मंगोलियाच्या राष्ट्राध्यक्षांनी सैनिकांसमोर मारले 100 किलोचे 20 बेंच प्रेस, व्हिडिओ व्हायरल
मंगोलियाचे राष्ट्राध्यक्ष उखनागीन खुरेलसुख यांनी लष्करी युनिटच्या दौऱ्यावर सूट काढून थेट जिमच्या बेंचवर झोपत ताकद दाखवली, व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल.
जगभरातल्या राष्ट्राध्यक्षांना आणि पंतप्रधानांना आपण नेहमी फॉर्मल सूट-बूटमध्ये गंभीर बैठकांमध्ये किंवा आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर भाषण देताना बघतो. पण मंगोलियाचे राष्ट्राध्यक्ष उखनागीन खुरेलसुख यांनी हा शिरस्ता मोडून एक भलताच विक्रम करून दाखवला आहे.
मंगोलियन सेनेच्या ०८४ व्या मिलिट्री युनिटच्या दौऱ्यावर गेले असताना ५८ वर्षांच्या खुरेलसुख यांनी सैनिकांच्या मध्यभागी जाऊन अचानक आपला सूट जॅकेट काढला आणि थेट जिमच्या बेंचवर जाऊन झोपले. त्यानंतर त्यांनी १०० किलोग्रॅम वजनाची बारबेल उचलून एक-दोन नव्हे तर सलग २० बेंच प्रेस मारले.
इतकं जड वजन उचलूनही त्यांच्या चेहऱ्यावर थकवा किंवा त्रासाचं कुठलंही चिन्ह दिसलं नाही. वर्कआउट संपल्यावर ते सहज उठले, तिथे उभ्या असलेल्या लष्करी अधिकारी आणि सैनिकांशी हस्तांदोलन केलं आणि पुन्हा जॅकेट घालून टाकलं. या घटनेचा व्हिडिओ खुद्द राष्ट्राध्यक्षांनी स्वतःच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरून शेअर केला आणि तो इंटरनेटवर तुफान व्हायरल झाला.
खुरेलसुख यांचा हा स्टॅमिना एका दिवसात आलेला नाही. २०२१ पासून मंगोलियाचे राष्ट्राध्यक्ष असलेले खुरेलसुख राजकारणात येण्याआधी मंगोलियन पीपल्स आर्मीमध्ये अधिकारी म्हणून काम करत होते. लष्करी सेवेतच त्यांना बॉडीबिल्डिंग आणि मार्शल आर्ट्सची आवड लागली, जी त्यांनी आजही ५८ व्या वर्षी जपली आहे. याच तगड्या शारीरिक क्षमतेमुळे आणि शिस्तीमुळे ते सैनिकांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहेत. एखाद्या राष्ट्राध्यक्षाने थेट सैनिकांसमोर १०० किलोचं बेंच प्रेस मारून दाखवणं ही अत्यंत दुर्मिळ घटना मानली जात आहे.
खुरेलसुख यांचं व्यक्तिमत्त्व फक्त राजकारण आणि फिटनेसपुरतं मर्यादित नाही. ते 'पल्स' नावाच्या एका रॉक बँडमध्ये गिटार वाजवतात. याशिवाय त्यांना हेवी बाईक्सचीही मोठी आवड आहे आणि ते मंगोलियातल्या 'हार्ले डेव्हिडसन फॅन क्लब'चे संस्थापकही आहेत. लष्करी अधिकारी, बॉडीबिल्डर, रॉक गिटारवादक, बाईकर आणि देशाचा राष्ट्राध्यक्ष अशा बहुआयामी व्यक्तिमत्त्वामुळे त्यांची गणना जगातल्या सर्वात युनिक आणि स्टायलिश नेत्यांमध्ये केली जाते.
हा व्हिडिओ एक्स, इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर पोस्ट होताच जगभरातल्या नेटकऱ्यांनी त्यावर प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली. सोशल मीडियावर युजर्स त्यांना 'जगातील सर्वात शक्तिशाली राष्ट्राध्यक्ष' अशी उपाधी देत आहेत. एका युजरने लिहिलं, "जागतिक समस्या सोडवण्यासाठी नेत्यांमध्ये युद्धांऐवजी वेटलिफ्टिंगच्या स्पर्धा घ्याव्यात." दुसऱ्या एका युजरने गमतीत म्हटलं, "जगभरातल्या राष्ट्रप्रमुखांमध्ये वेटलिफ्टिंगची स्पर्धा झाली तर मंगोलिया नक्कीच जगातील सर्वात मोठी महासत्ता बनेल." अनेक युजर्सनी ५८ व्या वर्षी असा स्टॅमिना बघून आश्चर्यही व्यक्त केलं.