गुरुवार, 17 सप्टेंबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
00:27 IST

पारंपरिक शेतीऐवजी उद्योगांवर भर द्यावा, शरद पवारांचे मत

मराठा इंटरप्रेनर्स असोसिएशनच्या कार्यक्रमात शरद पवार आणि रोहित पवार यांनी महाराष्ट्रातील उद्योग आणि पायाभूत सुविधांवर भाष्य केले.

पारंपरिक शेतीऐवजी उद्योगांवर भर द्यावा, शरद पवारांचे मत
एआई से बनाई गई प्रतीकात्मक तस्वीर; यह घटना का वास्तविक फोटो नहीं है | PT24

देश स्वतंत्र झाला तेव्हा लोकसंख्या 35 कोटी होती, आता लोकसंख्या वाढली पण जमीन तेवढीच राहिली आहे, त्यामुळे शेतीला जमीन कमी पडते आहे, असे माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार म्हणाले. पारंपारिक शेती प्रत्येकाला रोजगार देऊ शकत नाही, त्यामुळे पारंपारिक शेतीपेक्षा महाराष्ट्रात विविध व्यवसाय आणि उद्योगांवर लक्ष केंद्रित करायला हवे, तरच राज्य पुढच्या काळात वेगाने प्रगती करू शकेल, असे मत त्यांनी मांडले.

पुण्यात मराठा इंटरप्रेनर्स असोसिएशनच्या आंतरराष्ट्रीय एक्स्पो 2027 प्रदर्शनाच्या ब्रोशरचे प्रकाशन शरद पवार यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला आमदार रोहित पवार, असोसिएशनचे अध्यक्ष विक्रम गायकवाड, माजी अध्यक्ष अंकुश आसबे, अरुण निमन, सई पाटील, सायली काळे आणि खजिनदार राजेश कुराडे उपस्थित होते.

उद्योगांचे जितके जास्त विकेंद्रीकरण होईल तितका त्याचा फायदा समाजातील तळागाळापर्यंत, खासकरून ग्रामीण भागापर्यंत पोहोचेल, असे शरद पवार यांनी सांगितले. एकेकाळी मुंबई ही औद्योगिक राजधानी होती, पण उद्योगांचे प्रमाण कमी होत असताना मुंबईत आर्थिक राजधानी कशी उभी राहील यासाठी आपण राज्याचे प्रमुख असताना प्रयत्न केले, आणि त्याचाच परिणाम म्हणून आज मुंबई देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते, असे ते म्हणाले. उद्योग क्षेत्राबाबत निर्णय घेताना राजकीय इच्छाशक्ती भक्कम असणे गरजेचे असते, आणि पायाभूत सुविधा सक्षम झाल्या तरच महाराष्ट्रातील उद्योग राज्याबाहेर जाणार नाहीत आणि त्यातून तयार होणारा रोजगार मराठी तरुणांच्या हातून निसटणार नाही, असेही त्यांनी नमूद केले.

आमदार रोहित पवार यांनी सांगितले की, अपुऱ्या पायाभूत सुविधांमुळे चाकणमधील उद्योजक महाराष्ट्राबाहेर जात आहेत, आणि हिंजवडीतील वाहतूक कोंडी अजूनही कायम आहे. अशा वेळी राज्यकर्त्यांनी पायाभूत सुविधांकडे लक्ष द्यायला हवे, असे ते म्हणाले. व्यावसायिक दृष्ट्या सगळ्यात महाग वीज महाराष्ट्रात मिळते, त्यामुळे उद्योगांना आकर्षित करणे अवघड जाते, असे त्यांनी सांगितले. डेटा सेंटर म्हणजे गुंतवणूक नव्हे, कारण दोन हजार कोटींच्या डेटा सेंटरमध्ये फक्त 200 लोकांना रोजगार मिळण्याची क्षमता असते, असे रोहित पवार म्हणाले. महाराष्ट्रात परकीय गुंतवणूक आली तरी त्याचा फायदा राज्यातील उद्योग-व्यवसाय वाढण्यासाठी झाला पाहिजे, तरच खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातील तरुण रोजगारक्षम आणि उद्योगक्षम होतील, असे त्यांनी सांगितले.

विक्रम गायकवाड म्हणाले की, महाराष्ट्रात 35 टक्के इतक्या मोठ्या संख्येने असलेला मराठा समाज उद्योग-व्यवसायात मात्र केवळ एक ते दोन टक्के आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी मराठा इंटरप्रेनर्स असोसिएशन काम करत आहे. मराठी तरुणांमध्ये नोकरी करण्याऐवजी उद्योग-व्यवसाय वाढवण्याची मानसिकता कशी तयार करता येईल, यासाठी असोसिएशन प्रयत्नशील असून 14 ते 17 वयोगटातील तरुणांना एक लाख रुपयांची औद्योगिक शिष्यवृत्ती दिली जाणार आहे, त्यातून तरुण उद्योजक घडवण्यास मदत होईल, असे त्यांनी सांगितले.

याच कार्यक्रमात असोसिएशनच्या अहिल्यानगर चाप्टरचे उद्घाटनही शरद पवार यांच्या हस्ते झाले. असोसिएशनचा बिझनेस एक्सपो यशस्वी करण्यासाठी सहकार्य केल्याबद्दल गणेश सातपुते, रवी घाटे, दिपाली चव्हाण, मोनिका बढाया, निलेश चव्हाण, विनोद जाधव, जगदीश कदम, विलास यादव, सागर यादव, राजू भिसे, महेश भागवत, सचिन खाटपे, चंद्रकांत गायकवाड, सुहास आदमाने, अंकुश आजबे, तेजराज पाटील, विक्रम गायकवाड, रोहन बिल्डर्स, मोहर ग्रुप डिजिटल डॅम, जवाहर चोरगे, सतीश कोकाटे, मधुकर चोरगे, योगेश पासलकर, अजयसिंह देसाई आणि पू. ना. गाडगीळ यांचा यावेळी सन्मान करण्यात आला.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ