शिवडीच्या राजाच्या अमृतमहोत्सवी वर्षात अनोखा देखावा; मुंबईत साकारली 'पाण्याखालची द्वारका'
शिवडीच्या राजाने यंदा अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त आशियातील अनोख्या संकल्पनेतून पाण्याखालची द्वारका उभी केली आहे.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
गणेशोत्सवाला अवघे दोन दिवस उरले असताना मुंबईत सगळीकडे बाप्पाच्या स्वागताची लगबग सुरू आहे. आबालवृद्धांच्या लाडक्या गणरायाच्या घरोघरी आगमनाला आणि प्राणप्रतिष्ठेला आता अवघे दोन दिवस उरले आहेत. गणेश मंडळं आपापल्या देखाव्यांची शेवटची तयारी करत असतानाच शिवडीच्या राजाने यंदा एक वेगळाच विक्रम रचला आहे. आशियातील एका अनोख्या संकल्पनेतून मंडळाने 'पाण्याखालची द्वारका' उभी केली असून, त्यामुळे यंदाच्या देखाव्याला ऐतिहासिक आणि भव्य असं रूप मिळालं आहे.
शिवडीचा राजा यंदा ७५व्या म्हणजेच अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण करत आहे. याच निमित्ताने साकारलेल्या या भव्य देखाव्याचं आणि गणरायाच्या मूर्तीचं आज तुतारी, ढोल, शंखनाद आणि घंटानादाच्या पारंपरिक गजरात अनावरण करण्यात आलं.
हा देखावा तब्बल १३० फूट लांब, ६५ फूट रुंद आणि ४५ फूट उंच आहे. यात जवळपास १,००० चौरस फूट एलईडी स्क्रीन, अत्याधुनिक होलोग्राम तंत्रज्ञान, लेझर लाईट इफेक्ट्स आणि वातानुकूलित सेट वापरण्यात आले आहेत. हे सगळं उभं करण्यासाठी ७० ते ८० कारागिरांनी गेल्या दीड महिन्यापासून रात्रंदिवस मेहनत घेतली.
प्रबोधनकार ठाकरे उद्यान, शिवडी बस डेपोसमोर, शिवडी इथे हा देखावा उभारण्यात आला आहे. गुजरातमध्ये गोमती नदी आणि अरबी समुद्राच्या संगमावर वसलेली पौराणिक द्वारका यंदा शिवडीत पाहायला मिळणार आहे. प्रसिद्ध कला संचालक अमन विधाते यांच्या संकल्पनेतून हा देखावा साकारला गेला आहे. सर्वसामान्य नागरिकांना गुजरातला जाऊन पाण्याखालची द्वारका पाहणं सहज शक्य होत नाही, त्यामुळे शिवडीच्या राजाने ही बुडालेली द्वारका मुंबईकरांच्या आणि सर्वसामान्य नागरिकांच्या जवळ आणण्याचा अनोखा प्रयत्न केला आहे.
मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत जाधव यांनी सांगितलं की, शिवडीच्या राजाची ७५ वर्षांची वाटचाल ही श्रद्धा, संस्कृती, सामाजिक बांधिलकी आणि समाजातील एकोपा जपणाऱ्या समृद्ध परंपरेची साक्ष आहे. अमृतमहोत्सवी वर्षात ही परंपरा अधिक व्यापक करत सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांना विशेष प्राधान्य दिलं जात आहे, असंही ते म्हणाले. यंदाच्या उत्सवातील हा आगळावेगळा सोहळा भाविकांनी अनुभवावा, पाण्याखालची द्वारका पाहावी आणि या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार व्हावं, असं आवाहन जाधव यांनी सगळ्या भाविकांना केलं.
मंडळाचे प्रमुख मार्गदर्शक विजय इंदुलकर यांनी सांगितलं की, शिवडीच्या राजाच्या अमृतमहोत्सवी वर्षाचं औचित्य साधून यंदा काहीतरी आगळंवेगळं अनुभवता यावं, या हेतूने 'पाण्याखालची द्वारका' ही संकल्पना साकारण्यात आली. पौराणिक कथांमधली श्रीकृष्णाची नगरी आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने प्रत्यक्ष उभी करण्याचा हा प्रयत्न असल्याचंही इंदुलकर यांनी नमूद केलं.