गुरुवार, 17 सप्टेंबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
01:06 IST

नंदुरबार-धुळ्याला विजांसह पावसाचा इशारा, शुक्रवारपासून राज्यभर पुन्हा पावसाची हजेरी

राज्यातील बहुतांश भागात पाऊस थांबल्याने उकाडा वाढला असून आज नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यात विजांसह पावसाचा इशारा देण्यात आलाय. शुक्रवारपासून विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचं पुनरागमन होणार आहे.

नंदुरबार-धुळ्याला विजांसह पावसाचा इशारा, शुक्रवारपासून राज्यभर पुन्हा पावसाची हजेरी छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

राज्यातल्या बहुतांश भागात गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारलीय. त्यामुळे तापमानाचा पारा 33 अंशांच्या पुढे गेला असून उन्हाचा चटका आणि उकाडा यामुळे लोक हैराण झालेत. हवामान खात्याच्या ताज्या अंदाजानुसार आज उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार आणि धुळे या दोन जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलीय. राज्यातल्या बाकीच्या भागात मात्र ढगाळ वातावरण राहणार असून ऊन-सावल्यांचा खेळ सुरू राहील. तुरळक ठिकाणी हलक्या सरी पडू शकतात, इतकंच काय ते.

सध्या पूर्व उत्तर प्रदेश आणि बिहारच्या परिसरात समुद्रसपाटीपासून 3.1 किलोमीटर उंचीपर्यंत चक्राकार वारे वाहतायत. मॉन्सूनचा आस असणारा कमी दाबाचा पट्टा फिरोजपूर, मुझफ्फरनगर, बस्ती, देहरी, दिघा ते ईशान्य बंगालच्या उपसागरापर्यंत पसरलेला आहे. यासोबतच दक्षिण गुजरातपासून उत्तर प्रदेशातल्या चक्राकार वाऱ्यांपर्यंत आणखी एक कमी दाबाचा पट्टा तयार झालाय, तर तेलंगणापासून मन्नारच्या आखातापर्यंत तिसरा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. कोकण किनारपट्टीवर मॉन्सून सध्या सर्वसाधारण स्थितीत असला तरी मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तो काहीसा कमजोर पडलाय.

राज्यभर पावसाने उघडीप दिल्यामुळे ऊन-सावल्यांचा खेळ चालू असून तापमान वाढल्याने लोकांना उन्हाचा तडाखा सोसावा लागतोय. आज आणि उद्या राज्यातल्या काही भागांत ढगाळ हवामान राहील आणि हलक्या सरी पडतील, पण मुसळधार पावसाला पोषक वातावरण नाहीये. मात्र शुक्रवारपासून चित्र पालटणार असून पावसाचं पुनरागमन होणार आहे.

शुक्रवारी विदर्भातल्या नागपूर, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांत तसंच मराठवाड्यातल्या नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल असा अंदाज आहे.

शनिवारी पावसाचा जोर आणि व्याप्ती आणखी वाढण्याची शक्यता आहे. चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात मध्यम ते जोरदार पाऊस पडू शकतो, तर बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, यवतमाळ, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात हलका ते मध्यम पाऊस पडेल. मराठवाड्यातल्या छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो, तर धाराशिव आणि लातूर जिल्ह्यात ढगाळ वातावरणासह तुरळक ठिकाणी हलक्या सरी पडतील.

मध्य महाराष्ट्रातल्या नाशिक, अहिल्यानगर आणि पुणे जिल्ह्यात विजा आणि मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज आहे. सातारा, सांगली, सोलापूर, जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यात ढगाळ वातावरणासह काही भागात हलक्या सरी पडू शकतात.

कोकणातही रायगड आणि ठाणे जिल्ह्यात हलका ते मध्यम पाऊस पडणार असून मुंबई आणि पालघर जिल्ह्यात ढगाळ वातावरणासह हलक्या सरी पडतील असं हवामान खात्यानं सांगितलंय.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ