गुरुवार, 17 सप्टेंबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
00:28 IST

संजय गायकवाडांना अटक करा, आमदार रोहित पवारांचा कोथरूड पोलिस ठाण्यात ठिय्या

बुलडाण्याचे शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्याविरोधात पुण्यात गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी आमदार रोहित पवार आणि प्रकाशक प्रशांत आंबी यांनी कोथरूड पोलिस ठाण्यात दोन तास ठिय्या दिला. मात्र हे प्रकरण आधीच कोल्हापुरात न्यायप्रविष्ट असल्याने पुण्यात नवीन गुन्हा दाखल होणार नसल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं.

संजय गायकवाडांना अटक करा, आमदार रोहित पवारांचा कोथरूड पोलिस ठाण्यात ठिय्या छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

"शिवाजी कोण होता" या वादग्रस्त वक्तव्यावरून सुरू झालेला वाद आता पुण्यात पोहोचला आहे. बुलडाण्याचे शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी, अशी मागणी करत कोल्हापूरचे प्रकाशक प्रशांत आंबी आणि आमदार रोहित पवार कोथरूड पोलिस ठाण्यात पोहोचले. "पुणे पोलिस न्याय देतात, मग आम्हालाही न्याय हवा," असं म्हणत रोहित पवार, प्रशांत आंबी आणि त्यांच्या पत्नी आरती आंबी यांनी पोलिस ठाण्यात तब्बल दोन तास ठिय्या मांडला.

आमदार संजय गायकवाड यांनी प्रशांत आंबी यांना शिवीगाळ केल्याचा आरोप करत पुण्यात गुन्हा दाखल व्हावा, या मागणीसाठी हा ठिय्या देण्यात आला होता. यामुळे काही काळ कोथरूड पोलिस ठाण्यात तणावाचं वातावरण दिसून आलं. यापूर्वीच प्रशांत आंबी यांनी कोल्हापूर पोलिसांकडे आमदार गायकवाड यांच्याविरोधात तक्रार नोंदवली होती. गायकवाड यांनी फोनवरून आई-बहिणीवरून अश्लील शिवीगाळ केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली, असा आरोप आंबी यांनी केला आहे. संतोष पंडित यांच्यावर ज्याप्रमाणे गुन्हा दाखल झाला, त्याचप्रमाणे गायकवाड यांच्यावरही गुन्हा नोंदवावा, अशी मागणी आंबी यांच्या पत्नीने आणि आईने पोलिसांकडे केली.

याच प्रकरणात सोनाली त्रिंबक कांबळे यांनीही ५ सप्टेंबर रोजी कोथरूड पोलिसांकडे तक्रार अर्ज दिला आहे. सोशल मीडियावर फिरणाऱ्या एका कथित ऑडिओ क्लिपमध्ये गायकवाड आणि आंबी यांच्यातील संभाषण असल्याचा दावा या तक्रारीत करण्यात आला. या क्लिपमध्ये अश्लील शिवीगाळीसोबतच घरात घुसून मारण्याची, जीभ कापण्याची आणि ठार करण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. लोकप्रतिनिधीने अशी भाषा वापरल्यामुळे दखलपात्र गुन्हा दाखल करावा, अशी मागणी तक्रारीत करण्यात आली आहे.

चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केल्याच्या प्रकरणात कोथरूड पोलिसांनी संतोष पंडित यांच्याविरोधात तातडीने गुन्हा दाखल करून कारवाई केली होती. त्याच पद्धतीने गायकवाड यांच्याविरोधातील तक्रारीवरही पोलिसांनी तत्परतेने कारवाई करावी, अशी मागणी प्रशांत आंबी यांनी केली. आंबी कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी रोहित पवार यांनीही पोलिसांकडे गुन्हा दाखल करण्याची मागणी लावून धरली.

मात्र पोलिस उपायुक्त सागर कवडे यांनी स्पष्ट केलं की, प्रशांत आंबी यांच्याशी संबंधित याच घटनेत आधीच कारवाई सुरू असून कोल्हापुरातील राजारामपुरी पोलिस ठाण्यात हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे त्याच घटनेचा दुसरा गुन्हा पुण्यात दाखल करता येणार नाही, असं त्यांनी सांगितलं. यासोबतच चंद्रकांत पाटील यांच्यावरील टीकेप्रकरणी संतोष पंडित यांच्यावर करण्यात आलेल्या कारवाईबाबतही कवडे यांनी खुलासा केला. पंडित यांची अटक कायदेशीर असल्याचं आणि न्यायालयानेही ती योग्य ठरवल्याचं ते म्हणाले. या प्रकरणाचा पाच दिवसांत सखोल तपास पूर्ण झाला असून पंडित पोलिसांना तपासात सहकार्य करत असल्याचंही कवडे यांनी नमूद केलं.

पोलिस उपायुक्त सागर कवडे यांनी सांगितलं की, प्रशांत आंबी यांची पत्नी आरती आंबी या तक्रार देण्यासाठी आल्या होत्या. या प्रकरणात कोल्हापूरच्या राजारामपुरी पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा आधीच दाखल आहे आणि न्यायालयाने त्यात तपासाचे आदेश दिले असून तपास सुरू आहे. त्यामुळे कोथरूड पोलिस ठाण्यात नवीन गुन्हा दाखल करता येणार नाही, अशी माहिती आंबी यांना देण्यात आली. एकाच घटनेचा तपास दोन ठिकाणी होत नाही, त्यामुळे त्यांना तसं कळवण्यात आल्याचं कवडे यांनी सांगितलं.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ