गुरुवार, 17 सप्टेंबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
02:22 IST

नागपुरात टवाळखोरांच्या छेडखानीमुळे 10 वर्षांच्या मुलीचे शिक्षण थांबले, पोलिसांवर कारवाईत हलगर्जीचा आरोप

नागपूरच्या पाचपावली भागात शिकवणी वर्गातून घरी येताना टवाळखोरांनी मुलीची छेड काढली आणि विरोध केल्यावर तिला व तिच्या भावाला मारहाण केली. महिनाभरानंतरही तीन आरोपी मोकाट असल्याने भावंडांनी शाळेत जाणे बंद केले आहे.

नागपुरात टवाळखोरांच्या छेडखानीमुळे 10 वर्षांच्या मुलीचे शिक्षण थांबले, पोलिसांवर कारवाईत हलगर्जीचा आरोप छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

शाळकरी मुलींना सुरक्षित वातावरणात शिक्षण मिळावे यासाठी शासन आणि प्रशासनाकडून विविध प्रयत्न केले जात असले, तरी नागपुरातील एका 10 वर्षांच्या मुलीचे शिक्षण गेल्या महिनाभरापासून पूर्णपणे ठप्प झाले आहे. याला कारण ठरले आहे ते शिकवणी वर्गातून येता-जाता तिची छेड काढणारे आणि विरोध केल्यावर तिला व तिच्या 8 वर्षांच्या भावाला मारहाण करणारे टवाळखोर. या टवाळखोरांना पकडून त्यांच्यावर ठोस कारवाई करण्यात नागपूर पोलिसांना अद्याप यश आलेले नाही.

नागपूरच्या पाचपावली भागात राहणारी ही मुलगी संध्याकाळी आपल्या लहान भावासोबत शिकवणी वर्गातून घरी परतायची. याच वेळी शिकवणी वर्गाच्या आसपासची चार टवाळ मुले तिची छेड काढत असत. भावंडांकडून कोणताही विरोध होत नाही, हे लक्षात आल्यावर या मुलांची हिंमत वाढत गेली. ते मुलीला अंधाऱ्या भागात नेऊन तिच्या अंगाला अयोग्य पद्धतीने स्पर्श करत, ती ओरडण्याचा प्रयत्न करताच तिच्या तोंडात बोटे खुपसून तिला त्रास देत आणि मारण्याची धमकी देत कोणालाही न सांगण्याची तंबी देत. ऑगस्ट महिन्यात हा प्रकार अनेक दिवस सातत्याने घडत राहिल्याने मुलीचे मन अभ्यासातून उडाले आणि ती शिकवणीला जायला नकार देऊ लागली.

ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात शिकवणीहून परतताना या टवाळखोरांनी तिला पुन्हा एका अंधाऱ्या गल्लीत नेले. यावेळी मुलीने विरोध केला असता, संतापलेल्या एका टवाळखोराने लोखंडी पाईपसारख्या काठीने तिच्या पायावर, कमरेवर आणि शरीराच्या इतर भागांवर सपासप वार केले. वेदनेने विव्हळत ती कशीबशी घरी पोहोचली. रात्री उशिरा तिच्या अंगावरील जखमा पाहून आईने विचारपूस केली, तेव्हा मुलगी आणि तिच्या भावाने अनेक दिवसांपासून सुरू असलेला हा सगळा प्रकार पालकांना सांगितला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पालकांनी लगेच पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा नोंदवला खरा, पण पालकांच्या म्हणण्यानुसार चार आरोपींपैकी फक्त एकालाच अटक करण्यात आली. उर्वरित तीन आरोपी महिनाभरापासून मोकाट फिरत असल्याने आणि तेच त्या भागात दिसत राहिल्याने घाबरलेल्या मुलीने व तिच्या भावाने शाळेत जाणेच बंद केले.

पालकांनी धीर दिल्यानंतर 4 सप्टेंबरला मुलगी शाळेत गेली असता, शाळेजवळही एक मोकाट आरोपी फिरताना तिला दिसला. यानंतर पुन्हा घाबरलेल्या मुलीने शाळेत जाण्यास साफ नकार दिला. छेडखानीच्या या प्रकरणात पोलिसांकडून ठोस कारवाई न झाल्यामुळे एका चिमुकलीचे शिक्षण थांबल्याची दुर्दैवी घटना यानिमित्ताने समोर आली आहे. पाचपावली पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणी बाईट देण्यास नकार दिला. पीडित मुलगी सर्व आरोपींना ओळखू शकत नसल्याने त्यांच्याविरोधात कारवाई करता आली नाही, असे पोलिसांचे म्हणणे आहे. 14 ऑगस्ट रोजी तक्रार नोंदवताना मुलगी आणि तिच्या पालकांनी जेवढी माहिती दिली, तेवढ्या प्रमाणात कारवाई केल्याचे नागपूर पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ