डुकाटी नफ्यात असूनही फोक्सवॅगन ग्रुपकडून वेगळे करण्याचा विचार
जागतिक विक्रीत घट नसतानाही नफ्याचे मोठे लक्ष्य गाठण्यासाठी फोक्सवॅगन ग्रुप डुकाटीसह अनेक व्यवसायांचा फेरआढावा घेत आहे.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
बाईकप्रेमींच्या दृष्टीने डुकाटी म्हणजे नुसता एक मोटरसायकल ब्रँड नाही, तर परफॉर्मन्स आणि रेसिंगचं एक प्रतीकच आहे. पण आता याच इटालियन ब्रँडच्या भवितव्याबद्दल मोठी चर्चा सुरू झाली आहे. ब्लूमबर्गच्या अहवालात असं समोर आलं आहे की फोक्सवॅगन ग्रुप आपल्या पोर्टफोलिओमधून डुकाटीला वेगळं करण्याचा विचार करत आहे. यातली सगळ्यात लक्षवेधी गोष्ट म्हणजे डुकाटी सध्या तोट्यात नसून नफ्यात असतानाही हा निर्णय चर्चेत आला आहे.
आकडेवारी बघितली तर डुकाटीची कामगिरी वाईट दिसत नाही. 2022 मध्ये फोक्सवॅगन ग्रुपच्या अंतर्गत डुकाटीने पहिल्यांदाच 60,000 मोटरसायकलींची विक्री ओलांडली होती. मात्र 2025 मध्ये कंपनीची जागतिक विक्री 50,895 युनिट्सवर आली, जी मागील वर्षाच्या तुलनेत जवळपास 7 टक्क्यांनी कमी आहे. तरीदेखील डुकाटीने 5.6 टक्के नफा नोंदवला आहे. म्हणजे विक्री थोडी घसरली असली तरी कंपनी तोट्यात गेलेली नाही.
प्रश्न असा आहे की मग फोक्सवॅगन डुकाटीला बाजूला का करू पाहतंय? याचं उत्तर फोक्सवॅगन ग्रुपच्या एकूण नफ्याच्या उद्दिष्टांमध्ये दडलेलं आहे. सध्या ग्रुप आपल्या व्यवसायातून जास्तीत जास्त नफा काढण्यावर भर देत आहे. 2026 मध्ये ग्रुपचा ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन सुमारे 3.8 टक्के राहील असा अंदाज आहे, जो मागील वर्षीच्या 4.2 टक्क्यांपेक्षा कमी आहे. पुढे जाऊन ऑपरेटिंग रिटर्न ऑन सेल्स 8 ते 10 टक्क्यांपर्यंत नेण्याचं महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट कंपनीने ठेवलं आहे. याच उद्दिष्टामुळे जे व्यवसाय अपेक्षित परतावा देत नाहीत, त्यांचं पुनर्मूल्यांकन सध्या सुरू आहे.
फोक्सवॅगन ग्रुपअंतर्गत येणाऱ्या ऑडीचे सीईओ गेर्नॉट डॉल्नर यांनी याआधीच सांगितलं होतं की डुकाटीसह जवळपास 600 व्यवसायांचा आढावा घेतला जात आहे. ग्रुप आपल्या एकूण व्यवसायांची संख्या जवळपास एक तृतीयांशने कमी करण्याचा विचार करत असल्याचीही चर्चा आहे. साहजिकच या मोठ्या फेरआढाव्यात डुकाटीही प्रभावित होऊ शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
असं असलं तरी डुकाटीची लोकप्रियता अजूनही कायम आहे. डुकाटी मॉन्स्टर आणि पॅनिगेल व्ही4 सारख्या दमदार मोटरसायकलींसाठी हा ब्रँड ओळखला जातो. मोटोजीपीमध्येही 2020 पासून सलग सहा चॅम्पियनशिप जिंकून डुकाटीने आपलं वर्चस्व सिद्ध केलं आहे. त्यामुळे जर हा ब्रँड विकला गेला किंवा वेगळा केला गेला, तर पुढे त्याची धुरा नेमकी कोण सांभाळणार, हा मोठा प्रश्न आता उभा राहतो. सध्यातरी फोक्सवॅगनकडून याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.