नागपूरचा निर्यात विस्तारला, पहिल्या तिमाहीत 7,565 कोटींचा व्यवसाय, अमेरिकेचा वाटा मोठा
संत्री आणि शेतीमालासाठी ओळखल्या जाणाऱ्या नागपूरने आता औषधे, विमानाचे सुटे भाग, गाड्या, रसायने आणि प्लास्टिक उत्पादनांच्या निर्यातीतही आपली जागा तयार केली आहे.
नागपूर शहराची ओळख आता फक्त संत्री आणि शेतीमालापुरती राहिलेली नाही. फार्मास्युटिकल उत्पादने, विमानाचे यंत्र आणि सुटे भाग, गाड्या, रसायने, इलेक्ट्रिकल उपकरणे आणि प्लास्टिक उत्पादनांच्या निर्यातीतही शहराने आपली मजबूत ओळख निर्माण केली आहे.
आर्थिक वर्ष 2026-27 च्या पहिल्या तिमाहीचे म्हणजे एप्रिल ते जून 2026 या काळातले आकडे नागपूरचा जागतिक व्यापार किती वेगाने वाढतोय हे दाखवतात. या काळात जिल्ह्यातून एकूण 7,565.83 कोटी रुपयांची निर्यात नोंदवली गेली. या निर्यात व्यवसायात अमेरिका सगळ्यात महत्त्वाची बाजारपेठ म्हणून पुढे आली आहे. विशेषतः फार्मास्युटिकल उत्पादनांच्या निर्यातीत अमेरिकेचा दबदबा प्रचंड मोठा दिसतो.
पहिल्या तिमाहीत नागपूरमधून 3,325.39 कोटी रुपयांची फार्मास्युटिकल उत्पादने निर्यात झाली. यातील एकट्या अमेरिकेला 2,966 कोटी रुपयांची निर्यात झाली. म्हणजे या घटकाच्या एकूण निर्यातीपैकी जवळपास 89 टक्के माल अमेरिकेत गेला.
पण अमेरिकेची भूमिका फक्त औषधांपुरती मर्यादित नाही. आकडेवारीनुसार विमान, अवकाशयान आणि त्यांच्या सुट्या भागांसाठीही अमेरिका प्रमुख बाजारपेठांपैकी एक आहे, जिथे 45 कोटी रुपयांची निर्यात झाली. रस्त्यावरील वाहने आणि त्यांच्या सुट्या भागांमध्ये अमेरिकेला 37 कोटी, अणुभट्ट्या, बॉयलर, यंत्रसामग्री आणि यांत्रिक उपकरणांमध्ये 18 कोटी तर प्लास्टिक आणि त्यापासून बनवलेल्या वस्तूंमध्ये 14 कोटी रुपयांची निर्यात नोंदवली गेली. या सगळ्या आकड्यांची बेरीज केली तर फक्त याच प्रमुख घटकांमध्ये अमेरिकेला 3,080 कोटी रुपयांहून अधिक निर्यात झाली आहे. हे जिल्ह्याच्या एकूण 7,565.83 कोटी रुपयांच्या पहिल्या तिमाहीतल्या निर्यातीच्या जवळपास 41 टक्के आहे.
नागपूरच्या टॉप-10 निर्यात उत्पादनांमध्ये फार्मास्युटिकल उत्पादने पहिल्या क्रमांकावर आहेत. 3,325.39 कोटी रुपयांची ही निर्यात दुसऱ्या क्रमांकावरील स्फोटके, माचिस आणि काही ज्वलनशील पदार्थांच्या 951.11 कोटी रुपयांच्या निर्यातीपेक्षा कित्येक पटींनी जास्त आहे.
फार्मानंतर निर्यातीच्या यादीत धान्य 681.47 कोटी रुपये, लोखंड आणि पोलादाची उत्पादने 304.29 कोटी, विमान-अवकाशयान आणि सुटे भाग 247.70 कोटी तर रस्त्यावरील वाहने आणि सुटे भाग 240.31 कोटी रुपयांची निर्यात नोंदवली गेली.
नागपूरचा निर्यात व्यवसाय फक्त अमेरिकेपुरता मर्यादित नाही. फार्मास्युटिकल उत्पादनांसाठी पोलंडला 74 कोटी आणि टांझानियाला 49 कोटी रुपयांची निर्यात झाली. स्फोटके आणि संबंधित उत्पादनांमध्ये स्पेन 170 कोटी, दक्षिण आफ्रिका 159 कोटी आणि स्लोव्हेनिया 104 कोटी रुपयांसह प्रमुख बाजारपेठा राहिल्या.
धान्याच्या निर्यातीत बेनिन 163 कोटी, टोगो 79 कोटी आणि रशिया 47 कोटी रुपयांसह प्रमुख खरेदीदार ठरले. लोखंड आणि पोलाद उत्पादनांमध्ये सौदी अरेबिया 54 कोटी, फिलिपाइन्स 52 कोटी आणि अमेरिका 34 कोटी रुपयांच्या निर्यातीसह प्रमुख बाजारपेठा राहिल्या.
या आकडेवारीवरून हेही स्पष्ट होते की नागपूरची निर्यात अर्थव्यवस्था हळूहळू अधिक वैविध्यपूर्ण होत चालली आहे. फार्माशिवाय सेंद्रिय रसायने 167.89 कोटी, अणुभट्ट्या-यंत्रसामग्री 164.60 कोटी, इलेक्ट्रिकल यंत्रसामग्री आणि उपकरणे 161.71 कोटी तर प्लास्टिक उत्पादने 156.67 कोटी रुपयांसह टॉप-10 यादीत आहेत.
म्हणजे नागपूरच्या निर्यातीचे नवे चित्र तयार होत आहे. औषधांपासून यंत्रसामग्री आणि विमानाच्या सुट्या भागांपर्यंत 'ऑरेंज सिटी'चा माल आता जगातल्या अनेक बाजारपेठांमध्ये पोहोचतोय आणि यात अमेरिकेची भूमिका सगळ्यात महत्त्वाची दिसत आहे.