Racing: मद्रास रेसिंग सर्किटवर पुण्याचा सार्थक चमकला! सुपर स्पोर्टसह इलेक्ट्रिक आरटीई गटात धमाकेदार विजय
पुण्याच्या सार्थक चव्हाणने मद्रास इंटरनॅशनल सर्किटवर एकाच वीकएंडला तीन विजेतेपदं पटकावली.
पुण्याच्या सार्थक चव्हाण या १९ वर्षीय रेसरने मद्रास इंटरनॅशनल सर्किटवर एकाच वीकएंडला तीन वेळा अव्वल क्रमांक पटकावला. एमआरएफ इंडियन नॅशनल रेसिंग चॅलेंज या स्पर्धेच्या टू-व्हीलर २०२६ या प्रकारात सार्थक हा पेट्रोनास टीव्हीएस रेसिंग या टीमकडून खेळत होता.
सुपर स्पोर्ट ३०१-४०० सीसी ओपन या मुख्य गटात सार्थकने सलग दोन शर्यती जिंकत डबल विजेतेपद मिळवलं, आणि याच स्पर्धेदरम्यान सुरू असलेल्या पेट्रोनास टीव्हीएस रेसिंग वन-मेक चॅम्पियनशीपच्या इलेक्ट्रिक आरटीई गटातही पहिला नंबर पकडत त्याने तिहेरी मुकुट मिळवला. म्हणजेच एकाच वीकएंडमध्ये सार्थकने तीन वेगवेगळ्या शर्यतींमध्ये अव्वल स्थान पटकावलं.
रविवारी झालेल्या या शर्यतीत सार्थक पोल पोझिशनवरून, म्हणजे सर्वात पुढच्या स्थानावरून शर्यत सुरू करणार होता, पण रेसच्या सुरुवातीलाच त्याला थोडा अडथळा आला. या अडथळ्यामुळे त्याचाच टीममेट रक्षित दवे याला पुढे जाण्याची संधी मिळाली आणि त्याने आघाडी घेतली. त्यानंतर दोघांनीही शेवटच्या लॅपपर्यंत आपापली जागा राखली. मात्र शेवटच्या लॅपमध्ये टर्न-४ वर सार्थकने रक्षितला ओव्हरटेक करत विजय खेचून आणला. या शर्यतीत हैदराबादचा राहिल पिल्लरीसेट्टी तिसऱ्या क्रमांकावर राहिला.
या गटातल्या दोन्ही शर्यतींमध्ये सार्थकनेच पहिला नंबर पटकावला हे विशेष सांगण्यासारखं आहे, कारण स्पर्धेच्या पात्रता फेरीत त्याला भाग घेता आला नव्हता. त्यामुळे पहिल्या शर्यतीत तो शेवटच्या क्रमांकावरून सुरू होऊनही अव्वल ठरला होता, आणि आता दुसऱ्या शर्यतीतही त्याने तेच यश पुन्हा मिळवलं.
दुसरीकडे, तीन फेऱ्यांच्या इलेक्ट्रिक आरटीई गटातही सार्थकने आपली विजयी घोडदौड कायम ठेवत पहिला क्रमांक मिळवला. या गटात बेंगळुरूचा चिरंत विश्वनाथ दुसऱ्या आणि सॅव्हियन साबू तिसऱ्या क्रमांकावर राहिले.
सार्थकसाठी हे यश नवीन नाही. याआधी एशिया रोड रेसिंग चॅम्पियनशीप म्हणजेच एआरआरसीच्या टीव्हीएस रेसिंग इंटरनॅशनल चॅम्पियनशीप या श्रेणीत मलेशियातल्या मौसमाच्या पहिल्याच फेरीत तो पोडियम विजेता ठरला होता. त्यानंतर मे महिन्यात थायलंडमधल्या बुरिराम इथल्या चांग इंटरनॅशनल सर्किटवर झालेल्या दुसऱ्या फेरीत सार्थक विजेतेपदाचा प्रमुख दावेदार मानला जात होता, आणि त्याने आपल्या कामगिरीने ते सिद्धही करून दाखवलं.
याआधी १६ ऑगस्टला मद्रास इंटरनॅशनल सर्किटवरच झालेल्या सुपर स्पोर्ट ३०१-४०० सीसी गटाच्या सहा फेऱ्यांच्या शर्यतीत सार्थकने पेट्रोनास टीव्हीएस रेसिंगकडून खेळताना नाट्यमय विजय मिळवला होता. त्या शर्यतीत बहुतांश वेळ तो तिसऱ्या स्थानावर होता, त्याच्यासमोर टीममेट चिरंत विश्वनाथ आणि हैदराबादचा राहिल पिल्लारीसेट्टी होते, पण अखेरच्या फेरीत सार्थकने दोघांनाही मागे टाकत आघाडी घेतली आणि विजेतेपद मिळवलं.