शेअर बाजारात पैसे बुडाल्याने नागपुरात तरुणाने बँकेत मिरची पावडर फेकून केली लूट
नागपुरातील सक्करदरा भागातील SBI बँकेत भरदिवसा झालेल्या लुटीमागचे कारण पोलीस चौकशीत समोर आले असून, अर्धा तासात आरोपी पोलिसांच्या ताब्यात सापडला.
नागपूरच्या सक्करदरा भागातील SBI बँकेच्या शाखेत भरदिवसा झालेल्या चित्रपटासारख्या लुटीची घटना समोर आली होती. एका तरुणाने बँक कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात तिखट लाल मिरची पावडर फेकून लाखो रुपयांची रोकड लुटून नेली होती. या खळबळजनक दरोड्यामागचे मुख्य कारण आता पोलिसांच्या चौकशीत उघड झाले आहे.
सक्करदरा पोलिसांनी केलेल्या सखोल चौकशीत असे समोर आले की या घटनेमागे शेअर बाजारात झालेला मोठा तोटा आणि डोक्यावरचा कर्जाचा बोजा हे कारण होते. आरोपीचे नाव सूरज भोजराज बोरकर असून तो नागपूर जिल्ह्यातील भिवापूर तालुक्यातील तातोली गावचा रहिवासी आहे. त्याने बी.एस्सी.चे शिक्षण पूर्ण केले असून तो पेशाने MR म्हणून काम करत होता.
सूरजला शेअर बाजारात पैसे गुंतवण्याचा नाद होता. सतत शेअर बाजारात पैसे बुडाल्याने तो कर्जाच्या मोठ्या जाळ्यात अडकला. त्याच्यावर खासगी सावकारांबरोबरच बँकेचेही कर्ज चढले होते, त्यामुळे त्याच्यावर एकूण जवळपास 5 लाख रुपयांचे कर्ज झाले होते.
बँक आणि सावकार सतत त्याच्याकडे पैसे वसुलीसाठी तगादा लावत होते. या चौफेर कर्जाच्या दबावाला आणि तगाद्याला कंटाळून तसेच लवकर पैसे कमावून कर्ज फेडण्याच्या इच्छेने त्याने बँक लुटण्याचा भयंकर कट रचला.
कर्ज फेडण्याच्या उद्देशाने आरोपी सूरज बोरकरने पद्धतशीर योजना आखली. त्याने एका दुकानातून लाल मिरची पावडर विकत घेतली आणि गुरुवारी संध्याकाळी भांडेप्लॉट चौकातील चौधरी हॉस्पिटलसमोर असलेल्या SBI च्या सक्करदरा शाखेत एक सर्वसाधारण ग्राहक बनून तो आत घुसला.
त्यावेळी बँकेत दोन महिला आणि तीन पुरुष कर्मचारी हजर होते. संधी मिळताच आरोपीने कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर आणि डोळ्यात मिरची पावडर फेकली. तिखट जळजळीमुळे कर्मचाऱ्यांमध्ये आरडाओरडा आणि गोंधळ उडाला, त्याचाच फायदा घेत आरोपीने काउंटरवरून 4 लाख 53 हजार रुपयांची रोकड घेऊन पळ काढला.
बँकेत भरदिवसा झालेल्या या दरोड्याची माहिती मिळताच सक्करदरा पोलीस स्टेशन तातडीने कामाला लागले. पोलीस निरीक्षक रमेश खुणे यांच्या नेतृत्वाखाली बीट मार्शल आणि पोलीस पथकांनी लगेच बँकेचे सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि शहरभर नाकाबंदी लावली.
पोलिसांच्या तत्पर कारवाईमुळे घटनेच्या अवघ्या 30 मिनिटांतच सूर्योदय हॉस्पिटलच्या मागे असलेल्या एनआयटी सोसायटीतून आरोपी सूरज बोरकरला पकडण्यात आले. पोलिसांनी आरोपीकडून लुटलेली संपूर्ण 4.53 लाख रुपयांची रोकड जप्त केली असून गुन्हा नोंदवून त्याला अटक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक महेश पांडे करत आहेत.