लॅबग्रोन हिऱ्यांची संपूर्ण साखळी देशातच उभारा, अमित शाहांचं आवाहन; नवी मुंबईत ज्वेलरी पार्क
मुंबईत झालेल्या इंडिया जेम्स अँड ज्वेलरी अवॉर्ड्स सोहळ्यात अमित शाह यांनी लॅबग्रोन डायमंड क्षेत्रात भारताने जागतिक नेतृत्व करावं असं आवाहन केलं, तर नवी मुंबईतील प्रस्तावित ज्वेलरी पार्कमधून 1 लाख कोटींची गुंतवणूक आणि 50 हजार रोजगार अपेक्षित असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
लॅबग्रोन डायमंड म्हणजे लॅबमध्ये तयार होणाऱ्या हिऱ्यांच्या क्षेत्रात भारताने जगात आघाडी घ्यायची असेल, तर उत्पादनापासून ते ब्रँडिंग आणि विक्रीपर्यंतची संपूर्ण मूल्यसाखळी देशातच उभी करायला हवी, असं आवाहन केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी केलं आहे. मुंबईत झालेल्या 52 व्या 'इंडिया जेम्स अँड ज्वेलरी अवॉर्ड्स' सोहळ्यात ते बोलत होते.
लॅबग्रोन डायमंड तयार करण्यासाठी लागणारी यंत्रसामग्री, दागिन्यांचं उत्पादन, ब्रँडिंग, शोरूम आणि जगभर माल पोहोचवणारी विक्री व्यवस्था अशा प्रत्येक टप्प्यावर भारतीय उद्योगाने स्वतःची ताकद वाढवायला हवी, असं शाह म्हणाले. या क्षेत्राची जागतिक बाजारपेठ पुढच्या काळात मोठ्या प्रमाणात वाढणार असल्याने भारतीय कंपन्यांनी ही संधी साधावी, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
भारताकडे पायाभूत सुविधा, ऊर्जा, भांडवल आणि उद्योजकतेची ताकद आधीच आहे, त्यामुळे फक्त उत्पादन वाढवून थांबायचं नाही, तर भारतीय कंपन्यांनी स्वतःचे जागतिक ब्रँड उभे करून मोठ्या शहरांमध्ये विक्री केंद्रंही सुरू करावीत, असं शाह यांनी सांगितलं. यासाठी केंद्र सरकार पूर्ण सहकार्य करेल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
नवी मुंबईत रत्न आणि आभूषण उद्योगासाठी मोठी जागा आणि आवश्यक एफएसआय उपलब्ध करून देण्याची भूमिका राज्य सरकारने घेतली आहे. हा उद्योग महाराष्ट्राबाहेर जाण्याची वेळ येऊ नये, यासाठी सरकार सर्वतोपरी मदत करेल, असं सांगण्यात आलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की, नवी मुंबईतील प्रस्तावित जेम्स अँड ज्वेलरी पार्कमधून जवळपास 1 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक येणार असून 50 हजार रोजगार निर्माण होण्याची अपेक्षा आहे. या पार्कचं काम दसऱ्यापासून सुरू होणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
सुरत हे हिरे कटिंग आणि पॉलिशिंगचं मोठं केंद्र असून, जगभरात पैलू पाडल्या जाणाऱ्या हिऱ्यांपैकी मोठा वाटा सुरतमध्ये प्रक्रिया होऊन येतो. भारताच्या रत्न आणि आभूषण उद्योगाचा देशाच्या निर्यातीतही मोठा वाटा आहे. 2025 मध्ये भारताची रत्न आणि आभूषण निर्यात 2 लाख 44 हजार कोटी रुपयांपर्यंत पोहोचल्याचं अमित शाह यांनी सांगितलं. देशाच्या एकूण व्यापारी माल निर्यातीत या क्षेत्राचा वाटा 6.3 टक्के इतका असून, या उद्योगातून जवळपास 75 लाख नागरिकांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार मिळत असल्याचं त्यांनी नमूद केलं.
युरोपियन युनियन, संयुक्त अरब अमिराती, ऑस्ट्रेलिया, ओमान आणि ब्रिटनसोबत झालेल्या मुक्त व्यापार करारांचा फायदा घेऊन भारतीय उद्योगाने नव्या बाजारपेठांमध्ये विस्तार करावा, असंही शाह म्हणाले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेत रत्न आणि आभूषण उद्योगाचं महत्त्व अधोरेखित केलं. भारताच्या रत्न व आभूषण निर्यातीत महाराष्ट्राचा मोठा वाटा असून, भविष्यात हा उद्योग रोजगार आणि गुंतवणुकीचा महत्त्वाचा आधार ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या सोहळ्यात, म्हणजे 'इंडिया जेम्स अँड ज्वेलरी अवॉर्ड्स 2026' मध्ये, उद्योगातील 27 वेगवेगळ्या श्रेणींमध्ये उल्लेखनीय काम केलेले उद्योजक, निर्यातदार, उत्पादक, महिला उद्योजक आणि इतर मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.