गावाकडच्या वाटा गजबजल्या, मुंबई-पुण्याहून लाखो चाकरमानी कोकणात दाखल
रत्नागिरी जिल्ह्यात यंदा एकूण १ लाख ६९ हजार ६६४ गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना होणार असून चाकरमानी मोठ्या संख्येने आपल्या मूळ गावी परतल्यामुळे कोकणातील गावाकडच्या वाटा गजबजून गेल्या आहेत.
वर्षभर कोकणवासीय ज्या क्षणाची आतुरतेने वाट बघत असतात, तो गणेशोत्सवाचा सोहळा आता काही तासांवर येऊन ठेपलाय. रत्नागिरी जिल्ह्यात यंदा घरगुती आणि सार्वजनिक मिळून एकूण १ लाख ६९ हजार ६६४ गणेशमूर्तींची थाटामाटात प्रतिष्ठापना होणार आहे. यात १ लाख ६९ हजार ५३८ घरगुती तर १२६ सार्वजनिक गणपतींचा समावेश आहे.
मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबादसह राज्याच्या कानाकोपऱ्यातून चाकरमानी मोठ्या संख्येने आपल्या मूळ गावी परतल्यामुळे कोकणातील गावाकडच्या वाटा गजबजून गेल्या आहेत. वर्षभर शहरात नोकरी-धंद्यासाठी राहणारे हे चाकरमानी दरवर्षी गणेशोत्सवाच्या निमित्ताने आपल्या घरी, आपल्या गावी परततात आणि त्यामुळे कोकणातील गावं पुन्हा एकदा माणसांनी भरून जातात. गणरायाच्या स्वागतासाठी घराघरांत स्वच्छता आणि पूजेच्या साहित्याची खरेदी आधीच पूर्ण झाली आहे.
घरगुती गणपतींची तालुकानिहाय आकडेवारी बघितली तर चिपळूणमध्ये सर्वाधिक १६ हजार ७२५, लांजामध्ये १६ हजार १४५, रत्नागिरी ग्रामीणमध्ये १४ हजार ७७३, गुहागरमध्ये १४ हजार ४६०, तर संगमेश्वरमध्ये १३ हजार ५४४ घरगुती गणपतींची नोंद झाली आहे. याखेरीज देवरूखमध्ये १२ हजार ४९३, खेडमध्ये १२ हजार ७००, दापोलीत ६ हजार ४७६, नाटेत ७ हजार २७९, अलोरे शिरगावमध्ये ४ हजार ५७०, जयगडमध्ये ३ हजार ४५०, पूर्णगडमध्ये ३ हजार ७६८, मंडणगडमध्ये २ हजार ९४५, दाभोळमध्ये १ हजार ४९९ आणि बाणकोटमध्ये ७६० घरगुती गणपती बसवले जाणार आहेत. या सगळ्या तालुक्यांमध्ये मिळून जिल्ह्यातील घरोघरी बाप्पाच्या आगमनाची जय्यत तयारी झाली आहे.
सार्वजनिक गणेशोत्सवाच्या बाबतीत रत्नागिरी तालुका सगळ्यात पुढे असून तिथे २६ मंडळे बाप्पाची स्थापना करणार आहेत, तर खेडमध्ये २१ मंडळे बाप्पाला विराजमान करणार आहेत. याशिवाय चिपळूणमध्ये १६, मंडणगडमध्ये ११, दापोलीत ९, राजापूर आणि देवरूखमध्ये प्रत्येकी ७, तर लांजा आणि जयगडमध्ये प्रत्येकी ६ सार्वजनिक गणपती बसवले जाणार आहेत. यावरून जिल्ह्याच्या वेगवेगळ्या तालुक्यांत सार्वजनिक मंडळांचा उत्साहही मोठ्या प्रमाणावर दिसून येतो.
गुहागरमधील श्रृंगारतळीचा राजा आणि निळकंठेश्वर हे सार्वजनिक गणपती यंदाही विशेष आकर्षणाचे केंद्र ठरतायत. रत्नागिरी शहरातही श्री रत्नागिरीचा राजा, बंदर रोडचा राजा, टिळक आळीचा राजा आणि शांतिनगरचा राजा हे मानाचे गणपती म्हणून प्रसिद्ध आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही हे मानाचे गणपती बघण्यासाठी भाविकांची गर्दी होणार आहे.
फक्त घरं आणि मंडळांपुरता हा उत्साह मर्यादित नाही, तर पोलीस स्टेशन, महावितरण कार्यालये, शासकीय दवाखाने, नगरपरिषद, जिल्हा विशेष कारागृह, बांधकाम विभाग अशा विविध सरकारी कार्यालयांतही यंदा बाप्पाचं आगमन मोठ्या उत्साहात होतंय, आणि तिथेही आकर्षक देखावे साकारले जात आहेत. सरकारी कार्यालयांतील कर्मचारीही या उत्सवात उत्साहाने सहभागी होत असल्याचं यातून दिसून येतं.