पाटण पटोला साडी तीन पिढ्या टिकते, किंमत लाखोंच्या घरात का असते जाणून घ्या
गुजरातच्या पाटण भागातील पटोला साडी विणण्याच्या खास पद्धतीमुळे शतकानुशतके नवीकोरी राहते आणि तिची किंमत लाखो रुपयांपर्यंत जाते.
भारतीय संस्कृतीत साड्यांना नेहमीच खास स्थान मिळालेलं आहे. यातल्या अनेक साड्या जगभर ओळखल्या जातात, आणि त्यात गुजरातच्या पाटण भागातील पटोला साडीचा आवर्जून उल्लेख करावा लागतो. पटोला साड्या मुळातच महाग असतात, पण पाटण पटोलामध्ये असं नेमकं काय खास असतं की तिची किंमत थेट लाखो रुपयांपर्यंत जाते, हा प्रश्न अनेकांना पडतो.
उत्तम दर्जाच्या साड्यांची किंमत साधारणपणे काही हजार रुपयांच्या घरात असते, पण एक अस्सल पाटण पटोला साडी एक लाख ते दहा लाख रुपये किंवा त्याहूनही जास्त किमतीला मिळते. एकाच साडीसाठी इतके पैसे का मोजावे लागतात, हे ऐकून कोणालाही आश्चर्य वाटेल. या साडीत नेमकं काय वेगळेपण आहे, ते समजून घेतलं की जगातील सर्वात महाग साड्यांमध्ये पटोलाचा समावेश का होतो, हे लक्षात येतं.
पाटण पटोलाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे तिची विणण्याची पद्धत. ही साडी डबल इकत या तंत्राने विणली जाते. सर्वसाधारणपणे साडी आधी विणली जाते आणि नंतर रंगवली जाते, किंवा धाग्यापासूनच थेट डिझाइन तयार केलं जातं. पण पटोला साडी या दोन्ही पद्धतींपेक्षा वेगळी बनवली जाते. इथे विणण्याआधीच ताणा आणि बाणा हे दोन्ही धागे रंगवले जातात. या साडीचे विणकर इतके कुशल आणि अनुभवी असतात की कोणत्या जागी कोणता धागा कशी नक्षी तयार करणार, हे त्यांना आधीच माहीत असतं. यात एक साधी चूक झाली तरी संपूर्ण साडीची नक्षी बिघडू शकते.
या साडीचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ती दोन्ही बाजूंनी अगदी सारखीच दिसते. एरवी कोणतीही साडी बघितली की तिची योग्य बाजू कोणती आणि उलट बाजू कोणती, हे लगेच कळतं. पण पटोला साडीच्या बाबतीत असं होत नाही. रंग, चमक आणि नक्षी या तिन्ही गोष्टी दोन्ही बाजूंनी सारख्याच दिसतात, इतकी नाजूकपणे ही साडी विणलेली असते की बघून ते लक्षातही येत नाही.
एक अस्सल पाटण पटोला साडी पूर्णपणे हाताने विणली जाते, त्यासाठी कोणत्याही यंत्राचा वापर केला जात नाही. त्यामुळे साधी पटोला साडी तयार व्हायलाही किमान सहा महिने ते एक वर्ष लागतो. नक्षी जास्त गुंतागुंतीची असेल तर यापेक्षाही जास्त वेळ लागतो. विणकरांची ही महिनोंमहिने चालणारी मेहनतच या साडीला इतकं मोल देते.
कोणतीही साडी कितीही महाग असली तरी काही काळाने तिची चमक कमी होते, पण पाटण पटोला साडी मात्र शतकानुशतके नव्यासारखीच राहते. यामागचं कारण म्हणजे यात रासायनिक रंग वापरले जात नाहीत, फक्त नैसर्गिक रंगांचाच वापर केला जातो. एक अस्सल पटोला साडी जवळपास ३०० वर्षे नव्यासारखी टिकते, म्हणजेच एकच साडी तीन पिढ्यांपर्यंत वापरता येते.