बीड हत्याकांड: नगरसेवक अल्ताफ पठाण यांच्या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल, पोलिसांचा शोध सुरू
लातूरमधील बाबा शेख हत्या प्रकरणात नवा व्हिडिओ समोर आला असून त्यात परळीचे नगरसेवक अल्ताफ पठाण मारहाण करताना दिसत आहेत.
लातूरमधील बाबा शेख हत्या प्रकरणात आता एक नवा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत माजी मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय आणि परळीचे नगरसेवक अल्ताफ खान सरदार खान पठाण हे मारहाण करताना स्पष्ट दिसत आहेत. या घटनेमुळे लातूरसोबतच परळी शहरही हादरून गेलं असून प्रकरणाचा तपास लातूर पोलीस करत आहेत. आरोपी नगरसेवक अल्ताफ पठाण आणि इतर दोन आरोपी फॉर्च्युनर गाडीतून फरार झाल्याची माहिती पुढे आली आहे. अल्ताफ पठाण हे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) अल्पसंख्याक सेलचे परळी तालुकाध्यक्ष असल्याचंही समोर आलं आहे. फरार आरोपींना पकडण्यासाठी लातूर पोलिसांचं पथक रवाना झालं आहे.
बुधवारी, म्हणजे 16 सप्टेंबरला रात्री लातूरच्या उस्मानपुरा भागातील आमिर हॉटेलबाहेर तुफान हाणामारी झाली, त्यात शेख मन्सूर अली उर्फ बाबा शेख यांचा जागीच मृत्यू झाला आणि त्यामुळे एकच खळबळ उडाली. या प्रकरणात परळीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक अल्ताफ खान सरदार खान पठाण यांच्यासह तिघांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जुन्या आर्थिक व्यवहारातून घडलेल्या या हत्याकांडामुळे लातूर आणि बीड जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
तक्रारीनुसार, मयत शेख मन्सूर अली आणि त्यांचा भाऊ हैदर अली यांना वाळू व्यवसायात भागीदार करून घेण्यासाठी नगरसेवक अल्ताफ पठाण यांनी 10 लाख रुपये घेतले होते. याच 10 लाखांच्या जुन्या पैशांच्या देवाणघेवाणीवरून दोन्ही बाजूंमध्ये आधीपासूनच तणाव होता. बुधवारी रात्री हॉटेलमध्ये दोन्ही बाजू समोरासमोर आल्यावर याच 10 लाखांच्या वादावरून पुन्हा ठिणगी पडली.
परळीहून बांधकामाच्या कामासाठी बिदरकडे निघालेले तरुण रात्री साडेदहाच्या सुमारास लातूरच्या आमिर हॉटेलमध्ये जेवायला थांबले होते. तिथे आधीच बसलेल्या अल्ताफ पठाण आणि त्यांच्या साथीदारांशी त्यांचा वाद झाला. वाद वाढल्यामुळे हॉटेल मालकाने सगळ्यांना बाहेर जायला सांगितलं. हॉटेलबाहेर आल्यावर आरोपींनी गाडीतून धारदार शस्त्रं काढली. आरोपानुसार, अल्ताफ पठाण यांनी थेट कोयत्याने मन्सूर अलीवर वार केला, तर उमर शेख यांनी चाकूने आणि खालेद शेख यांनी फरशी टोकल्याने वार केले. मध्ये सोडवायला गेलेल्या दोघांवरही आरोपींनी हल्ला केला, त्यांच्यावर सध्या लातूरच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या मारहाणीचा काही भाग परिसरातील एका दुकानाच्या सीसीटीव्हीत कैद झाला आहे आणि नगरसेवक अल्ताफ पठाण मारहाण करतानाचा हाच व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. घटनेनंतर सर्व आरोपी गाडीतून फरार झाले असून लातूरच्या शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.