'मित्र' समजून भरवत होता चिकन, मगरीने जबड्यात पकडले दोन्ही पाय; १ तास चालला संघर्ष, घटनेचा व्हिडिओ व्हायरल
पपुआ न्यू गिनीच्या पोर्ट मोर्स्बीमधील एका अॅडव्हेंचर पार्कमध्ये मगरीला रोज चिकन भरवणाऱ्या काळजीवाहकावरच त्याच मगरीने हल्ला केला. तासभर चाललेला हा जीवघेणा संघर्ष आता व्हिडिओतून समोर आला आहे.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
प्राणी आणि माणसाच्या मैत्रीचे अनेक व्हिडिओ आपण सोशल मीडियावर पाहतो, पण काही वेळा हीच मैत्री जीवावर बेतू शकते हे दाखवणारी एक घटना नुकतीच समोर आली आहे. असाच एक धक्कादायक प्रकार पपुआ न्यू गिनीची राजधानी पोर्ट मोर्स्बीमध्ये घडला. इथल्या एका प्रसिद्ध अॅडव्हेंचर पार्कमध्ये अनेक वर्षांपासून मगरींची देखभाल करणाऱ्या एका काळजीवाहकावर त्याच मगरीने अचानक हल्ला केला. या हल्ल्यात काळजीवाहकाचा तब्बल तासभर जीवघेणा संघर्ष सुरू होता, आणि या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
प्रत्यक्षदर्शींनी सांगितल्याप्रमाणे, काळजीवाहक नेहमीप्रमाणे मगरीजवळ जाऊन तिला चिकन भरवत होता. हे त्याचे रोजचे काम होते आणि अनेक वर्षे तो हेच काम करत होता. पण याच वेळी त्या विशालकाय मगरीने चिकनऐवजी काळजीवाहकालाच आपले भक्ष्य बनवण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यावर जोरदार हल्ला चढवला. मगरीने त्याचे दोन्ही पाय पकडले आणि त्याला पाण्यात ओढण्याचा प्रयत्न केला. व्हायरल झालेल्या व्हिडिओत असहाय्य झालेला काळजीवाहक स्वतःला वाचवण्यासाठी तलावाच्या काठाला घट्ट धरून लटकलेला दिसतो, तर त्याचे दोन्ही पाय मगरीच्या तोंडात अडकलेले असतात.
पार्कचे सुरक्षा रक्षक आणि आजूबाजूचे लोक यावेळी फारशी मदत करू शकले नाहीत. मगरीचे लक्ष विचलित करण्यासाठी लोखंडी काठीने प्रयत्न झाला, पण त्याचाही काही उपयोग झाला नाही. संघर्ष तासभर सुरूच राहिला. प्रत्यक्षदर्शींच्या मते, या संपूर्ण संघर्षादरम्यान काळजीवाहकाच्या तोंडून फक्त एकच वाक्य निघत होते, ते म्हणजे "मी काहीही चुकीचे केले नाही."
घटनेची माहिती मिळताच काही वेळातच रेस्क्यू टीम, सेंट जॉन एम्बुलन्स आणि स्थानिक पोलिस पथक घटनास्थळी पोहोचले. पार्कमध्ये त्यावेळी उपस्थित असलेल्या पर्यटकांना तातडीने बाहेर काढण्यात आले. अनेक प्रयत्न करूनही मगर काळजीवाहकाला सोडायला तयार नव्हती, त्यामुळे शेवटी पोलिसांनी मगरीवर गोळी झाडून तिला ठार केले. मगर मेल्यानंतर काळजीवाहकाला तिच्या तावडीतून सुरक्षित बाहेर काढण्यात आले.
या हल्ल्यात काळजीवाहकाच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून त्याला रुग्णवाहिकेतून '3 माइल जनरल हॉस्पिटल'मध्ये दाखल करण्यात आले आहे, जिथे डॉक्टर त्याच्यावर उपचार करत आहेत. या घटनेचे फुटेज @mapkpets या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आले असून ते आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहे. या व्हिडिओनंतर पार्कमधील सुरक्षा प्रोटोकॉलबाबत नेटिझन्सकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.