्या तिच्या कामगिरीचं कौतुक केलं.
टी-२० आंतरराष्ट्रीय क्रमवारीत सर्वाधिक रेटिंग पॉइंट्स मिळवणाऱ्या गोलंदाजांमध्ये पहिल्या स्थानी ऑस्ट्रेलियाची मेगन शट आहे, तर श्री चरणी दुसऱ्या आणि इंग्लंडची सोफी एक्लेस्टोन तिसऱ्या स्थानावर आहे.
संपूर्ण स्पर्धेत श्री चरणीने भेदक आणि शिस्तबद्ध गोलंदाजी केली. साखळी सामन्यांपासून थेट अंतिम सामन्यापर्यंत प्रत्येक कठीण क्षणी तिने भारतासाठी विकेट्स काढल्या. या स्पर्धेत तिने एकूण १२ बळी घेतले, जो तिच्या कारकिर्दीतला आतापर्यंतचा सर्वोत्तम स्पेल ठरला आहे. तिच्या या कामगिरीमुळेच भारतीय संघाला प्रतिस्पर्धी संघांना कमी धावसंख्येत रोखणं शक्य झालं. पुढच्या आंतरराष्ट्रीय मालिका आणि जागतिक स्पर्धांच्या पार्श्वभूमीवर श्री चरणीचा हा फॉर्म आणि तिला मिळालेलं हे मानांकन भारतीय महिला क्रिकेट संघासाठी दिलासादायक मानलं जात आहे.
आशिया कप स्पर्धेत जबरदस्त कामगिरी करणाऱ्या दीप्ती शर्मानेही आयसीसी क्रमवारीत ४ स्थानांची मोठी झेप घेत थेट दुसरं स्थान मिळवलं आहे. संपूर्ण आशिया कप स्पर्धेत दीप्तीने शिस्तबद्ध गोलंदाजी करत सर्वाधिक १४ विकेट्स घेतल्या. श्रीलंकेविरुद्धच्या अंतिम सामन्यात तिने अवघ्या १९ धावांच्या मोबदल्यात ३ प्रमुख फलंदाजांना बाद करत महत्त्वाची कामगिरी केली. भारतीय संघातल्या या दोन गोलंदाजांच्या कामगिरीमुळेच संघाला आशिया कप जिंकणं शक्य झालं आणि आता आयसीसी क्रमवारीतही त्यांना त्याचं फळ मिळालं आहे.