दादासाहेब फाळके चित्रनगरीत नवीन रुग्णवाहिका, अग्निशमन यंत्रणा आणि स्टुडिओचे लोकार्पण
सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते चित्रनगरीत सेवा संकल्प अभियानांतर्गत विविध सुविधांचे उद्घाटन
महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने राबवण्यात आलेल्या 'सेवा संकल्प अभियाना'अंतर्गत दादासाहेब फाळके चित्रनगरीत अनेक लोकसेवा आणि सांस्कृतिक उपक्रमांचे लोकार्पण करण्यात आले. सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते हा कार्यक्रम पार पडला. चित्रनगरी ही केवळ चित्रपटांच्या चित्रीकरणाची जागा नसून महाराष्ट्राच्या कला आणि संस्कृतीची कर्मभूमी आहे, असे मंत्री शेलार यावेळी बोलताना म्हणाले. कलाकारांना अधिक सुविधा, तंत्रज्ञांना नव्या संधी आणि तरुण पिढीला आधुनिक व्यासपीठ मिळावे यासाठी शासन प्रयत्न करत असल्याचेही त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमाला फिल्मसिटीच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे-पाटील, सहव्यवस्थापक प्रशांत साजणीकर, एनजीएमएच्या संचालक निधी चौधरी यांच्यासह चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार, तंत्रज्ञ आणि गायक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मंत्री ॲड. शेलार यांच्या हस्ते चित्रनगरीतील स्टुडिओ क्रमांक एकचे लोकार्पण करण्यात आले. दर्जेदार पायाभूत सुविधांमुळे कलाकार, निर्माते आणि तंत्रज्ञांना चित्रीकरण व निर्मितीसाठी अधिक सोयी मिळणार असून चित्रनगरीला आधुनिक निर्मिती केंद्र बनवण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचे त्यांनी नमूद केले.
कलाकार, तंत्रज्ञ आणि कर्मचाऱ्यांच्या आरोग्य व सुरक्षिततेसाठी 'डॉक्टर्स फॉर यू' या संस्थेकडून दोन नव्या रुग्णवाहिका मंत्री ॲड. शेलार यांच्या उपस्थितीत उपलब्ध करून देण्यात आल्या. यापूर्वीची एक रुग्णवाहिका आधीच कार्यरत असल्याने आता चित्रनगरीत एकूण तीन रुग्णवाहिका उपलब्ध झाल्या आहेत. याशिवाय तंत्रज्ञ, निर्मिती संस्थांचे कर्मचारी आणि संबंधित मनुष्यबळासाठी मोफत बस सेवाही सुरू करण्यात आली.
चित्रनगरीतील अग्निसुरक्षा अधिक मजबूत करण्यासाठी अत्याधुनिक अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. ही यंत्रणा तीन टप्प्यांत उभारण्यात आली असून प्रत्येक टप्प्यासाठी १५ लाख लिटर क्षमतेची अग्निशमन पाणी साठवण टाकी आणि स्वतंत्र फायर पंप यंत्रणा बसवण्यात आली आहे. यामुळे १५ स्टुडिओ, प्रशासकीय इमारत, हेलिपॅड, खंडाळा घाट आणि व्यवस्थापकीय संचालकांच्या निवासस्थान परिसराची अग्निसुरक्षा आणखी सक्षम झाली आहे. अंतिम अग्निशमन ना-हरकत प्रमाणपत्र मिळवणारी चित्रनगरी ही महाराष्ट्र शासनाची पहिली शासकीय मालमत्ता ठरली आहे. यावेळी नव्या समिती कक्षाचेही उद्घाटन मंत्री ॲड. शेलार यांच्या हस्ते करण्यात आले.
तरुण पिढीला डिजिटल माध्यमातून कला सादर करण्याची संधी मिळावी यासाठी रील स्पर्धा आणि रील व्यवसाय कार्यशाळा आयोजित करण्यात आल्याचे मंत्री ॲड. शेलार यांनी सांगितले. 'श्री महागणपतिस्तोत्र' या संगीत व्हिडिओ आणि 'अभंग रिपोस्ट' उपक्रमातून महाराष्ट्राच्या भक्ती आणि संगीत परंपरेला आधुनिक माध्यमांची जोड देण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले.
नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट आणि चित्रनगरीच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'लेन्स अँड लेगसी: बॉलिवूडचा दृक्-प्रवास' या विशेष छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटनही मंत्री शेलार यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रदर्शनात भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासाचा प्रवास दुर्मीळ छायाचित्रे, पोस्टर्स आणि जुन्या अभिलेखीय साहित्यातून मांडण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त बोलताना मंत्री ॲड. शेलार म्हणाले की, पंतप्रधान मोदी यांनी वाढदिवस साजरा करण्याऐवजी 'सेवा संकल्प' घेऊन समाजासाठी काम करण्याचे आवाहन केले आहे. त्यानुसार जनसेवा, कर्मचारी सेवा आणि सांस्कृतिक क्षेत्राच्या उत्थानासाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत. नागरिकांनीही सेवाभाव जोपासून देशाच्या विकासासाठी योगदान द्यावे आणि विकसित भारताच्या संकल्पपूर्तीसाठी प्रत्येकाने आपापल्या परीने योगदान देण्याचा निश्चय करावा, असे आवाहनही त्यांनी केले.