गुरुवार, 17 सप्टेंबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
02:22 IST

LG स्मार्ट टीव्ही बंद असतानाही ऑडिओ डेटा पाठवतो? कंपनीने दिलं स्पष्टीकरण

गेमर्स नेक्सस आणि लेव्हल 1 टेक या यूट्यूब चॅनेलनी LG च्या स्मार्ट टीव्हीवर 500 तासांची टेस्ट केली, त्यात टीव्ही बंद असतानाही डेटा हाताळला जात असल्याचा दावा झाला.

LG स्मार्ट टीव्ही बंद असतानाही ऑडिओ डेटा पाठवतो? कंपनीने दिलं स्पष्टीकरण छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

टीव्ही बंद केला तरी तो आपलं बोलणं ऐकत असेल, अशी शंका अनेकांना कधी ना कधी येते. आता याच शंकेला बळ देणारी एक गोष्ट समोर आली आहे. गेमर्स नेक्सस आणि लेव्हल 1 टेक या दोन मोठ्या यूट्यूब चॅनेलच्या लोकांनी LG च्या स्मार्ट टीव्हीवर तब्बल 500 तासांची चाचणी केली. या टेस्टनंतर त्यांनी दावा केला की, टीव्ही बंद असतानाही तो काहीतरी काम करत राहतो. या दाव्यावर आता LG कंपनीने आपलं स्पष्टीकरण दिलं आहे.

या टेस्ट करणाऱ्या लोकांनी जे सांगितलं ते ऐकून धक्काच बसतो. त्यांच्या म्हणण्यानुसार, टीव्हीची स्क्रीन बंद असतानाही त्यातून ऑडिओचा डेटा बाहेर जात राहतो. म्हणजेच टीव्ही आपलं बोलणं ऐकत होता, असा त्यांचा दावा आहे. त्यांनी इंटरनेट बंद करून सुद्धा पाहिलं, तेव्हाही टीव्ही डेटा त्याच्या मेमरीत साठवून ठेवत होता आणि इंटरनेट सुरू होताच तो डेटा कंपनीच्या सर्व्हरवर पाठवत होता, असंही त्यांनी सांगितलं.

हा आरोप झाल्यावर LG ने लगेच खुलासा केला. कंपनीने सांगितलं की, "आमचा टीव्ही परवानगीशिवाय कोणाचंही बोलणं रेकॉर्ड करत नाही." कंपनीचं म्हणणं आहे की, रिमोटवरचं आवाजाचं बटण दाबलं किंवा "Hi LG" असं म्हटलं तरच टीव्ही ऐकतो. काहीच बोलला नाही किंवा टीव्हीला कमांड कळली नाही, तर तो आवाज लगेच डिलीट होतो आणि तो सर्व्हरवर जातच नाही, असं कंपनीने स्पष्ट केलं. मात्र मग रिसर्चर लोकांना ऑडिओ ट्रॅफिक कसा दिसला, यावर अजूनही वाद सुरूच आहे.

या टेस्टमध्ये आणखी एक गोष्ट समोर आली आहे. Wireshark नावाचं एक टूल वापरून नेटवर्कमध्ये काय चाललंय हे तपासलं असता, LG चा टीव्ही घरातली दुसरी गॅझेट्स शोधत असल्याचं दिसलं. फोन, स्मार्टवॉच, लॅपटॉप आणि जवळपासची वाय-फाय नेटवर्क्स सुद्धा टीव्ही स्कॅन करत होता. मात्र याचा अर्थ टीव्ही फोनमधले फोटो किंवा मेसेज वाचतो असा होत नाही. टीव्ही फक्त नेटवर्कवर कोण कोण जोडलेलं आहे हे बघत असल्याचं LG कंपनीचं म्हणणं आहे. घरातली इतर डिव्हाईस कनेक्ट करण्यासाठी हे करावं लागतं आणि सगळेच स्मार्ट टीव्ही असं करतात, असं कंपनीने सांगितलं.

फक्त आवाजच नाही, तर तुम्ही टीव्हीवर काय बघता यावरही टीव्हीचं लक्ष असतं. याला ऑटोमॅटिक कंटेंट रेकग्निशन म्हणजेच ACR असं म्हणतात. यूट्यूबवर काय बघता, नेटफ्लिक्सवर काय बघता, एवढंच नाही तर HDMI ने जोडलेल्या दुसऱ्या डिव्हाईसवर काय बघता हेसुद्धा टीव्हीला कळतं. याच माहितीच्या आधारे मग जाहिराती दाखवल्या जातात, उदाहरणार्थ क्रिकेट बघत असाल तर क्रिकेटच्या बॅटची जाहिरात दिसते.

यातलं नेमकं खरं काय आणि खोटं काय, हे LG आणि टेस्ट करणारे रिसर्चर यांच्यातच स्पष्ट होईल. मात्र एक गोष्ट नक्की, स्मार्ट टीव्ही घेताना त्याची प्रायव्हसी सेटिंग्ज एकदा तपासून घ्यावी आणि गरज नसेल तर माईकचा पर्याय बंद करून ठेवावा.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ