गुरुवार, 17 सप्टेंबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
03:29 IST

नाशिकमध्ये भोंदूबाबाकडून 15 कोटींच्या पैशांच्या पावसाचं आमिष, सहा जणांना अटक

कळवण तालुक्यातील अभोणा पोलिस स्टेशन हद्दीत मंत्रतंत्र आणि पूजाविधीच्या नावाखाली मुंबईतील कुटुंबांची फसवणूक झाल्याचं समोर आलं आहे.

नाशिकमध्ये भोंदूबाबाकडून 15 कोटींच्या पैशांच्या पावसाचं आमिष, सहा जणांना अटक
एआई से बनाई गई प्रतीकात्मक तस्वीर; यह घटना का वास्तविक फोटो नहीं है | PT24

नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यातल्या अभोणा पोलिस स्टेशन हद्दीत एक धक्कादायक फसवणुकीचं प्रकरण उघडकीस आलं आहे. पिंपळे खुर्द गावातल्या एका भोंदूबाबाने मुंबईतल्या काही कुटुंबांना मंत्रतंत्र आणि पूजाविधी करून 15 कोटी रुपयांचा पैशांचा पाऊस पाडून देतो, असं आमिष दाखवलं. आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच पीडितांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधला. त्यानंतर बुधवारी रात्री अभोणा पोलिस स्टेशनमध्ये या भोंदूविरोधात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी त्याला आणि त्याच्या सहा साथीदारांना अटक केली आहे. आरोपी भोंदूबाबाचं नाव हिराचंद शिवाजी बर्डे असं आहे.

हे प्रकरण नेमकं कसं घडलं, याबद्दल सांगायचं तर मुंबईच्या बोरिवली भागात राहणाऱ्या राजाराम सिताराम शेलार यांना त्यांच्या काही मित्रांनी आरोपी हिराचंद बर्डे याची ओळख करून दिली होती. मंत्रतंत्र आणि पूजाविधी करून पैशांच्या नोटांचा पाऊस पाडता येतो, असं बर्डे यांनी सांगितलं होतं. त्यासाठी अगोदर काही रक्कम द्यावी लागेल, असंही त्याने स्पष्ट केलं. त्यानुसार राजाराम शेलार आणि त्यांच्या इतर चार मित्रांनी सुरुवातीला प्रत्येकी 1000 रुपये भोंदूबाबाला दिले. मंत्रतंत्र आणि पूजाविधी करून त्या 1000 रुपयांचे 2 लाख रुपये झाल्याचं भोंदूने दाखवलं. हा चमत्कार बघून सगळ्यांचा त्याच्यावर विश्वास बसला. त्यानंतर बाबाने सांगितलं, की पाच जणांनी मिळून 11 लाख रुपये दिले तर मंत्रतंत्र आणि पूजाविधी करून 15 कोटी रुपयांचा पाऊस पाडून देईन. त्यानुसार भोंदूने संबंधितांकडून वेळोवेळी रोख आणि ऑनलाइन पद्धतीने एकूण 10 लाख 55 हजार रुपये उकळले.

पूजाविधी करताना भोंदूबाबाने पीडितांच्या हातात तांदूळ, अगरबत्ती आणि नारळ दिला आणि मंत्र म्हणायला सुरुवात केली. त्यानंतर नारळातून अचानक स्फोट झाल्याचं दाखवून चमत्कार घडल्याचा आव आणला. त्यानंतर 3 कोटी रुपयांचा पैशांचा पाऊस पडल्याचं सांगत त्याने गोणीभर पैसे पीडितांच्या ताब्यात दिले. नोटांनी भरलेली ही गोणी घरी घेऊन जाऊन तिची 7 दिवस पूजा करा आणि त्याआधी गोणी उघडू नका, नाहीतर तुमच्यावर कोप होईल, अशी भीती त्याने पीडितांना दाखवली. दरम्यान पीडितांच्या काकूंचं निधन झाल्याने ती पूजा करता आली नाही. त्यामुळे गोणीतली रक्कम अशुद्ध झाली असून शुद्धीकरणासाठी पुन्हा पूजा करावी लागेल आणि त्यासाठी पुन्हा पैसे द्यावे लागतील, अशी बतावणी भोंदूने केली. त्यामुळे पीडितांनी पुन्हा काही लाख रुपये त्याला दिले. काही दिवसांनी शंका आल्याने पीडितांनी गोणी उघडून पाहिली, तेव्हा नोटांच्या बंडलमध्ये फक्त वरची नोट खरी असून बाकीच्या सगळ्या नोटा लहान मुलांच्या खेळण्यातल्या खोट्या नोटा असल्याचं समोर आलं.

याबाबत पीडितांनी भोंदूबाबाला जाब विचारला असता, कपडे काढून अमावास्येच्या रात्री स्मशानात पूजा करावी लागेल, असं त्याने सांगितलं. मात्र पीडितांनी अशी पूजा करण्यास नकार दिला आणि आपले पैसे परत मागितले. त्यावर भोंदूने त्यांना गायब करण्याची आणि जीवे मारण्याची धमकी दिली. यानंतर पीडितांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या (अंनिस) कार्यकर्त्यांशी संपर्क साधला. महाराष्ट्र अंनिसचे राज्य प्रधान सचिव डॉ. टी. आर. गोराणे आणि राज्य सदस्य कृष्णा चांदगुडे यांच्या मदतीने पीडित अभोणा पोलिस स्टेशनमध्ये पोहोचले. त्यानंतर प्रभारी पोलिस निरीक्षक योगिता कोकाटे यांनी भोंदू हिराचंद बर्डे याच्याविरोधात जादूटोणाविरोधी कायद्यासह भारतीय न्याय संहितेच्या इतर कलमांखाली गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. या भोंदूने याच पद्धतीने आणखी कुणाची फसवणूक केली असेल तर त्यांनी अभोणा पोलिसांशी किंवा महाराष्ट्र अंनिसच्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधावा, असं आवाहन करण्यात आलं आहे.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ