आईच्या निधनानंतर अवघ्या ५ तासांच्या पॅरोलवर जेलमधून बाहेर आले चिन्मय दास, डोळ्यात दाटले अश्रू, भावूक क्षणांचा
बांग्लादेशात दोन वर्षांपासून पोलिस कोठडीत असलेले हिंदू भिक्षू चिन्मय कृष्ण दास यांना आईच्या निधनानंतर अंत्यसंस्कारासाठी अवघ्या पाच तासांची पॅरोल मिळाली, आणि जेलबाहेर पडताच ते मंदिरात ढसाढसा रडताना दिसले.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
बांग्लादेशात गेल्या दोन वर्षांपासून पोलिस कोठडीत असलेले हिंदू भिक्षू चिन्मय कृष्ण दास यांना त्यांच्या आईच्या निधनानंतर थोड्या वेळासाठी जेलबाहेर सोडण्यात आले. गुरुवारी १० सप्टेंबरला त्यांची आई संध्या राणी यांचे निधन झाले. त्या बऱ्याच दिवसांपासून आजारी होत्या आणि हथजारीमधील एका रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. जेलमध्ये बंद असलेल्या मुलाला आईची अंतिम इच्छा पूर्ण करता आली नाही, असे कुटुंबियांनी सांगितले.
आई आजारी असताना चिन्मय यांनी तिची भेट घेण्यासाठी पॅरोलची मागणी केली होती, पण प्रशासनाने ती पूर्णपणे फेटाळली होती. आजारी नातेवाईकाला भेटण्यासाठी कैद्याला पॅरोल देण्याची कोणतीही तरतूद नाही, असे उत्तर त्यावेळी प्रशासनाकडून देण्यात आले होते. यामुळे चिन्मय यांना जेलबाहेर जाऊ दिले नाही आणि आई जिवंत असताना तिला पाहण्याची संधीसुद्धा त्यांना मिळाली नाही. याचे दु:ख चिन्मय यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते.
बुधवारी कुटुंबियांनी चिन्मय यांची आईशी भेट घडवून आणण्यासाठी पुन्हा एकदा पॅरोलची मागणी केली होती, पण त्यावेळीही प्रशासनाने ती नाकारली. चिन्मयचा मोठा भाऊ रंजन कुमार यांनी ९ सप्टेंबरला पॅरोलसाठी अर्ज केला होता, पण चितगाँग जिल्हा प्रशासनाने तो अर्जही फेटाळला. दुसऱ्याच दिवशी आईचे निधन झाले, त्यानंतर उपायुक्त झाहिदुल इस्लाम मिया यांनी चिन्मय यांना पाच तासांसाठी जेलबाहेर जाण्याची परवानगी दिली, जेणेकरून ते अंत्यसंस्कारात सामील होऊ शकतील.
अंत्यसंस्कारात सामील होण्यासाठी जेलबाहेर आलेले चिन्मय यांनी आपले आराध्यदैवत राधा-कृष्ण यांच्या पुंडरिक मंदिरात जाऊन देवापुढे नतमस्तक होत आपले दु:ख मांडले. या क्षणी ते ढसाढसा रडताना दिसले. जेलमधून बाहेर पडताच त्यांना धीर सुटला आणि त्यांच्या डोळ्यात अश्रू दाटले. या भावूक क्षणाचे फुटेज सोशल मीडियावर शेअर झाले आणि अनेकांनी त्यावर भावूक प्रतिक्रिया दिल्या. अंत्यसंस्कार पूर्ण झाल्यानंतर त्यांना पुन्हा पोलिस कोठडीत नेण्यात आले. कुटुंबाने दिलेल्या माहितीनुसार, आई संध्या राणी यांचे अंत्यसंस्कार पुंडरिक धाम येथे करण्यात आले.
चिन्मय यांचा भाऊ रंजन कुमार यांनी सांगितले की, आई आता या जगात नाही आणि ती जिवंत असताना चिन्मय यांना तिला पाहण्याची संधीसुद्धा मिळाली नाही.
चिन्मय दास यांना २५ नोव्हेंबर २०२४ मध्ये अटक करण्यात आली होती. राष्ट्रध्वजाचा अनादर केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे, ज्याप्रकरणी देशद्रोहाच्या गुन्ह्याखाली त्यांना पोलिस कोठडीची शिक्षा ठोठावण्यात आली. अटकेनंतर त्यांच्यावर इतरही अनेक गंभीर खटले दाखल करण्यात आले, ज्यामुळे तुरुंगातून त्यांची लवकर सुटका झालेली नाही.