गुरुवार, 17 सप्टेंबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
01:42 IST

पन्हाळ्यात वृद्धेला बांधून दागिने लुटल्याचा गुन्हा २४ तासांत उघड, दोघे अटकेत

पन्हाळ्यात वृद्धेला बांधून दागिने लुटल्याचा गुन्हा २४ तासांत उघड, दोघे अटकेत
एआई से बनाई गई प्रतीकात्मक तस्वीर; यह घटना का वास्तविक फोटो नहीं है | PT24

महाडिकवाडी (ता. पन्हाळा) इथे एका वृद्ध महिलेचे हात-तोंड बांधून पाच लाख रुपयांचे सोन्याचे दागिने लुटल्याची घटना घडली होती. या प्रकरणाचा छडा पन्हाळा पोलिसांनी अवघ्या २४ तासांत लावला. मोबाईलमधील 'फोन पे' व्यवहार आणि कापडाच्या दुकानातील सीसीटीव्ही फुटेज तपासताना पोलिसांच्या हाती महत्त्वाचा धागा लागला आणि त्यातूनच संशयितांपर्यंत पोहोचता आलं. या प्रकरणात नंदकिशोर सदानंद महाडिक (वय ३९) आणि रमेश सदाशिव महाडिक (वय २८, दोघेही रा. महाडिकवाडी) यांना अटक करण्यात आली आहे.

१२ सप्टेंबरला मध्यरात्री एक ते दोनच्या सुमारास महाडिकवाडीतील सरदार ऊर्फ बापू महाडिक यांच्या घरात दोन अनोळखी व्यक्ती घुसल्या. घरातल्या ८० वर्षांच्या वृद्ध महिलेचं तोंड आणि हात पांढऱ्या कापडी पट्ट्यांनी बांधून तिच्या अंगावरच्या सोन्याच्या पाटल्या, मंगळसूत्र, कुड्या आणि बुगडी असा जवळपास पाच लाख रुपये किमतीचा ऐवज जबरदस्तीने काढून नेला. या प्रकारात वृद्ध महिला जखमी झाली होती. या प्रकरणी पन्हाळा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला.

गुन्हा किती गंभीर आहे हे लक्षात घेऊन पोलिसांनी आजूबाजूच्या गावांसह परिसरातलं सीसीटीव्ही फुटेज तपासायला सुरुवात केली. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे संशयितांच्या हालचाली शोधण्याचा प्रयत्न झाला. पण गुन्हा घडला त्यावेळी कुठली संशयास्पद गाडी किंवा बाहेरची व्यक्ती परिसरात आल्याचं स्पष्ट झालं नाही. त्यामुळे पोलिसांचा संशय स्थानिक लोकांकडे वळला.

तपासादरम्यान मिळालेल्या स्थानिक माहितीच्या आधारावर पोलिसांनी नंदकिशोर महाडिक याची चौकशी केली. सुरुवातीला त्याने गुन्ह्यात सहभाग असल्याचं नाकारलं. त्यानंतर पोलिसांनी त्याच्या मोबाईलमधले व्यवहार बारकाईने तपासले, तेव्हा ७ सप्टेंबरला त्याने एका कापडाच्या दुकानात 'फोन पे'ने पैसे दिल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं.

यानंतर पोलिसांनी त्या कापडाच्या दुकानातलं सीसीटीव्ही फुटेज तपासलं. नंदकिशोरने दुकानातून घेतलेलं कापड आणि चोरीच्या जागी वृद्ध महिलेचे हात-तोंड बांधायला वापरलेलं कापड यात साम्य असल्याचं तपासात दिसून आलं. हाच तपासातला महत्त्वाचा धागा ठरला. पुरावे समोर ठेवल्यावर नंदकिशोरने रमेश महाडिकच्या मदतीने चोरी केल्याची कबुली दिली, असं पोलिसांनी सांगितलं.

त्यानंतर पोलिसांनी रमेश महाडिक यालाही ताब्यात घेतलं. दोघांकडून चोरीला गेलेले पाच तोळे वजनाचे, अंदाजे पाच लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. या गुन्ह्याचा पुढचा तपास श्रेणी पोलीस उपनिरीक्षक सुरेश खोत करत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक निलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव आणि शाहूवाडी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रवीण गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच पोलीस निरीक्षक लिंगाप्पा चौखंडे यांच्या सूचनेनुसार करण्यात आली. श्रेणी पोलीस उपनिरीक्षक सलीम सनदी, सुरेश खोत, समीर मुल्ला, तौसिफ मुल्ला, शंकर पाटील, सचिन पाटील, प्रकाश पाटील, रविंद्र कांबळे, गणेश पाटील, दिगंबर चिले, सागर रोहिले आणि अमर चव्हाण यांच्या पथकाने या तपासात सहभाग घेतला.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ