Netflix Top 5 Movies: नेटफ्लिक्सच्या ट्रेंडिंग लिस्टमध्ये मोठा बदल, 'या' ५ चित्रपटांनी मिळवलं टॉप ५मध्ये स्थान
सस्पेन्स, ड्रामा, कॉमेडी आणि अॅक्शन अशा वेगवेगळ्या शैलीतील पाच चित्रपटांनी नेटफ्लिक्सच्या ट्रेंडिंग लिस्टमध्ये स्थान मिळवलं आहे.
ओटीटीवर सध्या नेटफ्लिक्सची ट्रेंडिंग लिस्ट पूर्णपणे बदलली आहे. अलीकडेच रिलीज झालेल्या काही सिनेमांनी या यादीत जागा पटकावली असून, प्रेक्षकांमध्ये या सिनेमांबद्दल जोरदार चर्चा रंगली आहे. सस्पेन्स, ड्रामा, कॉमेडी आणि अॅक्शन अशा वेगवेगळ्या शैलीतील हे सिनेमे सोशल मीडियावरही चर्चेचा विषय ठरले आहेत. नवीन काही बघायचं असेल तर ही टॉप ५ लिस्ट बिंज-वॉचसाठी उपयोगी ठरू शकते.
पहिल्या क्रमांकावर सूर्या स्टारर 'मॅड्रास मॅटिनी' आहे. हा सिनेमा थिएटरमध्ये आधीच प्रदर्शित झाला होता आणि तिथे प्रेक्षकांचं मनोरंजन केल्यानंतर आता ओटीटीवरही हा सिनेमा गाजतोय. यात सूर्यासोबत ममिता बैजू महत्त्वाच्या भूमिकेत आहे. कॉमेडी, कौटुंबिक ड्रामा आणि अॅक्शन अशा मिश्रणाने भरलेल्या या सिनेमाला IMDb वर 7.4 इतकी रेटिंग मिळाली आहे.
दुसऱ्या क्रमांकावर आर. माधवनचा 'G.D. Naidu' हा बायोपिक आहे. भारतीय संशोधक आणि आविष्कारक जी.डी. नायडू यांच्या आयुष्यावर बेतलेल्या या सिनेमात आर. माधवनने त्यांची भूमिका साकारली आहे. थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्यावर या सिनेमाला अपेक्षित यश मिळालं नाही, पण ओटीटीवर मात्र प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसतोय आणि त्यामुळेच तो नेटफ्लिक्सच्या ट्रेंडिंग लिस्टमध्ये दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे.
तिसऱ्या स्थानावर अजय देवगण स्टारर 'धमाल 4' आहे. कॉमेडीने भरलेला हा सिनेमा थिएटरनंतर आता ओटीटीवरही प्रेक्षकांचं मनोरंजन करतोय. यात अजय देवगणसोबत रितेश देशमुख, अरशद वारसी, जावेद जाफरी आणि रवी किशन असे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.
चौथ्या क्रमांकावर तापसी पन्नू स्टारर 'गांधारी' आहे. सस्पेन्स आणि ट्विस्टने भरलेल्या या सिनेमात तापसीने एका नेत्रहीन महिलेची भूमिका साकारली आहे. कथेतील सततचे ट्विस्ट प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहेत आणि त्यामुळेच 'गांधारी' नेटफ्लिक्सच्या ट्रेंडिंग यादीत चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे. या सिनेमात तापसीसोबत स्वास्तिका मुखर्जी, छाया कदम, प्रशांत नारायणन आणि चंदन रॉय यांच्याही भूमिका आहेत.
पाचव्या क्रमांकावर वरुण तेज स्टारर एक सिनेमा आहे. सस्पेन्ससोबतच कॉमेडीचा तडका असलेल्या या सिनेमात वरुण तेजसोबत रितिका नायक, सत्या, सुनील आणि श्रीनिवास अवसराला महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. कलाकारांच्या अभिनयाबरोबरच सिनेमातील मनोरंजक प्रसंगांनाही प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय, आणि त्यामुळेच हा सिनेमा नेटफ्लिक्सच्या टॉप ५ ट्रेंडिंग लिस्टमध्ये पाचव्या क्रमांकावर पोहोचला आहे.
नेटफ्लिक्सच्या या टॉप ५ ट्रेंडिंग लिस्टवरून सध्या ओटीटीवर वेगवेगळ्या जॉनरच्या सिनेमांना प्रेक्षकांची पसंती मिळत असल्याचं स्पष्ट होतंय.