Psycho Ranga Trailer: गूढ 'रंगा' कोण? अन्यायाविरुद्ध पुकारली लढाई; 'सायको रंगा'चा थरारक ट्रेलर रिलीज
देवेंद्र चौगुले यांनी लिहिलेल्या, दिग्दर्शित केलेल्या आणि निर्मिती केलेल्या 'सायको रंगा' या आगामी मराठी सिनेमाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला असून सिनेरसिकांमध्ये उत्सुकता वाढली आहे. गूढ स्वभावाचा नायक, अनपेक्षित संकटं, थरारक अॅक्शन आणि भावनिक गुंतागुंत असा वेगळाच मसाला या ट्रेलरमध्ये पाहायला मिळतो. रंगा नावाच्या नायकाच्या आयुष्यातला संघर्ष आणि त्याने अन्यायाविरुद्ध पुकारलेली लढाई ट्रेलरमधून समोर येते.
सिनेमाची कथा दोन वेगळ्या जगांमध्ये फिरते. एका बाजूला गावाकडची माती, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि त्यांच्या आयुष्यातला रोजचा संघर्ष दिसतो, तर दुसरीकडे शहरातलं सत्तेचं आणि पैशांचं राजकारण दाखवलं जातं. गावातलं साधं, कष्टाचं जगणं आणि शहरातलं सत्ता व पैशाचं गणित असे दोन अगदी वेगळे रंग या सिनेमात एकत्र येतात आणि याच दोन्ही जगांमधून रंगाची गोष्ट पुढे सरकत जाते. अन्याय करणाऱ्यांशी थेट भिडणारा रंगा नेमका कोण, कोणत्या परिस्थितीमुळे तो या लढाईत उतरतो, त्यामागचं नेमकं कारण काय आणि यामागे लपलेलं गूढ काय, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं ट्रेलरमधून मिळत नसली तरी सिनेमाबद्दलची उत्सुकता मात्र नक्कीच वाढते.
या सिनेमात सुबोध भावे यांच्यासोबत मिलिंद शिंदे, पुष्कर जोग, जान्हवी किल्लेकर, स्मिता गोंदकर, संजय मोहिते, आनंद काळे, उमेश बोळके, रंजना कुलकर्णी, अमोल नाईक, अनिल राबाडे, एन. डी. चौगुले, सचिन मोरे आणि प्रकाश धोत्रे अशी तगडी स्टारकास्ट आहे. इतक्या मोठ्या आणि अनुभवी कलाकारांच्या फळीमुळे सिनेमाबद्दलच्या अपेक्षाही वाढल्या आहेत. ट्रेलरमध्ये वेगवेगळ्या व्यक्तिरेखांमधला संघर्ष आणि त्यांच्या नात्यांमधली गुंतागुंत दाखवली आहे, त्यामुळे प्रत्येक पात्राची कथेतली नेमकी भूमिका काय, हे जाणून घेण्याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये निर्माण झाली आहे.
दिग्दर्शक देवेंद्र चौगुले यांनी सिनेमाबद्दल बोलताना सांगितलं की, "'सायको रंगा' ही परिस्थितीसमोर उभं राहण्याची आणि स्वतःच्या अस्तित्वासाठी लढण्याची गोष्ट आहे. रंगाच्या व्यक्तिरेखेला अनेक पदर आहेत आणि त्याचा प्रवास जसजसा पुढे सरकतो, तसतसे त्याच्या आयुष्यातले काही अनपेक्षित पैलू समोर येत जातात. ट्रेलरमधून रंगा आणि त्याच्या संघर्षाची झलक दाखवण्याचा प्रयत्न केला आहे." या शब्दांतून दिग्दर्शकाने रंगाच्या व्यक्तिरेखेमागचा विचार आणि सिनेमाचा गाभा काय आहे, हे स्पष्ट केलं.
देवेंद्र चौगुले यांनी लिहिलेल्या, दिग्दर्शित केलेल्या आणि निर्मिती केलेल्या या सिनेमाच्या सहदिग्दर्शनाची जबाबदारी स्नेहलराज (दादू) यांनी सांभाळली आहे, तर संगीत उत्तम चोरडे यांचं आहे. थरार, अॅक्शन, भावनिक गुंतागुंत आणि रहस्य असा अनुभव देणारा 'सायको रंगा' हा सिनेमा २५ सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.