माविमच्या कार्पेट प्रकल्पातून ग्रामीण महिलांना रोजगाराचा मार्ग, जिल्हाधिकाऱ्यांची पाहणी
चंद्रपूर जिल्ह्यातील मूल आणि सावली येथील माविमच्या कार्पेट निर्मिती केंद्रांना जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी भेट देत आधुनिकीकरण आणि बाजारपेठ विस्ताराच्या सूचना दिल्या.
चंद्रपूर जिल्ह्यात महिला आर्थिक विकास महामंडळाच्या (माविम) पुढाकाराने मूल आणि सावली येथे उभारलेल्या कार्पेट निर्मिती केंद्रांना जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी आज (दि. 16) भेट दिली. या केंद्रांमधून महिलांना शाश्वत रोजगार मिळावा, हा माविमचा उद्देश असून पंत यांनी दोन्ही केंद्रांची प्रत्यक्ष पाहणी करत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादन क्षमता वाढवण्याच्या आणि ताडोबासारख्या पर्यटनस्थळांवर या कार्पेटला बाजारपेठ मिळवून देण्याच्या सूचना दिल्या.
जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वप्रथम मूल एमआयडीसीमधील कार्पेट निर्मिती केंद्राला भेट दिली. तिथे कार्पेट विणण्याचे काम करणाऱ्या महिलांशी संवाद साधत त्यांनी निर्मिती प्रक्रिया, उत्पादन क्षमता, विक्री व्यवस्था आणि महिलांना मिळणाऱ्या रोजगाराबाबत सविस्तर माहिती घेतली. मैत्रीण लोकसंचालित साधन केंद्राच्या अध्यक्षा छाया शेंडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे स्वागत करत केंद्राच्या कामकाजाची माहिती दिली.
हाताने तयार होणाऱ्या कार्पेटला आधुनिक व अत्याधुनिक उपकरणांची जोड दिली तर उत्पादन क्षमता वाढण्यास मदत होईल, असे जिल्हाधिकारी पंत यांनी सांगितले. उत्पादन खर्च नियंत्रणात ठेवून आकर्षक आणि दर्जेदार कार्पेट तयार केल्यास ताडोबासारख्या पर्यटनस्थळांवर त्याला चांगली बाजारपेठ मिळू शकते, असेही त्यांनी नमूद केले. कार्पेटसोबतच आकर्षक कार्पेट फ्रेम्स तयार करण्यावरही भर द्यावा, अशी सूचना त्यांनी यावेळी दिली.
यानंतर जिल्हाधिकारी पंत यांनी सावली येथे नव्याने बांधलेल्या कार्पेट निर्मिती केंद्राचीही पाहणी केली. या केंद्राचे बांधकाम उत्तम झाले असल्याचे नमूद करत, भविष्यात हे केंद्र कार्पेट निर्मिती आणि प्रशिक्षणाचे 'सेंटर ऑफ एक्सलन्स' म्हणून विकसित करण्याच्या दृष्टीने नियोजन करावे, अशी सूचना त्यांनी दिली. या केंद्रात महिलांना अधिकाधिक प्रशिक्षण देऊन त्यांचे कौशल्य वाढवावे आणि त्यातून रोजगार व उत्पन्नाच्या शाश्वत संधी निर्माण कराव्यात, असेही त्यांनी सांगितले.
माविमच्या माध्यमातून महिला बचत गट आणि लोकसंचालित साधन केंद्रांशी जोडलेल्या महिलांना कार्पेट निर्मितीचे कौशल्य, आधुनिक तंत्रज्ञान आणि प्रभावी विपणनाची जोड मिळाली, तर ग्रामीण महिलांसाठी रोजगाराचे सक्षम माध्यम उभे राहू शकते. स्थानिक उत्पादने पर्यटन बाजारपेठेशी जोडली गेली तर महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणालाही अधिक चालना मिळेल, असे यावेळी सांगण्यात आले.
या पाहणीच्या वेळी मूलचे उपविभागीय अधिकारी नितीन जाधव, माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी प्रदीप काठोळे, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नागभीड येथील उपअभियंता शीतल दामले, मैत्रीण लोकसंचालित साधन केंद्राच्या अध्यक्षा छाया शेंडे यांच्यासह संबंधित अधिकारी, कर्मचारी आणि कार्पेट निर्मिती करणाऱ्या महिला उपस्थित होत्या.