महिंद्रा थारचे नवीन मॉडेल लवकरच बाजारात, लूक आणि फीचर्समध्ये मोठे बदल
महिंद्रा कंपनी थार 3-डोअर मॉडेलमध्ये मोठे बदल करणार असून सप्टेंबर अखेरपर्यंत अपडेटेड गाडी बाजारात येण्याची शक्यता आहे.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
महिंद्रा कंपनीच्या दमदार एसयूव्ही गाड्यांसाठी ओळखल्या जाणाऱ्या थार (Mahindra Thar 3-Door) मॉडेलमध्ये आता मोठे बदल होणार आहेत. कंपनी या लोकप्रिय गाडीत काही महत्त्वाचे अपडेट्स करत असून ही नवी गाडी याच महिन्यात, म्हणजे सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत अधिकृतपणे लॉन्च होऊ शकते. कंपनीने अजून लॉन्च तारखेची अधिकृत घोषणा केलेली नाही, पण या गाडीबद्दल बरेच दिवस चर्चा सुरू आहे.
सध्या बाजारात जी थार उपलब्ध आहे, ती साधारण 2020 सालच्या मूळ लॉन्चिंगच्या वेळचा लूक घेऊन येते आहे. मात्र नव्या अपडेटेड मॉडेलमध्ये कंपनी काही कॉस्मेटिक बदल करणार असून त्यामुळे गाडी आधीपेक्षा अधिक आकर्षक आणि ट्रेंडी दिसणार आहे.
बाहेरील डिझाईनबाबत बोलायचं झालं, तर नव्या थारमध्ये बंपरचं डिझाईन बदललेलं दिसेल, हेडलॅम्प्स नव्या स्टाईलमध्ये असतील आणि पाच स्लॉट असलेली आकर्षक ग्रिल पाहायला मिळेल. यासोबतच पाच-डबल स्पोक डिझाईनचे नवे अलॉय व्हील्सही दिले जाण्याची शक्यता आहे.
केबिनच्या बाबतीत बोलायचं तर थारचं इंटीरियर आधीपेक्षा अधिक प्रीमियम बनवलं जाणार आहे. यात 10.25 इंचाचा डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, व्हेंटिलेटेड सीट्स, वायरलेस स्मार्टफोन चार्जर आणि पॅसिव्ह कीलेस एंट्रीसारखे आधुनिक फीचर्स मिळू शकतात. नवी अपहोल्स्ट्री दिल्यामुळे प्रवास आणखी सुखकर होईल, असं सांगितलं जात आहे.
इंजिनबाबत मात्र कोणताही मोठा बदल होणार नाही, ही या अपडेटमधील महत्त्वाची बाब आहे. आधीप्रमाणेच या गाडीत तीन इंजिन पर्याय कायम ठेवण्यात आले आहेत. यात 117 एचपी पॉवर आणि 300 एनएम टॉर्क देणारं 1.5 लिटरचं डिझेल इंजिन, 130 एचपी पॉवर आणि 300 एनएम टॉर्क देणारं 2.2 लिटरचं डिझेल इंजिन आणि 150 एचपी पॉवर व 300 एनएम टॉर्क देणारं 2.0 लिटरचं पेट्रोल इंजिन यांचा समावेश आहे. हे तिन्ही इंजिन पर्याय 6 स्पीड मॅन्युअल आणि 6 स्पीड ऑटोमॅटिक या दोन्ही ट्रान्समिशनसोबत उपलब्ध असतील. तसंच गाडीत ऑल-व्हील ड्राईव्ह (AWD) चा अनुभवही पूर्वीप्रमाणे कायम राहणार आहे.
भारतीय रस्त्यांवर टेस्टिंग करताना ही एसयूव्ही अलीकडेच नजरेस पडली होती. विशेष म्हणजे या नव्या 3 डोअर थार फेसलिफ्टवर, नुकत्याच लॉन्च झालेल्या थार रॉक्स (Thar Roxx) या मॉडेलचा प्रभाव स्पष्टपणे जाणवतो. लाईटिंगच्या डिझाईनपासून ते डॅशबोर्डवरील मोठ्या टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टमपर्यंत अनेक गोष्टी थार रॉक्ससारख्याच असू शकतात, असं दिसून येतं.
अधिक आधुनिक फीचर्स असलेली ऑफ-रोडर गाडी घेण्याचा विचार करणाऱ्यांसाठी, सप्टेंबरअखेर बाजारात येणारी ही नवी महिंद्रा थार एक चांगला पर्याय ठरू शकते.