अभ्यासात AI चा जास्त वापर धोक्याचा; OECD अहवालात विद्यार्थ्यांच्या कमी गुणांचा उलगडा
OECD च्या PISA अहवालातून समोर आलं की, होमवर्क आणि असाइनमेंटसाठी सतत AI चॅटबॉट्सवर अवलंबून राहणाऱ्या विद्यार्थ्यांचे टेस्ट स्कोर कमी आहेत.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
शाळा-कॉलेजमधल्या मुलांसाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स आता अभ्यासाचा एक भाग बनून गेलंय. होमवर्क असो, असाइनमेंट असो किंवा एखादं संशोधन, विद्यार्थी सध्या हरतऱ्हेचे प्रश्न AI चॅटबॉट्सना विचारून उत्तरं मिळवत असतात. पण OECD ने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या एका अहवालातून एक अशी गोष्ट समोर आलीय, जी विद्यार्थी, पालक आणि शिक्षक या सगळ्यांना विचार करायला लावणारी आहे. अभ्यासाच्या कामासाठी AI वापरणाऱ्या मुलांचे टेस्ट स्कोर, AI न वापरणाऱ्या मुलांच्या तुलनेत कमी भरलेत, असं या अहवालात नमूद केलंय.
हा अभ्यास १५ वर्षे वयोगटातल्या विद्यार्थ्यांवर करण्यात आला. यात एक गोष्ट स्पष्ट दिसून आली - जी मुलं लिखित असाइनमेंटसाठी AI चा वापर एकतर करतच नाहीत किंवा फार कमी करतात, त्यांनी विज्ञान परीक्षेत सरासरी ५०९ गुण मिळवले. याउलट, जवळपास रोजच्या रोज AI ची मदत घेणाऱ्या मुलांचा सरासरी स्कोर फक्त ४८१ इतका होता. म्हणजे दोन्ही गटांमध्ये तब्बल २८ गुणांचा फरक दिसतो. विशेष म्हणजे, सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती यासारखे घटक विचारात घेतल्यानंतरही हा फरक तसाच राहिला. OECD च्या मते हा फरक जवळपास दीड वर्षाच्या अभ्यासाइतका मोठा आहे. म्हणजेच AI च्या मदतीने काम पटकन उरकणाऱ्या विद्यार्थ्यांची कामगिरी आपोआप चांगली होईल, असं अजिबात नाही.
फक्त असाइनमेंट लिहिण्यापुरताच नाही, तर नवीन विषय समजून घेण्यासाठी किंवा पुस्तकातला मोठा मजकूर आटोपशीर करून घेण्यासाठीही मुलं AI कडे वळतात. आणि इथेही तेच चित्र दिसतं - जी मुलं AI चा जास्त वापर करतात, त्यांची कामगिरी तुलनेने खालावलेली आहे.
OECD चे शिक्षण आणि कौशल्य विभागाचे संचालक एंड्रियास श्लाइशर यांनी यावर एक महत्त्वाचा मुद्दा मांडलाय. त्यांच्या मते, अभ्यास तेव्हाच खऱ्या अर्थाने उपयोगी ठरतो, जेव्हा विद्यार्थी स्वतः एखादा विषय समजून घ्यायचा प्रयत्न करतो, त्यावर स्वतः विचार करतो आणि समस्या स्वतः सोडवायचा प्रयत्न करतो. जर AI विद्यार्थ्याच्या जागी सगळी कामं करू लागलं, तर शिकण्याची ही प्रक्रियाच कमकुवत होऊ शकते, असं त्यांचं म्हणणं आहे.
तरीही या अहवालात AI ला पूर्णपणे नाकारलेलं नाही. उलट, विद्यार्थ्यांनी त्याचा योग्य पद्धतीने वापर करावा, असा सल्ला दिलाय. एखादा अवघड विषय समजून घेण्यासाठी, उदाहरणं बघण्यासाठी किंवा तयारी अधिक पक्की करण्यासाठी AI चा वापर नक्कीच करता येतो. पण प्रत्येक उत्तरासाठी, प्रत्येक असाइनमेंटसाठी आणि प्रत्येक संशोधनासाठी जर विद्यार्थी पूर्णपणे AI वर अवलंबून राहिले, तर त्यांची स्वतः विचार करण्याची आणि शिकण्याची क्षमताच कमी होऊ शकते.
हा अहवाल OECD च्या PISA या मोठ्या अभ्यासावर आधारलेला आहे. PISA मध्ये १५ वर्षे वयोगटातल्या विद्यार्थ्यांच्या गणित, विज्ञान आणि वाचनाच्या क्षमतेचं मूल्यांकन केलं जातं. यावेळच्या अभ्यासात ९१ देशांमधल्या ७.६ लाखांहून जास्त विद्यार्थ्यांचा समावेश करण्यात आला होता, त्यामुळे यातून समोर आलेली आकडेवारी शिक्षण क्षेत्रात खूप महत्त्वाची मानली जातेय. अहवालाचा एकंदर सूर स्पष्ट आहे - AI चा वापर जरूर करा, पण स्वतःच्या विचारांची आणि मेहनतीची जागा त्याला घेऊ देऊ नका.