अजय बारस्करांचा मनोज जरांगेंवर १ हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप, ईडीकडे तक्रार
मराठा कार्यकर्ते अजय बारस्कर यांनी मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या निकटवर्तीयांवर कोट्यवधींची अवैध माया जमवल्याचा आरोप करत १५ दिवसांपूर्वीच ईडीकडे तक्रार दाखल केल्याचा दावा केला आहे.
मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची संपत्ती जर उघड झाली, तर मराठा समाजच त्यांना सोडणार नाही, असा थेट इशारा मराठा कार्यकर्ते अजय बारस्कर यांनी दिला आहे. आंदोलनाच्या नावाखाली जरांगे पाटील यांच्या निकटवर्तीयांनी प्रचंड अवैध माया जमवल्याचा गंभीर आरोपही बारस्कर यांनी केला असून, यामुळे मराठा आंदोलनासोबतच राजकीय वातावरणही तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
बारस्कर यांनी सांगितले की, त्यांनी १५ दिवसांपूर्वीच अंमलबजावणी संचालनालयाकडे (ईडी) मनोज जरांगे आणि त्यांच्या सहकाऱ्यांविरोधात अधिकृत तक्रार दाखल केली आहे. जरांगेंच्या घोटाळ्याचा आकडा तब्बल १ हजार कोटी रुपयांच्या घरात असल्याचा दावा त्यांनी केला. आंदोलनाच्या नावाखाली जरांगेंच्या जवळच्या लोकांनी मोठ्या प्रमाणात बेकायदा पैसा गोळा केल्याचंही ते म्हणाले. उदाहरण देताना बारस्कर यांनी सांगितले की, जरांगेंचे निकटवर्ती पांडुरंग तारक यांच्याकडे आधी फक्त १० गुंठे जमीन होती, तर आता त्यांच्याकडे तब्बल ५० एकर जमीन आहे. आंतरवली आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये त्यांनी कोट्यवधी रुपयांच्या जमिनी खरेदी केल्याचाही आरोप बारस्करांनी केला.
सुरुवातीच्या काळात जरांगे पाटील नेहमी सांगायचे की, ते फक्त खुल्या पद्धतीने चर्चा करतात, बंद दाराआड चर्चा करत नाहीत. मात्र नंतर त्यांनी उदय सामंत, संदीपान भुमरे, अजित पवार, शरद पवार, अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण अशा अनेक नेत्यांशी बंद दाराआड चर्चा आणि सेटिंग केल्याचा आरोप बारस्कर यांनी केला. या नेत्यांशी नेमकी काय चर्चा झाली हे जरांगेंनी स्पष्ट करावे, असे आव्हानही त्यांनी दिले.
बारस्कर यांनी जरांगेंची तुलना कॅप्टन अशोक खरात यांच्याशी केली. मोठमोठे नेते ज्याच्या पाया पडायचे तो कॅप्टन अशोक खरात नंतर उघड झाला आणि जेलमध्ये गेला, तसेच जरांगे हे सामाजिक खरात बाबा असल्याचा टोला त्यांनी लगावला. उपोषणाचे नाटक करून जरांगे मराठा समाजाला फसवत असल्याचा आरोपही केला. जरांगेंच्या आंदोलनाला उपोषणाचे व्यसनच लागल्याचे सांगत, ते उपोषणाच्या नावाखाली सलाईनमधून ग्लुकोज घेतात आणि आता अधिकृतपणे उपोषण सोडावे, पण उपोषणाचा मांडव सोडायला ते तयार नाहीत, असेही बारस्कर म्हणाले.
२ सप्टेंबर रोजी अंतरवली सराटी येथे 'जिंकलो रे राजा' अशी घोषणा देऊन जरांगे यांनी मराठा समाजाची दिशाभूल केल्याचा आरोपही बारस्कर यांनी केला. हैदराबाद गॅझेटचा जीआर आणि 'सगेसोयरे' या मुद्द्यांवरून जरांगेंनी मराठा समाजाची, विशेषतः महिलांची फसवणूक केल्याचा दावाही त्यांनी केला. मराठा आंदोलनादरम्यान ३५० पेक्षा जास्त तरुणांचा बळी गेल्याचे सांगत, सुमारे २ कोटी रुपये किमतीची Defender गाडी वापरताना जरांगेंच्या मनाला काहीच वाटले नाही का, असा सवालही बारस्करांनी उपस्थित केला. आंदोलनात खरे गरजवंत मराठा तरुण नसून वाळू व्यावसायिक आणि कॉन्ट्रॅक्टर मोठ्या संख्येने सहभागी झाल्याचाही आरोप त्यांनी केला.