NTA मध्ये विषय तज्ज्ञ आणि भाषांतर समीक्षक पदांसाठी भरती, ९ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करा
नॅशनल टेस्टिंग एजन्सीने शिक्षक, संशोधक आणि शिक्षणतज्ज्ञांसाठी एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट जारी केलं असून पात्र उमेदवारांना ९ ऑक्टोबर २०२६ पर्यंत अर्ज करता येणार आहे.
शिक्षक, संशोधक किंवा शिक्षणतज्ज्ञ म्हणून काम करणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची संधी समोर आली आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी म्हणजेच NTA सोबत जोडले जाण्याची ही संधी आहे. NEET UG आणि JEE Main सारख्या देशातील आणि परदेशातील मोठमोठ्या प्रवेश परीक्षा याच एजन्सीकडून घेतल्या जातात. या परीक्षांच्या प्रश्नपत्रिका तयार करण्याच्या कामासाठी आता देशभरातील गुणवंत शिक्षणतज्ज्ञ आणि तज्ज्ञांना पाचारण करण्यात आलं आहे.
यासाठी नॅशनल टेस्टिंग एजन्सीनं 'एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट' (EOI) जारी केलं आहे. पात्र आणि अनुभवी उमेदवारांना यातून NTA सोबत जोडलं जाऊन देशाच्या मूल्यमापन पद्धतीचा एक भाग बनता येईल. यामुळे शैक्षणिक अनुभवाला एक नवीन आयाम मिळू शकतो. काही काळापूर्वी NTA ची परीक्षा पद्धती पेपर लीक आणि इतर गोंधळामुळे वादात सापडली होती. या नव्या भरतीतून देशातील मोठ्या परीक्षांची पारदर्शकता आणि गुणवत्ता वाढवण्यात हातभार लावता येणार आहे.
या भरती प्रक्रियेत केवळ विषय तज्ज्ञांचीच निवड होणार नाही, तर आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळात AI कडून केल्या जाणाऱ्या भाषांतराची अचूकता तपासण्यासाठी खास भाषांतर समीक्षकांचीही गरज भासणार आहे. परीक्षा पद्धत अधिक अचूक, सुरक्षित आणि विश्वासार्ह बनवणं हा या पावलामागचा मुख्य उद्देश आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ९ ऑक्टोबर २०२६ पर्यंत nta.ac.in या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज करता येईल.
NTA च्या या खास पॅनेलमध्ये सामील होणाऱ्या विषय तज्ज्ञांचं काम केवळ प्रश्न तयार करण्यापुरतं मर्यादित नसणार आहे, तर ती एक मोठी जबाबदारी असणार आहे. यात दिलेल्या अभ्यासक्रमाच्या आधारे दर्जेदार प्रश्नपत्रिका तयार करणं, प्रश्नपत्रिकेचं पुनरावलोकन करून प्रश्नांची काठिण्य पातळी तपासणं, परीक्षेचा ब्लूप्रिंट पूर्णपणे योग्य आहे की नाही याची खातरजमा करणं आणि निष्पक्ष व पारदर्शक मॉडरेशन प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावणं, या सगळ्या जबाबदाऱ्यांचा समावेश असेल.
NTA देशभरातील विद्यार्थ्यांसाठी अनेक प्रादेशिक भाषांमध्ये परीक्षा घेत असते. त्यामुळे AI कडून केल्या जाणाऱ्या भाषांतराची अचूकता पडताळण्यासाठी भाषांतर समीक्षकांची नियुक्ती केली जात आहे. परीक्षेतील प्रश्न सर्व भारतीय भाषांमध्ये पूर्ण स्पष्टतेनं आणि एकसमानतेनं विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचतील, याची खातरजमा हे समीक्षक करतील. त्यामुळे कोणत्याही भाषेतील विद्यार्थ्याला प्रश्न समजून घेताना कोणताही गोंधळ किंवा अडचण येणार नाही, अशी अपेक्षा आहे.
एकूणच शिक्षण क्षेत्रातील अनुभव असलेल्या आणि देशातील सर्वात मोठ्या परीक्षा प्रक्रियेचा भाग बनू इच्छिणाऱ्यांसाठी ही एक चांगली संधी ठरू शकते. NTA वेबसाईटवर जाऊन इच्छुक उमेदवारांनी मुदतीपूर्वी अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी.