गुरुवार, 17 सप्टेंबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
02:36 IST

पेणच्या गणेशमूर्तींना दिल्लीच्या महाराष्ट्र एम्पोरियममध्ये पहिल्यांदाच स्थान, धैर्यशील पाटील यांचा पुढाकार

रायगडमधील पेणच्या पारंपरिक गणेशमूर्तींना माजी राज्यसभा खासदार धैर्यशील पाटील यांच्या प्रयत्नांमुळे दिल्लीत राष्ट्रीय व्यासपीठ मिळालं आहे, तर मुंबईतही शाडूच्या मूर्तींसाठी खास दालन उभारण्यात आलं आहे.

पेणच्या गणेशमूर्तींना दिल्लीच्या महाराष्ट्र एम्पोरियममध्ये पहिल्यांदाच स्थान, धैर्यशील पाटील यांचा पुढाकार छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

गणेशोत्सव जवळ आला की यंदा पर्यावरणपूरक बाप्पाच्या मूर्तींवर जास्त भर दिला जातोय. याच पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यातील पेणच्या प्रसिद्ध आणि पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या गणेशमूर्तीकलेला देशभर पोहोचवण्यासाठी एक मोठं पाऊल उचललं गेलं आहे. माजी राज्यसभा खासदार आणि भाजपच्या दक्षिण रायगड जिल्हाध्यक्षपदी असलेले धैर्यशील पाटील यांनी यासाठी पुढाकार घेतला असून त्यांच्या प्रयत्नांमुळे पेणच्या गणेशमूर्तींना दिल्लीतील महाराष्ट्र एम्पोरियममध्ये जागा मिळाली आहे.

पेणची पारंपरिक मूर्तिकला ही फक्त तिथल्या लोकांची ओळख नाही, तर महाराष्ट्राच्या समृद्ध कला आणि संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग मानली जाते. ही कला राज्याच्या सीमा ओलांडून देशभर पोहोचावी, या हेतूने धैर्यशील पाटील यांनी खास पुढाकार घेतला. त्यांच्या नेतृत्वाखाली आणि पेणच्या नगरसेविका पल्लवी प्रसाद कालेकर यांच्या संकल्पनेतून दिल्लीतील 'महाराष्ट्र एम्पोरियम'मध्ये पेणच्या नावाजलेल्या गणेशमूर्ती पहिल्यांदाच विक्रीसाठी आणि प्रदर्शनासाठी ठेवण्यात आल्या आहेत. यामुळे पेणमधील मूर्तिकारांच्या कलेला थेट देशभरातील ग्राहक आणि कलाप्रेमींपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली आहे.

या उपक्रमाला फक्त पाठिंबा देऊन धैर्यशील पाटील थांबले नाहीत, तर त्यांनी स्वतः दिल्लीतील या प्रदर्शन केंद्राला भेट दिली. तिथे जाऊन त्यांनी पेणच्या मूर्तिकारांची आणि कलाकारांची आपुलकीने विचारपूस केली, त्यांच्या कामाची माहिती घेतली आणि त्यांना प्रोत्साहन दिलं. पेणच्या गणेशमूर्तीकलेला दिल्लीच्या माध्यमातून देशभर ओळख मिळण्याची ही संधी ऐतिहासिक ठरू शकते. यामुळे स्थानिक कलाकारांच्या पारंपरिक कलेला मोठी बाजारपेठ मिळेलच, शिवाय पेणच्या नावाची देशभरात ओळखही तयार होईल.

दुसरीकडे मुंबईतल्या गणेशभक्तांसाठीही पेणच्या मूर्तिकारांनी बनवलेल्या पर्यावरणपूरक शाडूच्या मूर्ती उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळाच्या माध्यमातून कुलाब्यातील वर्ल्ड ट्रेड सेंटरमधील 'मराठी महाराष्ट्र एम्पोरियम'मध्ये पेणच्या मूर्तिकार आणि महिला बचत गटांनी तयार केलेल्या सुबक शाडूच्या मूर्ती विक्रीला ठेवण्यात आल्या आहेत. महामंडळाच्या सहव्यवस्थापकीय संचालिका प्रशाली दिगावकर यांच्या प्रयत्नातून हा उपक्रम राबवला गेला. 'मराठी महाराष्ट्र एम्पोरियम'मधील शॉप नंबर A-30 इथे भाविकांना या मूर्ती खरेदी करता येतील.

पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी यंदा शाडूच्या मातीपासून बनवलेल्या मूर्तींना विशेष महत्त्व मिळालं आहे. या मूर्ती विसर्जनाच्या वेळी पाण्यात लवकर विरघळत असल्याने जलप्रदूषण कमी होण्यास मदत होते. मिळालेल्या माहितीनुसार, या मूर्ती साधारण 15 ते 20 मिनिटांत पाण्यात विरघळतात. यंदा माती, वाहतूक आणि रंगांच्या किमती वाढल्यामुळे गणेशमूर्तींच्या दरातही थोडी वाढ झाली आहे. पण पीओपी आणि शाडूच्या मूर्तींच्या किमतीत फार मोठा फरक नसल्याने पर्यावरणपूरक मूर्ती घेताना भाविकांच्या खिशावर जास्त ताण पडणार नाही.

एकीकडे दिल्लीत पेणच्या पारंपरिक गणेशमूर्तीकलेला राष्ट्रीय पातळीवरचं व्यासपीठ मिळालं आहे, तर दुसरीकडे मुंबईत शाडूच्या मूर्तींच्या विक्रीसाठी खास दालन उपलब्ध झालं आहे. त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव पेणमधील मूर्तिकार आणि महिला बचत गटांसाठी आर्थिकदृष्ट्या तसंच त्यांच्या कलेचा प्रसार होण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे. गणेशमूर्ती खरेदी करू इच्छिणाऱ्या भाविकांनी 7767057056 या क्रमांकावर संपर्क साधावा, असं आवाहन करण्यात आलं आहे. पेणची शतकानुशतके जपलेली गणेशमूर्तीकला आता दिल्लीपासून मुंबईपर्यंत पोहोचल्यामुळे या पारंपरिक कलेचा राष्ट्रीय पातळीवर गौरव होतोय.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ