NTA Office Shifted: नॅशनल टेस्टिंग एजन्सीचे कार्यालय नव्या पत्त्यावर! विद्यार्थ्यांसाठी NTA ने जारी केले
नॅशनल टेस्टिंग एजन्सीने आपले मुख्य कार्यालय नव्या जागेत हलवले असून विद्यार्थी आणि संस्थांनी नवा पत्ता नोंदवावा असे आवाहन केले आहे.
नॅशनल टेस्टिंग एजन्सी म्हणजेच NTA ने आपले मुख्य कार्यालय नव्या जागेत हलवले आहे. उमेदवार, विद्यार्थी, शैक्षणिक संस्था, संबंधित भागधारक, सेवा पुरवठादार आणि सर्वसामान्य जनता यांनी NTA च्या या नव्या पत्त्याची नोंद घ्यावी आणि आपापल्या रेकॉर्डमध्ये आवश्यक ते बदल करावेत, असे आवाहन एजन्सीने केले आहे.
NTA ने दिलेल्या माहितीनुसार आता एजन्सीचे कार्यालय नवी दिल्लीतील मिंटो रोडवरील सरकारी संकुलात (Minto Road Government Complex) हलवण्यात आले आहे. यापुढे NTA शी संबंधित कुठलाही अधिकृत पत्रव्यवहार किंवा काम असेल तर संबंधित व्यक्तींनी हाच नवा पत्ता वापरावा, असे एजन्सीने स्पष्ट केले आहे. म्हणजेच जुन्या पत्त्यावर पाठवलेली कागदपत्रे किंवा पत्रव्यवहार यापुढे योग्य ठिकाणी पोहोचणार नाही, त्यामुळे हा बदल लक्षात ठेवणे विद्यार्थ्यांसाठी आणि संस्थांसाठी महत्त्वाचे आहे.
NTA च्या नव्या कार्यालयाचा पत्ता असा आहे - नॅशनल टेस्टिंग एजन्सी (National Testing Agency - NTA), ५ वा मजला, भारत सरकार प्रेस बिल्डिंग, मिंटो रोड, नवी दिल्ली - ११०००२ (New Delhi-110002).
पुढे होणाऱ्या अधिकृत पत्रव्यवहारात कुठलीही अडचण येऊ नये यासाठी सर्व विद्यार्थी आणि संस्थांनी आपापल्या नोंदीत हा नवा पत्ता अपडेट करावा, असे आवाहन NTA कडून करण्यात आले आहे.
National Testing Agency म्हणजेच NTA ही भारतातील विविध मोठमोठ्या प्रवेश परीक्षा आणि पात्रता परीक्षा घेणारी शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत असलेली सरकारी संस्था आहे. या संस्थेची कामे अनेक आहेत. इंजिनिअरिंग प्रवेशासाठीची राष्ट्रीय पातळीवरील परीक्षा म्हणजे JEE Main ही NTA आयोजित करते. वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी NEET-UG ही परीक्षा घेण्याचे कामही NTA चे आहे. केंद्रीय आणि इतर विद्यापीठांमध्ये प्रवेशासाठी CUET-UG/PG म्हणजे कॉमन युनिव्हर्सिटी एंट्रन्स टेस्ट NTA आयोजित करते. कॉलेज आणि विद्यापीठांमध्ये असिस्टंट प्रोफेसर आणि JRF यांची पात्रता ठरवणारी UGC-NET परीक्षाही NTA घेते. याशिवाय मॅनेजमेंट आणि फार्मसी क्षेत्रातील राष्ट्रीय पातळीवरील CMAT आणि GPAT या परीक्षाही NTA आयोजित करते.
परीक्षेशी संबंधित सगळे व्यवस्थापनही NTA च बघते. अर्ज भरण्याची प्रक्रिया, प्रवेशपत्र म्हणजे Admit Card, परीक्षा केंद्रांचे नियोजन, संगणकावर आधारित परीक्षा म्हणजे CBT, उत्तरतालिका म्हणजे Answer Key आणि निकाल जाहीर करणे या सगळ्याची जबाबदारी NTA वर आहे. एवढ्या मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि संस्था या परीक्षांशी जोडलेल्या असल्यामुळे पत्रव्यवहाराचा हा पत्ता बरोबर असणे गरजेचे आहे.
थोडक्यात सांगायचे झाले तर NTA स्वतः कुठेही थेट प्रवेश देत नाही, तर देशातील महत्त्वाच्या प्रवेश आणि पात्रता परीक्षा पारदर्शक पद्धतीने पार पाडण्याचे काम करते. त्यामुळे विद्यार्थी आणि संस्थांनी या नव्या पत्त्याची नोंद वेळीच घ्यावी.