गुरुवार, 17 सप्टेंबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
02:39 IST

पॅनिक अटॅक आल्यास घाबरू नका, अशी घ्या स्वतःची काळजी

हृदयाचे ठोके वाढणे, घाम फुटणे, चक्कर येणे अशी लक्षणे दिसल्यास काय करावे याबद्दलची माहिती.

पॅनिक अटॅक आल्यास घाबरू नका, अशी घ्या स्वतःची काळजी
एआई से बनाई गई प्रतीकात्मक तस्वीर; यह घटना का वास्तविक फोटो नहीं है | PT24

अचानक हृदयाची धडधड वाढते, ठोके वेगाने पडायला लागतात, छातीत अस्वस्थ वाटायला लागतं, श्वास घ्यायला त्रास होतो, अंगाला घाम फुटतो, प्रचंड भीती वाटायला लागते, थरकाप उडतो आणि चक्कर येते... ही सगळी लक्षणं अनेकांना अचानक जाणवतात. मनात निर्माण झालेल्या भीतीमुळे शरीराचं संतुलन बिघडतं आणि त्याचा परिणाम शरीराच्या कामकाजावर होतो. मनावरचा ताबा अचानक सुटल्यामुळे चक्कर आल्यासारखं किंवा तोल गेल्यासारखं वाटतं.

ही लक्षणं कोणत्याही सामान्य आजाराची नसतात, तर पॅनिक अटॅक आल्यानंतर दिसतात. हार्ट अटॅक आणि पॅनिक अटॅक यात खूप फरक आहे, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मनातली वाढलेली भीती शरीरातली लक्षणं अधिक तीव्र करते आणि त्यामुळे तब्येत बिघडते. वेळेनुसार लक्षणं वाढत गेली, तर डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य उपचार घेणं आवश्यक आहे. पॅनिक अटॅक आल्यावर स्वतःचा बचाव कसा करायचा, ते पाहूया.

सगळ्यात आधी मनात कोणतीही भीती येऊ द्यायची नाही. पॅनिक अटॅक आला किंवा त्याची लक्षणं दिसायला लागली, तर शांत राहणं खूप महत्त्वाचं आहे. नाहीतर लक्षणं आणखी वाढतात. घाबरल्यासारखं वाटलं तरी त्या ठिकाणाहून पळून जाण्याऐवजी तिथेच शांतपणे बसून राहावं. काही वेळाने त्रास आपोआप कमी होतो आणि शरीर हळूहळू पुन्हा नॉर्मल होतं. स्वतःच्या मनाला सतत सांगत राहावं, की काही मिनिटांत मी ठीक होईन. शरीरात होणारा प्रत्येक बदल पाहून घाबरून जाऊ नये.

श्वासोच्छवासावर नियंत्रण ठेवणं हा दुसरा महत्त्वाचा उपाय आहे. पॅनिक अटॅक आल्यानंतर जोरात किंवा वेगाने श्वास घेतला, तर चक्कर येणे, सुन्नपणा आणि श्वास कोंडणे असा त्रास वाढू शकतो. त्यामुळे श्वासावर नियंत्रण ठेवणं गरजेचं असतं. खूप खोल किंवा मोठा श्वास न घेता हळूवार आणि नियमित पद्धतीने श्वास आत घ्यावा आणि बाहेर सोडावा. पोटातून हळूवार श्वास घेतल्याने मज्जासंस्थेतली शिथिलीकरण यंत्रणा सक्रिय होते आणि त्यामुळे हृदयाचे ठोके पुन्हा नॉर्मल व्हायला मदत होते.

पॅनिक अटॅकची लक्षणं कोणती, हेही समजून घेणं गरजेचं आहे. छातीत धडधड वाढणे किंवा हृदयाचे ठोके वेगाने वाढणे, अचानक अंगाला घाम सुटणे, हात किंवा पाय थरथरणे, धाप लागणे किंवा गुदमरल्यासारखं वाटणे, छातीत अस्वस्थता किंवा वेदना जाणवणे, आणि डोकं हलकं होऊन चक्कर येऊन पडल्यासारखं वाटणे, ही ती लक्षणं आहेत. ही लक्षणं वारंवार जाणवत असतील, तर डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.

टीप - हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी असून यात कोणत्याही उपचाराचा दावा करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्याआधी आपल्या डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ