मोरवा विमानतळावरून पुणे-मुंबई-दिल्ली विमानसेवेसाठी मुनगंटीवार यांचा दिल्लीत पाठपुरावा
चंद्रपूरला थेट हवाई जोडणी मिळावी यासाठी आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री किंजरापू राममोहन नायडू यांची भेट घेतली, मंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
चंद्रपूर जिल्ह्यातील मोरवा विमानतळाचा केंद्र सरकारच्या 'उडान' (उडे देश का आम नागरिक) योजनेत समावेश करून चंद्रपूरहून पुणे, मुंबई आणि दिल्लीसाठी नियमित प्रवासी विमानसेवा सुरू करावी, अशी आग्रही मागणी आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी नवी दिल्लीत केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री किंजरापू राममोहन नायडू यांच्याकडे केली. मोरवा विमानतळाचा विस्तार आणि त्यासाठी लागणाऱ्या इतर आवश्यक बाबींचा विचार करून चंद्रपूरसाठी नियमित हवाई सेवा सुरू करण्याच्या दृष्टीने सकारात्मक पावले उचलण्याचे आश्वासन केंद्रीय मंत्र्यांनी यावेळी दिले. यामुळे चंद्रपूरच्या हवाई जोडणीच्या मागणीला केंद्र सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे.
विदर्भातील औद्योगिक आणि खनिजसंपत्तीने समृद्ध जिल्हा अशी चंद्रपूरची ओळख आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कोळसा व इतर खनिजसंपत्ती असून सिमेंट उद्योग, बल्लारपूर पेपर मिल, चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्र, धारिवाल, जीएमआर आणि वर्धा पॉवर यांसारखे महत्त्वाचे औद्योगिक व ऊर्जा प्रकल्प येथे कार्यरत आहेत. याशिवाय ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पामुळे चंद्रपूर देश-विदेशातील पर्यटकांचे आकर्षणकेंद्र बनले आहे. उद्योग, व्यापार, पर्यटन, शिक्षण आणि प्रशासकीय कामकाजाचा वाढता विस्तार लक्षात घेता चंद्रपूरला थेट हवाई जोडणीची गरज असल्याचे मुनगंटीवार यांनी केंद्रीय मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले.
सध्या चंद्रपूरहून नियमित विमानसेवा उपलब्ध नसल्यामुळे विद्यार्थी, उद्योजक, व्यावसायिक, सरकारी अधिकारी-कर्मचारी तसेच सर्वसामान्य नागरिकांना विमानप्रवासासाठी नागपूर किंवा इतर शहरांवर अवलंबून राहावे लागते, त्यामुळे प्रवासात वेळ आणि पैसा दोन्ही जास्त खर्च होतात. चंद्रपूरहून थेट विमानसेवा सुरू झाल्यास ही अडचण दूर होईलच, शिवाय जिल्ह्यातील उद्योग, व्यापार, पर्यटन, शिक्षण आणि रोजगाराच्या संधींनाही चालना मिळू शकेल.
चंद्रपूर शहरापासून सुमारे ९ किलोमीटर अंतरावर असलेला मोरवा विमानतळ यासाठी महत्त्वाचा ठरू शकतो. सुमारे ६२ एकर जागेवर असलेल्या या विमानतळाची सध्याची धावपट्टी सुमारे १ किलोमीटर लांबीची आहे. आवश्यक तांत्रिक निकषांनुसार धावपट्टीचा विस्तार केल्यास नियमित प्रवासी विमानसेवा सुरू होण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. विमानतळाच्या दक्षिण-पूर्व आणि पश्चिम दिशेला वनविभागाची जमीन, तर उत्तर दिशेला खासगी जमीन असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रातील उंच बॉयलर्समुळे निर्माण झालेल्या तांत्रिक अडचणींचा आधुनिक विमान वाहतूक तंत्रज्ञानाच्या पार्श्वभूमीवर पुनर्विचार करावा, अशीही मागणी मुनगंटीवार यांनी केली आणि यावर तांत्रिक अभ्यास करून व्यवहार्य मार्ग काढण्याची गरज असल्याचे स्पष्ट केले.
मोरवा विमानतळाचा 'उडान' योजनेत समावेश झाल्यास चंद्रपूर देशातील प्रमुख शहरांशी प्रादेशिक हवाई मार्गाने जोडले जाऊ शकेल. चंद्रपूर-पुणे, चंद्रपूर-मुंबई आणि चंद्रपूर-दिल्ली या मार्गांवर नियमित सेवा सुरू करण्याची मागणी मुनगंटीवार यांनी विशेषत्वाने मांडली. या जोडणीमुळे चंद्रपूरच्या उद्योगांना बाजारपेठांशी संपर्क साधता येईल, विद्यार्थ्यांना शैक्षणिक केंद्रांशी जोडणी मिळेल आणि ताडोबाला येणाऱ्या देश-विदेशातील पर्यटकांचा प्रवासही सुकर होईल.
मोरवा विमानतळाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मुनगंटीवार यांनी यापूर्वीही सातत्याने पाठपुरावा केला आहे. १५ ऑक्टोबर २०२५, १५ डिसेंबर २०२५ आणि २७ मार्च २०२६ रोजी त्यांच्या कार्यालयामार्फत केंद्र सरकारकडे याबाबत पाठपुरावा करण्यात आला होता. यानंतर आता पुन्हा एकदा नवी दिल्लीत केंद्रीय मंत्री किंजरापू राममोहन नायडू यांची भेट घेऊन मुनगंटीवार यांनी निवेदन सादर केले. मुनगंटीवार यांच्या आग्रही मागणीची दखल घेत केंद्रीय मंत्र्यांनी मोरवा विमानतळाबाबत आवश्यक कार्यवाही करून चंद्रपूरसाठी नियमित हवाई सेवा सुरू करण्याच्या दिशेने पुढाकार घेण्याचे आश्वासन दिले आहे.