नागपूरच्या एनकेपी साल्वे कॉलेजची MBBS फी ५६ टक्क्यांनी वाढली, पाच वर्षांचा खर्च १.१ कोटींवर
खाजगी वैद्यकीय विद्यापीठात रूपांतर झाल्यावर काही आठवड्यांतच फी वाढवण्यात आली, त्यामुळे पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये चिंता वाढली आहे.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
महाराष्ट्रात खाजगी मेडिकल कॉलेजमधून MBBS करायच्या तयारीत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी फीबाबत मोठी बातमी समोर आलीय. नागपूरच्या एनकेपी साल्वे इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसचं खाजगी वैद्यकीय विद्यापीठात रूपांतर झाल्यानंतर अवघ्या काही आठवड्यांतच MBBS च्या फीमध्ये तब्बल ५६ टक्क्यांनी वाढ करण्यात आलीय.
शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये वार्षिक फी १३.९५ लाख रुपये होती. आता ती वाढवून २१.७५ लाख रुपये प्रतिवर्ष करण्यात आलीय. यात दरवर्षी ७.५ टक्के वाढ करण्याची तरतूदही ठेवलीय. त्यामुळे MBBS च्या पूर्ण पाच वर्षांच्या शिक्षणाचा एकूण खर्च साधारण १.१ कोटी रुपयांपर्यंत पोहोचणार आहे. हे आकडे समोर आल्यावर MBBS च्या वाढत्या फीबद्दलची चर्चा आणखी तापलीय.
नव्या फी रचनेनुसार स्टेट कोट्याच्या ४० टक्के आणि ऑल इंडिया कोट्याच्या ४५ टक्के जागांसाठी ट्युशन आणि डेव्हलपमेंट फी वार्षिक २०.७५ लाख रुपये असेल. याशिवाय विद्यार्थ्यांना दरवर्षी १ लाख रुपये युनिव्हर्सिटी फी भरावी लागेल. तसंच ५ लाख रुपयांची रिफंडेबल सेक्युरिटी डिपॉझिटही घेतली जाईल. NRI आणि OCI विद्यार्थ्यांसाठी वार्षिक फी ४६,६५० अमेरिकन डॉलर निश्चित करण्यात आलीय. इन्स्टिट्यूशनल कोट्यातून प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी फी प्रतिवर्ष ४३ लाख रुपये असेल.
एनकेपी साल्वे इन्स्टिट्यूटमध्ये MBBS च्या एकूण २५० जागा आहेत. कॉलेज खाजगी विद्यापीठात रूपांतरित होण्याची प्रक्रिया सुरू असल्यामुळे या जागा अजून केंद्रीय वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेत समाविष्ट झाल्या नव्हत्या. महाराष्ट्र सीईटी सेलच्या एका अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, वैद्यकीय प्रवेशाच्या दुसऱ्या फेरीचं तात्पुरतं सीट मॅट्रिक्स जारी झालंय. अंतिम सीट मॅट्रिक्समध्ये या कॉलेजचा समावेश केला जाणार आहे.
याच नव्या खाजगी विद्यापीठाचा भाग बनलेल्या नागपूरच्या रणजीत देशमुख डेंटल कॉलेज अँड रिसर्च सेंटरच्या फीतही वाढ झालीय. इथली वार्षिक फी ४.७५ लाख रुपयांवरून वाढवून ५.८५ लाख रुपये करण्यात आलीय. महाराष्ट्र सरकारने ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात तीन शिक्षण संस्थांना खाजगी विद्यापीठात रूपांतरित करायला मंजुरी दिली होती. यात अहिल्यानगरचं डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाऊंडेशन मेडिकल कॉलेज, नागपूरचं एनकेपी साल्वे इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स आणि रणजीत देशमुख डेंटल कॉलेज अँड रिसर्चचा समावेश आहे.
वैद्यकीय शिक्षण निरीक्षक ब्रिजेश सुटरिया यांनी सांगितलं की, एवढी जास्त फी मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी मोठा आर्थिक भार ठरतो. त्यांनी पालकांना सल्ला दिलाय की, NEET UG काउन्सिलिंगमध्ये कॉलेजचा पर्याय निवडण्याआधी पूर्ण ५.५ वर्षांच्या अभ्यासाची फी आणि इतर खर्चाचा हिशोब नक्की करून घ्यावा.