माफसूच्या विद्यार्थ्यांना मिळणार 18 हजार रुपये विद्यावेतन, पंकजा मुंडे यांनी दिले नवीन शिक्षक भरती आणि निधीचे
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या म्हणजेच माफसूच्या विकासकामांना गती देण्याबरोबरच विद्यार्थ्यांना आवश्यक त्या सुविधा वेळेत मिळाव्यात, यासाठी पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश दिले आहेत. मंत्रालयात झालेल्या एका बैठकीत त्यांनी हे निर्देश दिले.
या बैठकीत विद्यापीठाच्या शैक्षणिक, प्रशासकीय आणि पायाभूत सुविधांशी संबंधित वेगवेगळ्या महत्त्वाच्या मुद्द्यांचा आढावा घेण्यात आला. यातच पशुवैद्यक विज्ञान आणि पशुसंवर्धन म्हणजेच बीव्हीएससी अँड एएच या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनात वाढ करण्याच्या प्रस्तावावरही चर्चा झाली.
इतर वैद्यकीय शाखांच्या विद्यार्थ्यांप्रमाणेच माफसूच्या विद्यार्थ्यांनाही दरमहा 18 हजार रुपये विद्यावेतन देण्याचा प्रस्ताव आहे. यासाठी 4 कोटी 12 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव पुढील मंत्रिमंडळ बैठकीत मंजूर करून घेण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश मंत्री पंकजा मुंडे यांनी दिले.
माफसूच्या विकासासाठी विद्यापीठातील रिक्त शिक्षक आणि शिक्षकेतर पदांची भरती करण्यालाही मंत्री पंकजा मुंडे यांनी प्राधान्य दिलं आहे. विद्यापीठातील रिक्त शिक्षक आणि शिक्षकेतर पदांच्या भरती प्रक्रियेचाही आढावा त्यांनी या बैठकीत घेतला आणि ही भरती प्रक्रिया अधिक वेगाने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.
भारतीय पशु चिकित्सा परिषद म्हणजेच बीसीआयच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार आवश्यक तेवढ्या संख्येने शिक्षक उपलब्ध व्हावेत, यासाठी शिक्षक भरतीला प्राधान्य देण्यास सांगण्यात आले आहे. त्याचबरोबर शिक्षकेतर पदांची भरतीही लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले.
माफसूच्या अंतर्गत वेगवेगळ्या ठिकाणी सुरू असलेल्या पायाभूत सुविधा आणि बांधकामांच्या कामांचाही या बैठकीत आढावा घेण्यात आला. शैक्षणिक इमारती, रुग्णालये आणि वसतिगृहांशी संबंधित बांधकाम प्रकल्पांची सद्यस्थिती काय आहे, याची माहिती घेण्यात आली. यामध्ये मुंबई, नागपूर, परभणी, शिरवल, उदगीर, वरूड आणि मोशी अशा वेगवेगळ्या ठिकाणच्या प्रकल्पांचा समावेश आहे. या सर्व ठिकाणी बांधकाम काम कोणत्या टप्प्यात आहे, याचा तपशील मंत्री पंकजा मुंडे यांनी बैठकीत जाणून घेतला.
मंत्री पंकजा मुंडे यांनी सर्व बांधकामांच्या प्रगतीनुसार अहवाल तयार करून ती कामे ठरलेल्या वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश दिले. विद्यार्थ्यांना निवासासह इतर आवश्यक सुविधा वेळेत उपलब्ध करून देण्यावरही त्यांनी भर दिला. या बैठकीत विद्यार्थ्यांचे विद्यावेतन, इंटर्नशिप भत्ते तसेच पशुवैद्यकीय आणि डेअरी टेक्नॉलॉजी अभ्यासक्रमांच्या शुल्क रचनेवरही सविस्तर चर्चा झाली. या संबंधित सर्व बाबींमधील आवश्यक प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले, जेणेकरून विद्यार्थ्यांना त्याचा लाभ वेळेत मिळू शकेल.