गुरुवार, 17 सप्टेंबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
01:21 IST

नवी मुंबई: संशयावरून पतीने मारहाण केलेल्या नवविवाहितेचा दोन महिन्यांनी मृत्यू, पतीला अटक

घणसोलीत नवविवाहित सायली कदम हिला नवऱ्याने संशयावरून बेदम मारहाण केली होती, दोन महिन्यांच्या उपचारानंतर तिचा मृत्यू झाला असून रबाळे पोलिसांनी पतीला अटक केली आहे.

नवी मुंबई: संशयावरून पतीने मारहाण केलेल्या नवविवाहितेचा दोन महिन्यांनी मृत्यू, पतीला अटक छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

नवी मुंबईतील घणसोली भागात एका क्षणाच्या रागाने आणि संशयाने दोन कुटुंबांचं आयुष्य उद्ध्वस्त केल्याची घटना समोर आली आहे. सायली सागर कदम (वय २९, माहेरचं नाव सायली शरद लोखंडे) या नवविवाहितेचा दोन महिने रुग्णालयात झुंज दिल्यानंतर मृत्यू झाला. मोबाईलवर आलेल्या एका फोनवरून पतीला संशय आला आणि त्यातून झालेल्या मारहाणीत ती गंभीर जखमी झाली होती. तीन वेगवेगळ्या रुग्णालयांत उपचार सुरू असताना अखेर ४ सप्टेंबर रोजी चेंबूरच्या रुग्णालयात तिचा मृत्यू झाला. या प्रकरणात रबाळे पोलिसांनी आरोपी पती सागर कदम याला अटक केली आहे.

सायली रबाळे एमआयडीसीतील एका खासगी ऑफिसमध्ये काम करत होती. ती अचानक बेपत्ता झाल्यानंतर कुटुंबीयांनी रबाळे एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये मिसिंग तक्रार दिली होती. पोलिसांनी शोध घेतल्यावर सायली आणि सागर रामचंद्र कदम (मूळ रहिवासी महाबळेश्वर, जिल्हा सातारा) यांच्यात प्रेमसंबंध असल्याचं समोर आलं. ती बेपत्ता असतानाच्या काळात, ५ जुलै रोजी सागरने तिच्यावर संशय घेत तिच्या पोटावर लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण केली होती. या घटनेनंतर अवघ्या दोन दिवसांनी, ७ जुलै रोजी दोघांनी लग्न केलं आणि ते घणसोलीतील सेक्टर-७ मधल्या एका सोसायटीत राहू लागले. घटना घणसोली पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडल्यामुळे रबाळे एमआयडीसी पोलिसांनी हे प्रकरण पुढील तपासासाठी रबाळे पोलीस स्टेशनकडे वर्ग केलं.

मारहाणीमुळे सायलीच्या पोटातील पॅनक्रियाजला गंभीर इजा झाली होती. रुग्णालयात दाखल केल्यावर पतीवर कोणतीही कायदेशीर कारवाई होऊ नये आणि नुकताच सुरू झालेला संसार टिकावा म्हणून तिने पोलिसांना खोटा जबाब दिला होता, की ती जिन्यावरून पडून जखमी झाली. पण वेदना असह्य झाल्यावर आणि तब्येत आणखी खालावल्यावर ११ ऑगस्ट रोजी तिने पोलिसांना खरी हकीकत सांगितली, पतीने केलेल्या मारहाणीबद्दल.

नेरूळचं डी. वाय. पाटील रुग्णालय, खारघरचं मेडिकव्हर रुग्णालय आणि शेवटी चेंबूरचं झेन रुग्णालय, अशा तीन रुग्णालयांत तिच्यावर उपचार सुरू होते. कुटुंबीयांनी तिला वाचवण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न केले, तिच्यावर मोठी शस्त्रक्रियाही झाली, मात्र अतिदक्षता विभागात दोन महिने चाललेली तिची झुंज अखेर अपुरी राहिली.

सायलीच्या मृत्यूनंतर रबाळे पोलिसांनी या गुन्ह्यात हत्येचं कलम वाढवलं आहे. आरोपी सागर कदमला अटक करून न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक शेखर तडवी या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

आरोपी सागर कदम हा व्यवसाय शिक्षण घेतलेला इंजिनिअर असून सध्या तो कंपन्यांसाठी प्रायव्हेट गाडी चालवण्याचं काम करत होता. चांगलं शिक्षण आणि ज्ञान असूनही एका क्षणाच्या अनियंत्रित रागाने त्याने सर्वकाही उध्वस्त केलं. एका बाजूला आई-वडिलांची लाडकी लेक कायमची दुरावली, तर दुसऱ्या बाजूला उच्चशिक्षित मुलाने केलेल्या या कृत्यामुळे त्याच्या कुटुंबीयांवरही समाजात तोंड दाखवायला जागा उरली नाही.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ