रविवार, 20 सप्टेंबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
13:58 IST

नागभीड-ब्रम्हपुरी मार्गावर उभ्या कारला वाहनाची धडक; चिमुकली, चालकाचा मृत्यू

कोर्धा गावाजवळ भरधाव अज्ञात वाहनाने रस्त्याकडेला थांबलेल्या कारला धडक दिल्याने बारा वर्षांची मुलगी आणि कारचालकाचा जागीच मृत्यू झाला, तर सहा जण जखमी झाले.

नागभीड-ब्रम्हपुरी मार्गावर उभ्या कारला वाहनाची धडक; चिमुकली, चालकाचा मृत्यू
एआई से बनाई गई प्रतीकात्मक तस्वीर; यह घटना का वास्तविक फोटो नहीं है | PT24

नागभीड ते ब्रम्हपुरी या महामार्गावरील कोर्धा गावाजवळ शनिवारी रात्री उशिरा एक भीषण अपघात घडला. महामार्गाच्या कडेला सुरक्षितपणे उभ्या केलेल्या मारुती सुझुकी कारला मागून आलेल्या एका भरधाव आणि अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. या धडकेत बारा वर्षांच्या मुलीसह कारचालकाचा मृत्यू झाला, तर इतर सहा जण जखमी झाले.

धडक देणारा अज्ञात वाहनचालक अपघातानंतर आपले वाहन घेऊन घटनास्थळावरून पसार झाला. या प्रकरणी नागभीड पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात वाहनचालकाविरुद्ध विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उपजिल्हा रुग्णालय, ब्रम्हपुरी येथे दाखल फिर्यादीनुसार, विरली (ता. लाखांदूर, जि. भंडारा) येथील रहिवासी हिमेश बंडू बेदरे (वय ४१) हे पत्नी मैथुला बेदरे (वय ३५), मुलगा शौर्य बेदरे (वय १०) आणि मुलगी श्रावणी बेदरे (वय १२) यांच्यासह, तसेच नातेवाईक नितीन विनायक भर्रे (वय ३२), वैष्णवी नितीन भर्रे (वय २५), आरोही नितीन भर्रे आणि एक वर्षाची चिमुकली नित्या नितीन भर्रे (सर्व रा. बोडेगाव, ता. ब्रम्हपुरी) यांच्यासोबत शनिवारी सकाळी बल्लारशाह येथे नातेवाईकांना भेटायला गेले होते. भेट आटोपून संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास सगळे जण हिमेश बेदरे यांच्या मारुती सुझुकी एस्टिलो कारने (क्रमांक MH 31 CD 9189) बोडेगावकडे परतीच्या प्रवासाला निघाले.

रात्री साडेआठ ते नऊ वाजण्याच्या दरम्यान नागभीड-ब्रम्हपुरी मार्गावरील भोतमांगे ढाब्यावर जेवण आटोपल्यानंतर रात्री सव्वादहा वाजण्याच्या सुमारास हा गट पुन्हा प्रवासाला निघाला. त्यावेळी कार नितीन भर्रे चालवत होते. कोर्धा गावापासून काही अंतरावर आल्यावर चेहऱ्यावर पाणी मारून सुस्ती घालवण्यासाठी नितीन यांनी कार महामार्गाच्या डाव्या बाजूला सुरक्षितपणे थांबवली. त्याच वेळी मागून भरधाव आणि निष्काळजीपणे आलेल्या एका अज्ञात वाहनाने रस्त्याकडेला उभ्या असलेल्या या कारला जोरदार धडक दिली. धडक इतकी जबरदस्त होती की कार थेट रस्त्याखाली फेकली जाऊन उलटली.

महामार्गावरून जाणाऱ्या प्रवाशांनी आणि स्थानिक लोकांनी लगेच धाव घेत कारमध्ये अडकलेल्या सर्व जखमींना बाहेर काढले आणि रुग्णवाहिकेतून ब्रम्हपुरी येथील सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र गंभीर जखमी झालेले चालक नितीन विनायक भर्रे आणि बारा वर्षांची श्रावणी हिमेश बेदरे यांना नागभीड येथील सरकारी दवाखान्यात हलवले असता डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. अपघातात जखमी झालेले हिमेश बेदरे आणि इतर पाच जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

हिमेश बेदरे यांच्या तक्रारीवरून नागभीड पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ च्या कलम १०६(१) (निष्काळजीपणामुळे मृत्यू घडवणे), २८१ (बेदरकारपणे वाहन चालवणे), १२५(अ), १२५(ब) (गंभीर दुखापत करणे) तसेच मोटर वाहन कायद्याच्या कलम १८४, १३४ आणि १८७ अन्वये गुन्हा नोंदवला आहे. ठाणे प्रभारी अधिकारी रमाकांत कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिल वेल्हाळ डोंगरवार हे फरार वाहनचालकाचा शोध घेत पुढील तपास करत आहेत.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ