सक्करदऱ्यात गैरसमजातून तरुणाची तलवारीने मान कापण्याचा प्रयत्न
नागपुरातील सक्करदरा पोलीस स्टेशन हद्दीत गैरसमजातून एका तरुणाची मान कापण्याचा प्रयत्न झाल्याची घटना घडली आहे. ताजाबाद येथील सिंधीबन कॉलनीत घडलेल्या या प्रकारात मो. शाकीर मो. इकबाल याला दुखापत झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शाकीर याने आधी दिलेले पैसे परत घेण्यासाठी तो शेख सोहेल याच्याकडे गेला होता. शेख सोहेल याच्याकडे शाकीर पोहोचला त्या ठिकाणी काही जणांमध्ये आधीच वाद सुरू होता. याच वेळी आरोपी सय्यद खानू उर्फ पटेल आणि सय्यद सरदार उर्फ यूनुस या दोघांना गैरसमज झाला की शाकीर हा तिथे भांडण करण्याच्या इराद्याने आला आहे. वास्तविक शाकीर हा फक्त आपले पैसे परत घेण्यासाठी तिथे गेला होता, मात्र त्या ठिकाणी आधीच सुरू असलेल्या वादामुळे आरोपींचा गैरसमज झाला.
या गैरसमजातून सय्यद खानू उर्फ पटेल आणि सय्यद सरदार उर्फ यूनुस या दोघांनी मिळून शाकीरला पकडले. यानंतर सरदार उर्फ यूनुस हा घरातून तलवार घेऊन आला आणि जीवे मारण्याची धमकी देत त्याने थेट शाकीरच्या मानेवर वार केला. आपला जीव वाचवण्यासाठी शाकीरने हात पुढे करून तलवारीचा वार अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र या प्रयत्नात वार त्याच्या डाव्या हाताच्या अंगठ्यावर बसला आणि त्याला गंभीर दुखापत झाली.
आरोपीकडून शाकीरवर दुसरा वार होण्यापूर्वीच शेख सोहेल याने मध्ये पडून मध्यस्थी करत वाद शांत केला, त्यामुळे मोठा अनर्थ टळला. वाद शांत झाल्यानंतर दोन्ही आरोपी जीवे मारण्याची धमकी देतच तिथून पळून गेले. जखमी झालेल्या शाकीरवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या घटनेची माहिती मिळताच सक्करदरा पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली. पोलिसांनी सय्यद खानू उर्फ पटेल आणि सय्यद सरदार उर्फ यूनुस या दोघांविरोधात खुनाचा प्रयत्न आणि आर्म्स ऍक्टअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. यातील आरोपी खानू उर्फ पटेल याच्याविरोधात यापूर्वीही एक गुन्हा दाखल असल्याचे तपासात समोर आले आहे.