तलवारीने गळा कापण्याचा प्रयत्न! हात आडवा धरून वाचवला जीव
नागपुरातील सक्करदरा पोलीस स्टेशन हद्दीत पैशांच्या वादातून तरुणावर तलवारीने हल्ला, हात आडवा धरल्याने अंगठ्याला गंभीर दुखापत, दोन आरोपींना अटक
नागपुरातील सक्करदरा पोलीस स्टेशन हद्दीत पैशांच्या देवाणघेवाणीवरून झालेल्या वादातून एका तरुणावर जीवघेणा हल्ला झाल्याचा प्रकार समोर आला आहे. दोन आरोपींनी तरुणाला पकडून ठेवले आणि त्यातील एकाने तलवारीने त्याच्या गळ्यावर वार करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप आहे. तरुणाने वार अडवण्यासाठी हात पुढे केला, त्यामुळे त्याच्या डाव्या हाताच्या अंगठ्याला गंभीर दुखापत झाली. आजूबाजूच्या लोकांनी मध्यस्थी केल्यानंतर दोन्ही आरोपी घटनास्थळावरून पळून गेले. पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे.
ही घटना सिंधीबन कॉलनी, बडा ताजबाग परिसरातील आहे. जखमी तरुणाची ओळख मोहम्मद शाकीर मोहम्मद इक्बाल अशी झाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शाकीर याने आधी दिलेले पैसे परत घेण्यासाठी तक्रारदार शेख सोहेल याच्याकडे गेला होता. तो पैसे परत मागण्याच्या हेतूने तिथे पोहोचला असताना, त्याचवेळी तिथे आधीच काही जणांमध्ये एक वेगळाच वाद सुरू होता. या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर सय्यद खानू उर्फ पटेल आणि सय्यद सरदार उर्फ यूनूस सय्यद खलील या आरोपींचा असा गैरसमज झाला की शाकीर हा भांडण करण्याच्या उद्देशाने तिथे आला आहे. वास्तविक शाकीरचा त्या वादाशी काहीही संबंध नव्हता, तो फक्त आपले पैसे परत घेण्यासाठी आला होता.
या गैरसमजातून दोघांनी शाकीरला पकडले, असा आरोप आहे. त्यानंतर आरोपी सरदार उर्फ यूनूस हा घरातून तलवार घेऊन आला आणि जीवे मारण्याची धमकी देत त्याने शाकीरच्या गळ्यावर वार केला.
आपला जीव वाचवण्यासाठी शाकीरने हात पुढे करून तलवारीचा वार अडवण्याचा प्रयत्न केला. गळ्यावर होणारा वार अडवताना त्याने आपला डावा हात पुढे केला, आणि यातच त्याच्या डाव्या हाताच्या अंगठ्याला गंभीर दुखापत झाली.
आरोपी दुसरा वार करणार, इतक्यात तक्रारदार शेख सोहेल याने मध्यस्थी करून वाद शांत केला आणि आरोपींना रोखले. त्यामुळे आरोपींना दुसरा वार करता आला नाही. त्यानंतर दोन्ही आरोपी धमकी देत घटनास्थळावरून पळून गेले.
जखमी शाकीरला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
या घटनेची तक्रार मिळाल्यानंतर सक्करदरा पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाशी संबंधित कलमे आणि आर्म्स ऍक्टखाली गुन्हा दाखल केला. पोलिसांनी कारवाई करत सय्यद खानू उर्फ पटेल आणि सय्यद सरदार उर्फ यूनूस यांना अटक केली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी सय्यद खानू उर्फ पटेल याच्याविरुद्ध याआधीही एक गुन्हा दाखल आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.