चंद्रपूर पोलीस दलाला 14 नवीन वाहने, पालकमंत्री उईके यांच्या हस्ते लोकार्पण
चंद्रपूर जिल्हा पोलीस दलाच्या ताफ्यात 14 नवी वाहने आणि दोन मोबाईल सीसीटीव्ही सर्व्हिलन्स व्हॅन दाखल झाल्या असून, पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांच्या हस्ते त्यांचे लोकार्पण करण्यात आले.
चंद्रपूर जिल्हा पोलीस दलाची कार्यक्षमता, गतिशीलता आणि आपत्कालीन परिस्थितीत प्रतिसाद देण्याची क्षमता अधिक बळकट करण्यासाठी पोलीस दलाला 14 नवीन वाहने मिळाली आहेत. या वाहनांचे लोकार्पण राज्याचे आदिवासी विकास मंत्री आणि चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांच्या हस्ते करण्यात आले.
याच कार्यक्रमात शहरातील सुरक्षा आणि कायदा-सुव्यवस्था अधिक भक्कम करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज अशा दोन मोबाईल सीसीटीव्ही सर्व्हिलन्स व्हॅनदेखील पोलीस दलाच्या सेवेत दाखल करण्यात आल्या.
या कार्यक्रमाला खासदार प्रतिभा धानोरकर, विधान परिषद सदस्य सुधाकर अडबाले, आमदार किशोर जोरगेवार, देवराव भोंगळे आणि करण देवतळे उपस्थित होते. यासोबतच जिल्हाधिकारी वसुमना पंत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, महानगरपालिका आयुक्त अकुनुरी नरेश, पोलीस अधीक्षक आयुष नोपानी आणि अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्यासह पोलीस विभागातील वरिष्ठ अधिकारीही हजर होते.
शहरातील कायदा व सुव्यवस्था कायम राखणे, गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवणे तसेच मोर्चे, सण-उत्सव, मिरवणुका आणि गर्दीच्या ठिकाणी प्रभावी नजर ठेवणे यासाठी या दोन मोबाईल सीसीटीव्ही सर्व्हिलन्स व्हॅनचा वापर केला जाणार आहे. गरज पडेल त्या ठिकाणी तातडीने फिरती नियंत्रण यंत्रणा उभी करणे या व्हॅनमुळे शक्य होणार आहे. या वाहनांवर 360 अंश फिरणारे उच्च क्षमतेचे पीटीझेड कॅमेरे, तसेच हाय-डेफिनिशन आणि नाईट-व्हिजन कॅमेरे बसवण्यात आले असून, दिवसा आणि रात्री दोन्ही वेळी लांब अंतरावरील हालचालींचे स्पष्ट चित्रण मिळणार आहे.
या व्हॅनमधील कॅमेरे मध्यवर्ती नियंत्रण कक्षाशी जोडले जाणार असल्याने घटनास्थळावरील परिस्थिती थेट पाहणे सोपे होईल. वाहनांच्या आत आधुनिक मॉनिटर्स, व्हिडिओ रेकॉर्डिंग आणि स्टोरेज यंत्रणा तसेच सार्वजनिक घोषणा प्रणाली देण्यात आली आहे, त्यामुळे गर्दी व्यवस्थापन आणि आपत्कालीन प्रसंगी सूचना देणे व तातडीचे निर्णय घेणे शक्य होईल. संवेदनशील भाग, महत्त्वाचे चौक, गर्दीची ठिकाणे आणि विविध सार्वजनिक कार्यक्रमांच्या वेळी या फिरत्या यंत्रणेचा वापर केला जाणार आहे. कोणतीही अनुचित घटना घडल्यास परिस्थिती प्रत्यक्ष पाहून पोलीस पथकांना तातडीने सूचना देणे आणि योग्य ती प्रतिसाद यंत्रणा कार्यान्वित करणे यामुळे सोपे होणार आहे.
जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून ही नवीन वाहने मिळाली असून, त्यामुळे पोलीस दलाच्या नियमित गस्तीला गती मिळणार आहे. कायदा व सुव्यवस्था राखणे, घटनास्थळी तातडीने पोहोचणे आणि आपत्कालीन परिस्थितीत जलद प्रतिसाद देण्याची क्षमता यामुळे अधिक बळकट होईल. आधुनिक वाहने आणि तंत्रज्ञानाधारित निगराणीमुळे सक्षम पोलीस दल, सुरक्षित चंद्रपूर हे उद्दिष्ट साध्य करण्यास मदत होणार आहे.
पोलीस अधीक्षक आयुष नोपानी आणि अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस मोटार परिवहन विभाग, पोलीस कल्याण विभाग, बिनतारी संदेश विभाग, सायबर पोलीस स्टेशन आणि पोलीस मुख्यालयातील अधिकारी व अंमलदारांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले.