पनवेल-कर्जत नवीन लोकल मार्गिकेचे 99 टक्के काम पूर्ण, CRS मंजुरीची प्रतीक्षा
नवी मुंबई आणि कर्जत परिसरातील प्रवाशांसाठी 2,782 कोटी रुपयांचा पनवेल-कर्जत रेल्वे मार्ग प्रकल्प अंतिम टप्प्यात आला आहे.
पनवेल आणि कर्जत भागातील रेल्वे प्रवाशांसाठी एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. या दोन शहरांना जोडणाऱ्या नव्या उपनगरी रेल्वे मार्गिकेचे बांधकाम आता पूर्णत्वाकडे झुकले असून, प्रकल्पाचे जवळपास 99 टक्के काम संपले आहे. उरलेली तांत्रिक कामे आणि चाचण्या सध्या वेगाने चालू आहेत. रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून (CRS) सुरक्षा मंजुरी मिळाल्यावर या मार्गावर नियमित लोकल सेवा सुरू करण्याचा मार्ग खुला होईल.
मुंबई रेल्वे विकास महामंडळाने (MRVC) मुंबई नागरी परिवहन प्रकल्प-3 (MUTP-3) या योजनेअंतर्गत पनवेल-कर्जत दरम्यान दुहेरी रेल्वे मार्गिका उभारण्याचे काम हाती घेतले आहे. या प्रकल्पासाठी सुमारे 2,782 कोटी रुपये खर्च येणार आहे. सध्या पनवेल आणि कर्जत यांच्यात थेट उपनगरी रेल्वे जोडणी नसल्यामुळे प्रवाशांना जास्त वेळ प्रवासात घालवावा लागतो. नवीन मार्गिका सुरू झाल्यावर हा प्रवास अधिक सोपा आणि जलद होईल असा अंदाज आहे.
या मार्गावर एकूण पाच स्थानके असणार आहेत - पनवेल, चिखले, पोयंजे, चौक आणि कर्जत. आधी 'मोहापे' या नावाने ओळखले जाणारे स्थानक आता 'पोयंजे' या नव्या नावाने ओळखले जाईल. मार्गिकेत तीन बोगदे असून त्यांची एकूण लांबी सुमारे 3.164 किलोमीटर इतकी आहे. यातील वावर्ले बोगदा 2.625 किलोमीटर लांबीचा असून तो मुंबईच्या उपनगरी रेल्वे जाळ्यातील सर्वात लांब बोगद्यांपैकी एक ठरणार आहे. डोंगराळ भागातून मार्ग नेण्यासाठी आधुनिक अभियांत्रिकी तंत्रज्ञान वापरले गेले आहे.
प्रकल्पातील बोगद्यांचे खोदकाम आणि अंतिम टप्प्यातील काम पूर्ण झाले आहे. याशिवाय मोठे-छोटे पूल, पाच उड्डाणपूल आणि 16 भुयारी मार्ग यांचाही यात समावेश आहे, त्यातील काही काम अद्याप अंतिम टप्प्यात आहे. पुणे द्रुतगती महामार्गाखालील भुयारी मार्गातील रेल्वे ट्रॅक जोडणीचे कामही पूर्ण झाले आहे.
स्थानकांच्या बाबतीत बोलायचे झाल्यास, नवीन पनवेल स्थानक आधीच कार्यान्वित झाले असून चिखले आणि पोयंजे स्थानकांच्या इमारतींचे बांधकाम पूर्ण झाले आहे. चौक आणि कर्जत स्थानकांवर मात्र फलाट, सर्क्युलेटिंग एरिया, कव्हर ओव्हर प्लॅटफॉर्म, उद्वाहक आणि सरकते जिने यासह इतर प्रवासी सुविधांचे काम अजून अंतिम टप्प्यात आहे.
सिग्नल यंत्रणेच्या कामालाही आता वेग आला आहे. पोयंजे आणि चौक येथे इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगसाठी आवश्यक असलेल्या फॅक्टरी ॲक्सेप्टन्स टेस्ट (FAT) आणि साइट ॲक्सेप्टन्स टेस्ट (SAT) यशस्वीरित्या पार पडल्या आहेत. दूरसंचार यंत्रणेसह इतर रेल्वे संबंधित कामेही सध्या सुरू आहेत. उरलेल्या तांत्रिक चाचण्या पूर्ण झाल्यावर CRS कडून या मार्गाची सुरक्षा तपासणी होईल आणि त्यांची मंजुरी मिळाल्यावरच नियमित लोकल सेवा सुरू करता येईल.
MRVC ने हा संपूर्ण प्रकल्प डिसेंबर 2026 पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. शंभर टक्के काम पूर्ण झाल्यानंतर ही मार्गिका मध्य रेल्वेकडे सुपूर्द केली जाईल, त्यानंतरच लोकल सेवा सुरू करण्याबाबतचा अंतिम निर्णय घेतला जाईल. मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पनवेल-कर्जत दरम्यान लोकल सेवा साधारणपणे जानेवारी 2028 पर्यंत सुरू होण्याची शक्यता आहे.
ही नवी मार्गिका कार्यान्वित झाल्यावर पनवेल, नवी मुंबई, चौक, कर्जत आणि आसपासच्या परिसरातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. त्यामुळे या मार्गावरील लोकल सेवेकडे प्रवाशांचे लक्ष लागून राहिले आहे.