iPhone 18 Pro घेण्याआधी विचार करा, तेवढेच पैसे म्युच्युअल फंडात टाकले तर ५ वर्षांत किती वाढतील?
Apple ने नवीन आयफोन लाँच केल्यानंतर त्याच्या किमतीएवढी रक्कम म्युच्युअल फंडात गुंतवली तर काय फायदा होईल, याचं गणित समोर आलं आहे.
Apple ने 9 सप्टेंबरला 'सरप्राइज अँड शाइन' 2026 या नावाने आपला मोठा इव्हेंट केला. या इव्हेंटमध्ये कंपनीने तब्बल 13 नवीन प्रॉडक्ट्स लाँच केले. यामध्ये iPhone Duo, iPhone 18 Pro, iPhone 18 Pro Max आणि Apple Watch Series 12 अशा सगळ्या नवीन मॉडेल्सचा समावेश होता. पण या सगळ्यात सगळ्यात जास्त चर्चेत राहिला तो iPhone Duo.
iPhone Duo हा Apple चा पहिला फोल्डेबल फोन आहे, म्हणजे पुस्तकासारखा उघडणारा आणि बंद होणारा फोन. उघडल्यावर याची स्क्रीन 7.6 इंचाची होते आणि फोल्ड केल्यावर हा फोन खिशात सहज बसतो. Apple च्या इतिहासातला हा सगळ्यात मोठा बदल मानला जातोय. पण याची किंमत ऐकून लोकांना धक्का बसलाय, कारण भारतात या फोनची सुरुवातीची किंमत 2,99,900 रुपये म्हणजे जवळपास 3 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. आजपर्यंतचा हा सगळ्यात महागडा आयफोन ठरलाय. हा फोन 16 ऑक्टोबर 2026, शुक्रवारी संध्याकाळी 5:30 वाजता Apple च्या वेबसाईटवर बुकिंगसाठी खुला होणार असून 23 ऑक्टोबरपासून दुकानांत मिळायला सुरुवात होईल.
Duo सोबतच Apple ने iPhone 18 Pro आणि 18 Pro Max हे मॉडेल्सही आणले आहेत. यामध्ये 2nm टेक्नॉलॉजीवर बनलेला नवा A20 Pro प्रोसेसर आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार जुन्या आयफोनपेक्षा याचा परफॉर्मन्स 35 टक्के जास्त चांगला आहे, त्यामुळे गेमिंग असो किंवा 4K व्हिडिओ एडिटिंग, सगळं स्मूथ चालेल. iPhone 18 Pro च्या 256GB मॉडेलची किंमत 1,64,900 रुपये आहे, तर Pro Max ची किंमत 1,79,900 रुपये आहे.
यावरून एक प्रश्न उभा राहतो, फोन घ्यायचा की गुंतवणूक करायची? 3 लाख रुपये मोजून फोन घेणं मोठी गोष्ट आहे, पण हेच पैसे फोनऐवजी म्युच्युअल फंडात टाकले तर काय होईल, याचं गणित मांडण्यात आलं आहे. 12 टक्के वार्षिक नफा गृहीत धरला तर 2,99,900 रुपयांची सुरुवातीची रक्कम पहिल्या वर्षअखेर 3,35,888 रुपये, दुसऱ्या वर्षअखेर 3,76,194 रुपये, तिसऱ्या वर्षअखेर 4,21,337 रुपये, चौथ्या वर्षअखेर 4,71,897 रुपये आणि पाचव्या वर्षअखेर 5,28,526 रुपये होते. म्हणजे 2,99,900 रुपयांच्या गुंतवणुकीवर 5 वर्षांत 2,28,626 रुपयांचा निव्वळ नफा मिळू शकतो.
iPhone 18 Pro चे 1,64,900 रुपये फोनऐवजी गुंतवले तर तेच पैसे 5 वर्षांत सुमारे 2,90,611 रुपये होतील, म्हणजे 1,25,711 रुपयांचा फायदा. तर iPhone 18 Pro Max चे 1,79,900 रुपये गुंतवले तर 5 वर्षांत ते 3,17,046 रुपये होतील, म्हणजे 1,37,146 रुपयांचा नफा मिळेल.
पण हे फक्त एक उदाहरण आहे, हे लक्षात ठेवायला हवं. म्युच्युअल फंडात 12 टक्के परतावा मिळेलच याची कोणतीही गॅरंटी नसते. बाजार वर-खाली होत असतो, त्यामुळे परतावा कमी किंवा जास्तही होऊ शकतो. त्यामुळे फक्त हे गणित बघून लगेच गुंतवणूक करू नये, आपल्या आर्थिक सल्लागाराला विचारूनच निर्णय घ्यावा. पण एक गोष्ट नक्की, 3 लाखांचा फोन घेऊन शो ऑफ करण्यापेक्षा तोच पैसा गुंतवला तर भविष्यात जास्त फायदा होऊ शकतो.