SBI मध्ये यंदा साधारण १२ हजार जागांवर भरती, चेअरमन सेट्टींची माहिती
स्टेट बँक ऑफ इंडिया आर्थिक वर्ष २०२६-२७ मध्ये क्लर्क आणि ऑफिसर कॅडरमध्ये मोठी भरती करणार असून, शाखांचा विस्तार आणि एनएसईमधील हिस्सा विक्रीचीही तयारी सुरू आहे.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
देशातील सगळ्यात मोठी सरकारी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाकडून (SBI) यंदा मोठ्या प्रमाणावर नोकरभरती होणार आहे. आर्थिक वर्ष २०२६-२७ मध्ये बँक साधारण १२ हजार नवीन कर्मचारी घेण्याच्या तयारीत आहे. ही माहिती खुद्द बँकेचे चेअरमन सीएस सेट्टी यांनी दिली आहे.
सेट्टी यांच्या म्हणण्यानुसार, यंदा क्लेरिकल आणि ऑफिसर कॅडरमध्ये साधारण ११ हजार ते १२ हजार लोकांची नियुक्ती होऊ शकते. मात्र, ही आकडेवारी अंतिम नाही. निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या आणि बँकेच्या प्रत्यक्ष गरजेनुसार शेवटचा आकडा कमी-जास्त होऊ शकतो, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
गेल्या आर्थिक वर्षात एसबीआयने मोठ्या संख्येने भरती केली होती, त्यात साधारण दीड हजार स्पेशलिस्ट आयटी ऑफिसरचाही समावेश होता. यंदा मात्र आयटी विभागात इतक्या मोठ्या प्रमाणात भरतीची गरज नसल्याचं बँकेकडून सांगण्यात आलं आहे.
मार्च २०२६ पर्यंतच्या आकडेवारीनुसार एसबीआयमध्ये एकूण कर्मचाऱ्यांची संख्या पावणेतीन लाखांच्या जवळपास म्हणजे २.४५ लाखांहून अधिक होती. बँकेच्या आर्थिक वर्ष २०२६ च्या अहवालात नमूद केल्याप्रमाणे, २०२५-२६ या वर्षभरात एसबीआयने एकूण २५ हजार ६३३ जणांची भरती केली होती. यात ४ हजार ६४० ऑफिसर, १९ हजार ३४० असोसिएट्स आणि १ हजार ६५३ काँट्रॅक्चुअल कर्मचारी यांचा समावेश होता. यंदाच्या भरतीचा भर प्रामुख्याने क्लेरिकल आणि ऑफिसर कॅडरवर राहण्याची शक्यता आहे, पण कोणत्या कॅडरमध्ये नेमक्या किती जागा असतील, याची स्पष्ट आकडेवारी बँकेने अजून जाहीर केलेली नाही.
कर्मचारी भरतीबरोबरच एसबीआय आपल्या शाखांचं जाळंही वाढवणार आहे. आर्थिक वर्ष २०२६-२७ मध्ये बँक नेट आधारावर साधारण २०० ते २५० नवीन शाखा जोडण्याच्या विचारात आहे. सेट्टी यांच्या मते, एसबीआयचं नेटवर्क आधीच खूप मोठं असलं, तरी काही भागांत बँकेची उपस्थिती अजून वाढवायला वाव आहे. नवीन वसाहती उभ्या राहत असलेल्या आणि व्यावसायिक हालचाली वाढत असलेल्या जिल्ह्यांमध्ये बँक आपला विस्तार करू इच्छिते. त्याचबरोबर काही शाखांचं सुसूत्रीकरणही सुरू आहे.
एसबीआयच्या चेअरमननी नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या (NSE) प्रस्तावित आयपीओबद्दलही माहिती दिली. एसबीआय आणि तिची उपकंपनी असलेली एसबीआय कॅपिटल मार्केट्स लिमिटेड मिळून एनएसईमधील साधारण १ टक्क्यांपर्यंतची हिस्सेदारी विकण्याच्या तयारीत आहेत. यात एसबीआय साधारण ०.६५ टक्के तर एसबीआय कॅपिटल मार्केट साधारण ०.३५ टक्के हिस्सा विकू शकते. इतर भागधारकांच्या सहभागामुळे प्रत्यक्षात विकला जाणारा हिस्सा यापेक्षा कमीही राहू शकतो.
सध्या एनएसईमध्ये एसबीआयची हिस्सेदारी ३.२३ टक्के तर एसबीआय कॅपिटल मार्केट्सची हिस्सेदारी ४.३३ टक्के आहे. ३० हजार कोटी रुपयांच्या या प्रस्तावित आयपीओला नियामक मंजुरी मिळाली असून, हा भारतातील आतापर्यंतचा सर्वात मोठा आयपीओ ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या इश्यूची तुलना हुंडई मोटर इंडिया, एलआयसी, पेटीएम, टाटा कॅपिटल आणि कोल इंडिया यांच्या आयपीओंशी केली जात आहे.