गुरुवार, 17 सप्टेंबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
01:21 IST

नागपुरात गणेशोत्सव मंडळाच्या पाच कार्यकर्त्यांना पोलिसांची मारहाण, पैसे व मोबाईल हिसकावल्याचा आरोप

मातोश्री नगर भागातील गणेश मंडळात रात्री देखावा तयार करणाऱ्या तरुणांना पोलिसांनी जुगाराच्या संशयावरून बेदम मारहाण केल्याचा आणि पैसे उकळल्याचा गंभीर आरोप झाला आहे.

नागपुरात गणेशोत्सव मंडळाच्या पाच कार्यकर्त्यांना पोलिसांची मारहाण, पैसे व मोबाईल हिसकावल्याचा आरोप
एआई से बनाई गई प्रतीकात्मक तस्वीर; यह घटना का वास्तविक फोटो नहीं है | PT24

राज्यभरात सध्या गणेशोत्सवाचा उत्साह असून हजारो सार्वजनिक मंडळांमध्ये तरुण दिवसरात्र मेहनत करत आहेत. याच काळात नागपुरातील मातोश्री नगर परिसरातील एका गणेशोत्सव मंडळात रात्री उशिरापर्यंत देखावा तयार करणाऱ्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी अतिरेकी कारवाई केल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे.

8 सप्टेंबरच्या रात्री श्रीगणेश मित्र उत्सव मंडळाचे पाच कार्यकर्ते जेवण झाल्यानंतर सव्वा अकरा वाजेपर्यंत मंडळात देखावा तयार करण्याचं काम करत होते. काम आटोपल्यावर हे पाचही तरुण परिसरात शतपावली करत असताना तीन पोलीस दुचाकीवरून तिथे पोहोचले. एवढ्या रात्री कुठे फिरत आहात, अशी विचारणा पोलिसांनी केली. तरुणांना उत्तर देण्याची संधीही न देता तुम्ही जुगार खेळून परत येत आहात असा आरोप करत पोलिसांनी पाचही कार्यकर्त्यांना रस्त्यावरच बेदम मारहाण केली. पीडित तरुणाच्या आरोपानुसार, यावेळी पोलिसांनी त्याच्या खिशातील 8 हजार 600 रुपयेही काढून घेतले. त्यानंतर तिन्ही पोलिसांनी पाचही तरुणांना बाईकवर बसवून एमआयडीसी पोलीस स्टेशनला नेलं.

पीडित तरुणांच्या आरोपानुसार, पोलीस स्टेशनला पोहोचल्यानंतरही तिथे त्यांना पुन्हा जबर मारहाण करण्यात आली. जुगार खेळत असल्याचा गुन्हा कबूल करा, अन्यथा 50 हजार रुपयांची व्यवस्था करून सुटका करून घ्या, अशी अट पोलिसांनी घातली. रात्री बारा वाजल्यापासून पहाटे साडेतीन वाजेपर्यंत ही मारहाण सुरू होती. अखेर एका मित्राकडून आणखी पाच हजार रुपये मागवून पोलिसांना दिल्यानंतर पहाटे साडेतीन वाजता पाचही तरुणांची सुटका करण्यात आल्याचं पीडितांनी सांगितलं.

मात्र 9 सप्टेंबरच्या पहाटे सुटका केल्यानंतरही पोलिसांनी पीडित तरुणांचे मोबाईल फोन आणि पर्स स्वतःकडेच ठेवले. दुसऱ्या दिवशी हे तरुण आपला मोबाईल आणि पर्स परत मागण्यासाठी पोलीस स्टेशनला गेले असता, मारहाण करणाऱ्या पोलिसांनी त्यांना हाकलून लावत पुन्हा पैशांची मागणी केल्याचा आरोप आहे. अखेर पाचही पीडित तरुणांनी पोलीस आयुक्त कार्यालयात याबाबत लेखी तक्रार दिली, त्यानंतर एमआयडीसी पोलीस स्टेशनमधील तीन पोलीस कर्मचाऱ्यांचं हे प्रकरण वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर आलं. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपानंतर पीडित तरुणांना त्यांचे मोबाईल फोन, घटनास्थळावरून काढून घेतलेले 8 हजार 600 रुपये आणि पर्स परत मिळाले. मात्र आरोप असलेल्या पोलिसांवर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही.

आपल्याच परिसरातील गणेशोत्सव मंडळात रात्री उशिरापर्यंत काम करणं चूक आहे का, आणि नोकरी व मेहनत करणाऱ्या तरुणांवर विनाकारण जुगाराचा आरोप ठेवून पोलीस स्टेशनमध्ये नेऊन मारहाण करणं योग्य आहे का, असे प्रश्न आता हे पीडित तरुण विचारत आहेत. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गोकुळ महाजन यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी याबाबत अधिक बोलण्यास नकार दिला. तरुणांविरोधात जुगार खेळत असल्याची कारवाई करण्यात आल्याची माहिती महाजन यांनी दिली, मात्र आरोप असलेल्या पोलिसांवर काय कारवाई झाली याचं उत्तर त्यांनी दिलं नाही. प्रकरण आता मिटलं असून ते फार मोठं नाही, असं उत्तर त्यांनी फोनवर दिलं.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ