नागपुरात सुनेवर जादुटोण्याचा संशय; सासऱ्याने कुऱ्हाडीने हत्या करून विहिरीत उडी मारली
नागपूरच्या यशोधरानगर पोलीस स्टेशन हद्दीत सासऱ्याने सुनेची कुऱ्हाडीने वार करून हत्या केली आणि नंतर विहिरीत उडी मारून जीव देण्याचा प्रयत्न केला.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
नागपुरातील यशोधरानगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत पिवळी नदीकिनारी असलेल्या पाहुणे लेआउटमध्ये एका सासऱ्याने आपल्याच सुनेचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ७० वर्षीय नाथूलाल पाली याने आपल्या ४० वर्षीय सुनेवर कुऱ्हाडीने वार करून तिचा जागीच खून केला. मयत महिलेची ओळख लक्ष्मी रविशंकर पाली अशी झाली आहे.
या हत्येमागचं कारण म्हणजे नाथूलालला आपल्या सुनेवर जादुटोणा-तंत्रमंत्र केल्याचा संशय होता. नाथूलालचा मुलगा आणि लक्ष्मीचा नवरा रविशंकर पाल याचं २०१९ मध्ये निधन झालं होतं. मुलाच्या मृत्यूनंतर नाथूलाल प्रचंड मनस्तापात होता आणि त्याने आपल्या सुनेलाच याला जबाबदार धरलं. सून जादुटोणा करते असा त्याचा ठाम समज होता. या संशयावरून घरात अनेकदा वादही झाले होते. या रागातून आणि संशयातूनच नाथूलालने आपल्या सुनेला मारून टाकण्याचा निर्णय पक्का केला होता. शनिवारी घरात कुणीच नसताना नाथूलालला ती संधी मिळाली. त्यावेळी लक्ष्मी कपडे धुवत होती. नाथूलालने कुऱ्हाड घेऊन तिच्यावर हल्ला केला. हा वार इतका जोरदार होता की काही क्षणातच लक्ष्मीचा जागीच मृत्यू झाला.
सुनेला मारल्यानंतर पकडलं जाण्याच्या आणि शिक्षेच्या भीतीने नाथूलालने स्वतःचं आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला. घराच्या मागच्या बाजूला असलेल्या विहिरीत त्याने उडी मारली. नाथूलाल विहिरीत उडी मारताना आजूबाजूच्या लोकांनी पाहिलं आणि त्यांनी आरडाओरड करून पोलिसांना घटनेची माहिती दिली. बातमी पसरताच परिसरातील लोकांची गर्दी घटनास्थळी जमा झाली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत नाथूलालला विहिरीतून बाहेर काढलं आणि उपचारासाठी मेडिकल हॉस्पिटलमध्ये पाठवलं. पोलिसांसोबत फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी पोहोचली होती. फॉरेन्सिक टीमने लक्ष्मीचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. पोलिसांनी घटनास्थळावरून सर्व पुरावे गोळा केले असून शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.