झोपलेल्या कुत्र्यावर बिबट्याचा जीवघेणा हल्ला, २५ सेकंद थरार अन् अखेर श्वानानेच शिकाऱ्याला पळवून लावले; Video
उत्तराखंडमधील रुद्रप्रयाग येथे रात्रीच्या वेळी एका घरात शिरलेल्या बिबट्याने झोपलेल्या कुत्र्यावर हल्ला केला, पण कुत्र्याने प्रतिहल्ला करत बिबट्याला माघार घ्यायला भाग पाडले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
उत्तराखंडमधील रुद्रप्रयाग येथून एक धाडसी कुत्र्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने फिरतोय. रात्रीच्या अंधारात एक बिबट्या निवासी भागातल्या एका घरात शिरला आणि दुसऱ्या मजल्यावर पोहोचला. तिथे एका टेबलावर एक कुत्रा शांतपणे झोपला होता. रात्रीची वेळ असल्याने आजूबाजूला घनदाट अंधार आणि शांतता होती.
कुत्र्याला पाहताच बिबट्याने त्याच्यावर नजर रोखली आणि हळूहळू जवळ जाऊन त्याच्यावर जीवघेणा हल्ला केला. या अचानक हल्ल्यामुळे कुत्रा सुरुवातीला जरा घाबरला, पण त्याने लगेच स्वतःला सावरलं. घाबरून गप्प बसण्याऐवजी कुत्र्याने बिबट्यावर उलट हल्ला चढवला आणि आपल्या पंजांनी त्याच्यावर वार करत त्याला पळवून लावण्याचा प्रयत्न सुरू केला. कुत्रा अजिबात घाबरला नाही आणि मोठ्या धाडसाने त्याने बिबट्याला तोंड दिलं.
दोघांमधली ही झटापट बराच काळ सुरू राहिली, आणि यामुळे परिसरात भयंकर वातावरण तयार झालं होतं. जंगलातला हा शिकारी कुत्र्यावर हल्ला करायला आला होता, पण कुत्रा काही हार मानायला तयार नव्हता. अखेर कुत्र्याची ताकद आणि धाडस पाहून बिबट्याला घाबरून माघार घ्यावी लागली आणि तो गुपचूप तिथून पळून जाण्याचा निर्णय घेतो. व्हिडिओच्या शेवटी बिबट्याला छतावरून पळून जाताना बघायला मिळतं.
उत्तराखंडमध्ये अनेक भागांत घनदाट जंगल असल्यामुळे वन्यप्राणी मानवी वस्तीत शिरण्याच्या घटना वारंवार घडत असतात, आणि हीदेखील त्याचाच एक भाग आहे. अशा घटनांमुळे स्थानिक नागरिकांमध्ये नेहमीच भीतीचं वातावरण असतं.
या घटनेचा व्हिडिओ एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील @thetatvaindia या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं होतं की, रुद्रप्रयागमध्ये हल्ल्यानंतर कुत्र्याने बिबट्याला निघून जायला भाग पाडलं. हा व्हिडिओ सध्या चांगलाच ट्रेंड करत असून अनेकांनी यावर कमेंट करत आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
एका युजरने लिहिलं, "आज शिकारीच शिकारीच्या तावडीत सापडला!" तर दुसऱ्या युजरने "कुत्र्याच्या धाडसाला सलाम" अशी कमेंट केली. आणखी एका युजरने लिहिलं, "कुत्र्याने चांगली कामगिरी केली, मला वाटलं त्याची शिकार पक्की आहे पण शेवटी डाव पलटला". या कमेंट्समधून व्हिडिओतील कुत्र्याच्या धाडसाचं अनेकांनी कौतुक केल्याचं दिसून येतं.