NPCI कडून eNACHLite लाँच, आता ऑटो-डेबिट पेमेंट अॅपमधूनच होणार पूर्ण
EMI, विमा हप्ते आणि SIP सारख्या ऑटो-डेबिट पेमेंटमध्ये होणारा त्रास आता कमी होणार, NPCI ने नवं फीचर आणलं आहे.
कर्जाचा EMI असो, विम्याचा हप्ता असो किंवा म्युच्युअल फंडाची SIP असो, या सगळ्यांचं ऑटो-डेबिट पेमेंट अनेकदा फेल होतं आणि ग्राहकांना याचा चांगलाच त्रास सहन करावा लागतो. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजेच NPCI ने मुंबईत झालेल्या ग्लोबल फिनटेक फेस्ट २०२६ मध्ये eNACHLite हे नवं फीचर लाँच केलं आहे.
या फीचरमुळे कर्जाचे EMI, विम्याचे हप्ते आणि SIP सारख्या ऑटो-डेबिट कमांड सेट करणं आता खूपच सोपं होणार आहे. हैदराबादमधील व्हिओना फिनटेक या NPCI-सर्टिफाइड टेक्नोलॉजी सर्विस प्रोवाइडर कंपनीने हे फीचर पूर्णपणे तयार करून त्याची चाचणी घेतली आहे. बँका आणि कर्जदात्या संस्थांना या नव्या सुविधेशी लवकरात लवकर जोडून घेता यावं, यासाठी हे फीचर तयार करण्यात आलं आहे.
आतापर्यंत जेव्हा एखादा ग्राहक EMI, विम्याचा हप्ता किंवा म्युच्युअल फंडासाठी ऑटो-डेबिट सेट करायचा, तेव्हा अॅप त्याला बाहेरच्या वेब ब्राउझर पेजवर रिडायरेक्ट करायचं. तिथून पुढे पेज स्लो चालणं, अॅप क्रॅश होणं किंवा काही तांत्रिक बिघाड होणं यामुळे ही प्रक्रिया अनेकदा अर्धवट राहायची. यामुळे ग्राहकांमध्ये नाराजी वाढत होती आणि बँकांच्या कॉल सेंटरमध्ये तक्रारींचा ओघ लागला होता.
eNACHLite आल्यानंतर आता बाहेरच्या वेब पेजवर जाण्याची गरजच उरणार नाही. सगळे व्यवहार आता एकाच अॅपमध्ये पूर्ण करता येतील आणि ग्राहकाला अॅपमधून बाहेर पडावं लागणार नाही. मँडेट सेट करणं, त्यात बदल करणं, ते थांबवणं किंवा रद्द करणं, हे सगळं आता अॅपमधूनच करता येईल. ग्राहकाला अॅपच्या स्क्रीनवर सगळे तपशील दिसतील, त्यानंतर कार्ड किंवा आधार वापरून तो आपली ओळख पडताळून घेईल आणि मोबाईलवर आलेला OTP टाकल्यावर काही सेकंदातच ही प्रक्रिया पूर्ण होईल. एखादा व्यवहार अयशस्वी झालाच, तर तो नेमका कशामुळे फेल झाला हे सिस्टम स्पष्टपणे सांगेल, हे या फीचरचं आणखी एक वैशिष्ट्य आहे.
तांत्रिक अडचणी दूर झाल्यामुळे बँकांनाही याचा फायदा होणार आहे. जास्तीत जास्त ग्राहकांना त्यांचं पेमेंट पूर्ण करता येईल, त्यामुळे कॉल सेंटरमधल्या तक्रारींची संख्या लक्षणीयरीत्या कमी होईल आणि पेमेंट फेल का झालं हे लगेच कळल्यामुळे कस्टमर केअरला तात्काळ मदत करता येईल. शिवाय बँकांना यासाठी वेगळं अॅप बनवण्याची गरज पडणार नाही, कारण व्हिओना फिनटेकसारख्या NPCI-प्रमाणित कंपन्या तांत्रिक पायाभूत सुविधा आणि सुरक्षेची जबाबदारी सांभाळतील. ग्राहकांचे कार्ड आणि ओळखीचे संवेदनशील तपशील NPCI च्या सुरक्षित प्रणालीतच साठवले जाणार असल्यामुळे डेटा लीक होण्याचा धोकाही राहणार नाही.