राजुरातील घरासमोरून चोरीला गेलेली बुलेट वर्ध्यात सापडली, एकाला अटक
चुनाळा येथून चोरीला गेलेली रॉयल एनफिल्ड बुलेट राजुरा पोलिसांच्या डीबी स्क्वॉडने वर्धा जिल्ह्यातून शोधून काढली.
राजुरा पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने (डीबी स्क्वॉड) एक मोठी कारवाई करत चोरीला गेलेली रॉयल एनफिल्ड बुलेट अवघ्या काही दिवसांत शोधून काढली आहे. चुनाळा येथून चोरीला गेलेली ही काळ्या रंगाची बुलेट पोलिसांनी हस्तगत केली असून या प्रकरणात वर्धा जिल्ह्यातील एका २१ वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे. जप्त केलेल्या बुलेटची किंमत साधारण एक लाख रुपये आहे.
राजुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चुनाळा भागात एका नागरिकाने आपल्या घरासमोर काळ्या रंगाची रॉयल एनफिल्ड क्लासिक मोटारसायकल उभी करून ठेवली होती. १२ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री अकरा वाजल्यापासून १ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी अकरा वाजेपर्यंतच्या काळात कोणीतरी अज्ञात चोरट्याने ही बुलेट पळवून नेली. गाडी चोरीला गेल्याचं लक्षात येताच फिर्यादीने लगेच राजुरा पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली. या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध अपराध क्रमांक ७१३/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३(२) खाली चोरीचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.
हा गुन्हा गंभीर असल्याने ठाणेदार पोलीस निरीक्षक नितीन चिंचोळकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक लक्ष्मण लोकरे आणि त्यांच्या टीमने समांतर तपास हाती घेतला. एका गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे पथकाने वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील तलोडी (कुटकी) या गावात छापा टाकला. तिथे सापळा रचून पोलिसांनी अनुराग प्रवीण धाबर्डे (वय २१, व्यवसाय मजुरी, राहणार तलोडी कुटकी, जि. वर्धा) याला ताब्यात घेतलं. चौकशी केल्यावर त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक करून त्याच्याकडून चोरीची काळी रॉयल एनफिल्ड क्लासिक मोटारसायकल (क्रमांक MH 34 AX 1120) जप्त केली, जिची किंमत साधारण १ लाख रुपये आहे.
ही कारवाई चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी तथा सहाय्यक पोलीस अधीक्षक कुमार सुशांत यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यात पोलीस निरीक्षक नितीन चिंचोळकर, डीबी प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक लक्ष्मण लोकरे, सहायक फौजदार किशोर तुमराम, पोलीस हवालदार विक्की निर्वाण, पोलीस हवालदार अनुप डांगे तसेच पोलीस अंमलदार शफीक शेख, मिलिंद जांभुळे, महेश बोलगोडवार, रमेश बस्सी आणि राजीव दुबे यांचा सहभाग होता. पोलिसांच्या या तत्पर कारवाईमुळे वाहनचोरी करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.