पंतप्रधान मोदींच्या वाढदिवशी पियूष गोयलांचा 'सेवा' संकल्प; उत्तर मुंबईत 100 सुविधा केंद्रे आणि ओपन जिमची घोषणा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त उत्तर मुंबईचे खासदार आणि केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पियूष गोयल यांनी मतदारसंघात दिवसभर विविध सेवा आणि विकासकामांना गती दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत उत्तर मुंबईचे खासदार आणि केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पियूष गोयल यांनी आपल्या मतदारसंघात दिवसभर विविध सेवा आणि विकासकामांना गती दिली. महिला सक्षमीकरणापासून नागरी सुविधा, आरोग्य, रक्तदान आणि युवा उद्योजकांशी संवाद अशा वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये त्यांनी सहभाग नोंदवला. दिवसभरात मतदारसंघातील वेगवेगळ्या भागांमध्ये फिरत त्यांनी नागरिकांच्या विविध गरजा आणि अपेक्षा समजून घेतल्या.
दौऱ्याची सुरुवात चारकोपमधील 'प्रगतीचा दिया' या वेल्फेअर सेंटरपासून झाली. इथे गोयल यांनी महिला लाभार्थींशी संवाद साधला. त्यांच्या अडचणी, अनुभव आणि भविष्यातील अपेक्षा समजून घेत कल्याणकारी योजनांचा प्रत्यक्ष किती फायदा मिळतोय, याचा आढावा त्यांनी घेतला. महिलांशी थेट संवाद साधून योजना जमिनीवर किती प्रभावीपणे राबवल्या जात आहेत, हे पाहण्याचा हा प्रयत्न होता.
त्यानंतर गोयल कांदिवलीतील दुर्गा साई एसआरए परिसरात पोहोचले आणि तिथे लाभार्थी कुटुंबांच्या घरांना भेटी दिल्या. विकासकामं फक्त कागदावर न राहता ती थेट नागरिकांच्या दारापर्यंत पोहोचली पाहिजेत, असा संदेश त्यांनी यावेळी दिला. कुटुंबांच्या घरी जाऊन त्यांनी प्रत्यक्ष परिस्थिती जाणून घेतली.
याच दौऱ्यात उत्तर मुंबईतील नागरिकांसाठी एक महत्त्वाची घोषणा करण्यात आली. मतदारसंघात लवकरच 100 सुविधा केंद्रे उभारण्यात येणार असून, या केंद्रांमध्ये स्वच्छतागृह, स्वच्छ पिण्याचे पाणी आणि परवडणाऱ्या दरात लॉन्ड्री सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे. या सुविधांची सर्वाधिक गरज असलेल्या वस्त्या आणि समुदायांना याचा थेट फायदा होणार आहे. मूलभूत नागरी सुविधांपासून वंचित असलेल्या भागांमध्ये या केंद्रांमुळे दैनंदिन जीवन सुसह्य होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
याशिवाय उत्तर मुंबईत ओपन जिम उभारण्याची योजनाही गोयल यांनी जाहीर केली. युवक, ज्येष्ठ नागरिक आणि कुटुंबांना घराजवळच व्यायामाची सुविधा मिळावी, हा यामागचा उद्देश असल्याचे सांगण्यात आले. मोदींच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरालाही गोयल यांनी भेट दिली आणि रक्तदात्यांचे तसेच स्वयंसेवकांचे कौतुक केले. आरोग्य आणि तंदुरुस्तीच्या दृष्टीने ही दोन्ही पावले महत्त्वाची मानली जात आहेत.
दौऱ्यादरम्यान बोरीवलीतील कल्पना चावला चौक, सरदार वल्लभभाई चौक आणि चिकुवाडी जॉगर्स पार्क येथील विकासकामांचे उद्घाटनही गोयल यांच्या हस्ते करण्यात आले. यासोबतच वीर सावरकर मैदानावर आयोजित पारणा समारंभातही त्यांनी सहभाग घेतला. या सर्व ठिकाणी स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.
दिवसभराच्या या दौऱ्यात गोयल यांनी बोरीवली आणि दहिसरमधील गणपती मंडपांनाही भेट दिली. यावेळी त्यांनी स्टार्टअप उद्योजकांशी संवाद साधत त्यांच्या व्यवसायाच्या कल्पना आणि आतापर्यंतचा प्रवास याबाबत चर्चा केली. एकंदरीत, मोदींच्या वाढदिवसानिमित्त उत्तर मुंबईत सेवा, नागरी सुविधा, आरोग्य आणि महिला सक्षमीकरण हे मुद्दे दिवसभर केंद्रस्थानी राहिले.