क्रांती गौडला ICC चा दणका! फायनलमध्ये श्रीलंकन खेळाडूला केलेल्या इशाऱ्याची मिळाली शिक्षा
महिला आशिया कप २०२६ च्या अंतिम सामन्यातील एका इशाऱ्यामुळे भारतीय गोलंदाज क्रांती गौडवर आयसीसीने कारवाई केली आहे.
१३ सप्टेंबरला झालेल्या महिला आशिया कप २०२६ च्या अंतिम सामन्यात भारताने श्रीलंकेचा ७२ धावांनी पराभव करत विजेतेपद पटकावले. भारतीय संघाने आधी चांगली फलंदाजी केली आणि नंतर तितकीच जबरदस्त गोलंदाजी करत सामना खिशात टाकला. या दोन्ही विभागांतील दमदार कामगिरीमुळेच भारताला अंतिम सामन्यात एवढ्या मोठ्या फरकाने विजय मिळवता आला. मात्र या विजयानंतर एका वादामुळे भारतीय वेगवान गोलंदाज क्रांती गौड चर्चेत आली. श्रीलंकेच्या एका खेळाडूला पॅव्हेलियनमध्ये जाण्याचा इशारा केल्याबद्दल आयसीसीने तिच्यावर कारवाई करत तिला तिच्या सामना शुल्काच्या १० टक्के दंड ठोठावला.
ही कारवाई आयसीसीच्या आचारसंहितेच्या कलम २.५ अंतर्गत करण्यात आली, जे फलंदाज बाद झाल्यावर अपमानास्पद भाषा, कृती किंवा अयोग्य हावभाव वापरण्याशी संबंधित आहे. ही आचारसंहिता खेळाडू आणि खेळाडूंच्या सहाय्यक कर्मचाऱ्यांसाठी लागू असते. गौडला १० टक्के दंडासोबतच एक डिमेरिट पॉइंटही देण्यात आला. गेल्या २४ महिन्यांतील हा तिचा पहिलाच गुन्हा असल्याने तिला याहून मोठी शिक्षा टळली.
हे प्रकरण घडले ते श्रीलंकेच्या डावाच्या पहिल्याच षटकात. श्रीलंकेची फलंदाज इमिषा दुलानीने गौडच्या पहिल्याच चेंडूवर फाइन लेगच्या दिशेने चौकार खेचला. पण तीनच चेंडूंनंतर तिने पुन्हा तोच फटका मारण्याचा प्रयत्न केला आणि ती बाद झाली. त्याच क्षणी गौडने तिला पॅव्हेलियनकडे जाण्याचा इशारा केला. गौडने स्वतःची चूक मान्य केल्याने औपचारिक सुनावणीची गरज पडली नाही. हा आरोप मैदानावरील पंच सलीमा इम्तियाज आणि शथिरा झाकीर जेसी यांनी, तर तिसऱ्या पंच रोकेया सुलताना आणि चौथ्या पंच हुमैरा फराह यांनी नोंदवला होता.
या सामन्याव्यतिरिक्त आयसीसीने पाकिस्तान महिला क्रिकेट संघावरही कारवाई केली. श्रीलंकेविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात संघाचा ओव्हर रेट कमी असल्याने संपूर्ण संघाच्या सामना शुल्कातून ५ टक्के रक्कम कापण्यात आली. १३१ धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेने अवघ्या १८.४ षटकांत विजय मिळवला होता. सामना संपल्यावर लक्षात आले की पाकिस्तान संघ निर्धारित वेळेपेक्षा एक षटक मागे होता. चौथे पंच रबाब अहसान यांच्या तक्रारीनंतर सामनाधिकाऱ्यांनी हा दंड ठोठावला, जो पाकिस्तानची कर्णधार फातिमा सना हिने कोणताही आक्षेप न घेता मान्य केला.
याआधीही फातिमा सनाला आयसीसीने शिक्षा सुनावली होती. भारताविरुद्धच्या सामन्यात शफाली वर्माला बाद केल्यावर तिने पॅव्हेलियनकडे इशारा केला होता, त्यानंतर आयसीसीने तिच्या मॅच फीमधून १० टक्के रक्कम कापली आणि एक डिमेरिट पॉइंट दिला. सनानेही आपली चूक मान्य केली होती. अशा प्रकारे एकाच स्पर्धेत भारतीय आणि पाकिस्तानी संघातील खेळाडूंवर आयसीसीच्या आचारसंहितेनुसार वेगवेगळ्या कारणांसाठी शिक्षा झाल्याचे दिसून आले.